तरी ही गोष्ट शक्य आहे!

प्रवीण देशपांडे

*  प्रश्न : मी नोव्हेंबर २०१५ मध्ये एक घर विकले होते आणि या विक्रीवर मला ३२,५०,००० रुपये इतका दीर्घ मुदतीचा करपात्र भांडवली नफा झाला होता. या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी मी जानेवारी २०१७ मध्ये ४५,००,००० रुपयांना एक घर खरेदी केले. आता पैशांची गरज म्हणून मी हे घर विकण्याचा विचार करीत आहे. या घराच्या विक्रीतून मला ४८,००,००० रुपये अपेक्षित आहेत. मला या व्यवहारावर किती कर भरावा लागेल?

– संदीप जाधव, नाशिक

उत्तर : आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये आपल्याला झालेला ३२,५०,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा आपण कलम ५४ प्रमाणे नवीन घरात गुंतवणूक करून भांडवली नफ्यावर त्या वर्षीचा कर वाचविला. या वजावटीचा गैरफायदा करदात्याने घेऊ नये, यासाठी या कलमाप्रमाणे एक अट अशी की, या नवीन घराची खरेदी केल्या (किंवा बांधलेल्या) तारखेपासून तीन वर्षांच्या आता विक्री करता येत नाही. या अटीची आपण पूर्तता केली नसल्यामुळे आपण आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये घेतलेल्या गुंतवणूक वजावटीचा फायदा मागे घेतला जाईल. या कलमानुसार पूर्वी घेतलेली गुंतवणुकीची वजावट नवीन घराच्या खरेदी किमतीतून वजा केली जाते आणि त्यानुसार अल्प मुदतीचा भांडवली नफा गणला जातो. थोडक्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये आपल्या घराची खरेदी किंमत आणि अल्प मुदतीचा भांडवली नफा खालीलप्रमाणे :

प्रत्यक्षात नवीन घर विक्रीमध्ये आपल्याला फक्त तीन लाख रुपयांचा अल्प मुदतीचा भांडवली नफा झाला (विक्री किंमत ४८ लाख रुपये आणि खरेदी किंमत ४५ लाख रुपये) असला तरी, आपण कलम ५४ नुसार घातलेली तीन वर्षांची अट न पाळल्यामुळे, आपल्याला पूर्वी घेतलेली वजावट ३२,५०,००० रुपये आणि तीन लाख रुपयांचा प्रत्यक्ष भांडवली नफा असा ३५,५०,००० रुपयांवर आपल्या कर टप्प्याप्रमाणे (स्लॅबनुसार) कर भरावा लागेल.

*  प्रश्न :  मी स्टीलच्या भांडय़ांचा खरेदी-विक्रीचा धंदा करतो. माझ्या धंद्याची एकूण उलाढाल १ कोटी ४५ लाख रुपये आहे. मी माझ्या उलाढालीवर अनुमानित (प्रिझम्प्टिव्ह) कर भरू इच्छितो. आपण मागील लेखामध्ये असे सांगितले होते की, धंद्याची उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेख्यांचे सनदी लेखाकाराकडून (सीए) लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. तर मला असे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे का? मला कोणत्या तारखेपर्यंत विवरणपत्र दाखल करावे लागेल?

      – सुधाकर मोरे, ईमेलद्वारे

उत्तर : ज्या धंद्याची (काही अपवाद वगळता) उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशा करदात्यांना अनुमानित कर भरण्याची मुभा आहे. आपण हा विकल्प स्वीकारल्यास आपल्याला उलाढालीच्या ८ टक्के इतका (किंवा जास्त) नफा दाखवून आपले ‘धंदा-व्यवसायातील’ उत्पन्न दाखविता येते. मागील वर्षांपासून बँकेच्या व्यवहाराला प्रोत्साहन देऊन रोखीचा व्यवहार कमी करण्यासाठी ४४ एडी या कलमानुसार नफ्याचा हा ८ टक्के दर कमी करून ६ टक्के इतका करण्यात आला आहे. याला अट अशी आहे की, उलाढालीचे पैसे करदात्याला अकाऊंट पेयी चेक, ड्राफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टमद्वारे बँकेत जमा झाले असले पाहिजेत आणि हे पैसे त्याला त्या आर्थिक वर्षांत किंवा त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी मिळाले असले पाहिजेत. अन्यथा नफ्याचा दर ८ टक्के इतकाच राहील. आपण या कलमानुसार विवरणपत्र भरल्यास आपल्या धंद्याची उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असली तरी आपल्याला आपल्या लेख्यांचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक नाही आणि ज्या करदात्यांना लेख्यांचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक नाही अशांना विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै अशी आहे. ही मुदत वाढवून आता ३१ ऑगस्ट इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला या मुदतीत विवरणपत्र दाखल करावे लागेल.

* प्रश्न : मी एक शिक्षक आहे आणि माझ्या उत्पन्नात ५ लाख रुपये पगार, ४,५०० रुपये व्याज आणि १४,००० रुपये शेतीच्या उत्पन्नाचा समावेश आहे. मला विवरणपत्र कोणत्या फॉर्ममध्ये भरावे लागेल?     – सुहास गायकवाड, पुणे</p>

उत्तर: ज्या करदात्यांच्या उत्पन्नात ५,००० रुपयांपेक्षा जास्त शेतीच्या उत्पन्नाचा समावेश असेल त्यांना विवरणपत्र १ हा फॉर्म भरता येत नाही. आपले शेतीचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र २ हा फॉर्म भरावा लागेल.

* प्रश्न :  मी निवासी भारतीय आहे. मी माझ्या नातेवाईकाकडे तीन महिन्यांसाठी परदेशी आलो आहे. मी सप्टेंबर २०१८ मध्ये भारतात परत येत आहे. माझे ‘घरभाडे उत्पन्न’ हे १,५०,००० रुपये आहे आणि गृह कर्जावर भरलेले व्याज पाच लाख रुपये इतके आहे. या व्याजामुळे मला ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरात ३,५०,००० रुपयांचा तोटा आहे. मी विवरणपत्र मुदतीत दाखल करू शकत नसल्यामुळे मी हा तोटा इतर उत्पन्नांतून वजा करून कमी करता येईल का? आणि हा तोटा मी पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करू शकतो का?

      – अविनाश कोरडे, मुंबई</strong>

उत्तर : आपले ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरात ३,५०,००० रुपयांचा तोटा आहे. या वर्षांपासून या सदराखालील फक्त २ लाख रुपयांपर्यंतचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. हा २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नांतून वजा करून बाकी १,५०,००० रुपयांचा तोटा पुढील ८ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. हा तोटा कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल करण्याची अट नाही; परंतु भांडवली तोटा किंवा धंदा-व्यवसायातील तोटा कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आपण विवरणपत्र सप्टेंबर २०१८ मध्ये दाखल केले तरी आपल्याला याचा फायदा घेता येईल; परंतु आपल्याला विलंब शुल्क मात्र भरावे लागेल.

नवीन घराची खरेदी किंमत :

नवीन घराची खरेदी किंमत                      ४५,००,०००

वजा : कलम ५४ नुसार घेतलेली वजावट   ३२,५०,०००

नवीन घराची सुधारित खरेदी किंमत         १२,५०,०००

ही खरेदी किंमत विचारात घेऊन भांडवली नफा गणला जाईल तो खालीलप्रमाणे :

नवीन घराची विक्री किंमत (*)                  ४८,००,०००

नवीन घराची सुधारित खरेदी किंमत         १२,५०,०००

अल्प मुदतीचा भांडवली नफा                    ३५,५०,०००

(*) नवीन घराची प्रत्यक्ष विक्री किंमत मुद्रांक शुल्कासाठी विचारात घेतलेल्या बाजारभाव मूल्यापेक्षा जास्त आहे असे गृहीत धरले आहे. हे बाजारभाव मूल्य आपण केलेल्या प्रत्यक्ष विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास हे जास्त असलेले मूल्य विचारात घेऊन भांडवली नफा गणावा लागेल. या वर्षीपासून हा फरक ५% पेक्षा कमी असल्यास तो विचारात घेतला जाणार नाही.