विमा हा आपल्या आयुष्यातील जोखमीमधून आपले व आपल्या कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी असतो. तथापि भारतामध्ये बऱ्याचदा विम्याकडे गुंतवणुकीचाच एक पर्याय म्हणून पाहिले जाते, जे सर्वथा गैर आहे. आर्थिक नियोजनामध्ये विम्याचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे, पण ते जोखमीचे व्यवस्थापन म्हणूनच..
भाग- पहिला
आर्थिक नियोजनामध्ये जोखमीचे व्यवस्थापन आणि विमा यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. भारतामध्ये बऱ्याचदा विम्याकडे गुंतवणुकीचाच एक पर्याय म्हणून पाहिले जाते व असे समजले जाते की, काही वर्षांमध्ये या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. परंतु विमा हा आपल्या आयुष्यातील जोखमीमधून आपले व आपल्या कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी असतो. जसे की अपघात, गंभीर आजार यांमुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास, अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे आलेली आर्थिक अडचण विम्याकरवी विमा कंपनीकडे हस्तांतरित केली जाते.
विमा नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये संभाव्य जोखमीच्या प्रभावी पैलूंची कसून चाचपणी केली जाते आणि नंतर योग्य रक्कम ठरवून विमा काढण्यात येतो. आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांच्या संरक्षणासाठी विमा घेण्याच्या योग्य पर्यायांची कसून तपासणी करूनच योग्य तो पर्याय निवडला पाहिजे.

विमा नियोजनाच्या प्रक्रियेमधील काही महत्त्वाचे पैलू पुढीलप्रमाणे आहेत :
१. आयुर्विमा :
आयुर्विमा हा आपल्या पश्चात आपल्या कुटुंबासाठी मिळकतीचा पर्याय म्हणून निवडला गेला पाहिजे. आयुर्विमा किती घ्यायला हवा याचे गणित सोबतच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे तीन प्रकारे आखले जाऊ शकते. विम्याच्या योग्य रकमेबरोबरच किती कालावधीसाठी तुम्हाला विम्याची गरज आहे हेही लक्षात घेणे महत्त्वाचे असते. बरेच लोक जास्तीत जास्त कालावधीसाठी विमा काढतात जो तुमच्या वयाच्या ६०/६५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत जातो. वर दिलेल्या माहितीप्रमाणे आयुर्विमा हा तुमच्या बंद झालेल्या मिळकतीच्या बदल्यात मिळणारा मोबदला असतो. त्यामुळे त्याची गरज फक्त तुमच्या नोकरीच्या वयापर्यंतच असते. जसे की साधारणपणे वयाच्या ५८/६०व्या वर्षांपर्यंत. त्यामुळे खूप जास्त कालावधीसाठी विमा घेण्याची आवश्यकता नसते. तर विमा फक्त तुमच्या सेवा-निवृत्तीपर्यंत घेणे योग्य असते. त्यामुळे उगाचच जास्तीचा विमा हप्ताही भरण्याची गरज नाही.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

२. अपघात आणि अपंगत्वाचा विमा :
या प्रकारचा विमा तुमच्या एका मोठय़ा संपत्तीचे रक्षण करण्यासाठीच असतो आणि ती संपत्ती म्हणजे तुमची मिळकत कमावण्याची क्षमता. जर तुम्ही काही अपघातामुळे काम करण्यास असक्षम झालात अथवा अपंगत्व आले तर अशा प्रकारचा विमा तुमच्या बंद झालेल्या मिळकतीच्या बदल्यात उत्पन्नाचे साधन बनतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे, आधुनिक जीवनशैलीमुळे आपण अपघात, अपंगत्व यांसारख्या दुर्दैवी गोष्टीकडे ओढले जाऊ शकतो. अशा संकटांमुळे आपण काम करण्यास असमर्थ ठरल्यास मिळकतीवर परिणाम होऊ शकतो. आपण आयुर्विम्यासोबत, अपघात आणि अपंगत्वाची काळजी घेणारी रायडर्सही घेऊ शकता जो या प्रकारचे संरक्षण आपल्याला देऊ शकतो.

३. आरोग्य विमा/ मेडिक्लेम :
या प्रकारच्या विम्यामध्ये तुम्हाला रुग्णालयातील खर्चाची परतफेड मिळते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, ते तरुण आहेत, निरोगी आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य विम्याची आवश्यकता नाही. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आजाराला बळी पडता त्यानंतर आरोग्य विमा मिळणे कठीण होते. काही कंपन्या तर त्या आजारासाठी जास्तीचा हप्ता लावू शकतात अथवा तुम्हाला त्या झालेल्या ठरावीक आजारासाठी विमा देणे नाकारू शकतात. एक गोष्ट हीसुद्धा लक्षात घेतली गेली पाहिजे ती म्हणजे जसजसे वय वाढत जाते तसतसे आजाराची शक्यताही वाढत जाते, त्यामुळे आरोग्य विम्याचा हप्ताही वयानुसार वाढविण्यात येतो. बऱ्याच आरोग्य विम्यामध्ये काही आजार धरले जात नाही, तर काही ठरावीक आजारांसाठी प्रतीक्षा काळ (वेटिंग पीरियड) ठरविण्यात येतो. त्यामुळे आरोग्य विमा घेताना विम्याच्या शर्ती जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे असते.

४. गंभीर आजारांचा विमा (क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स) :
गंभीर आजार हा कधीही कोणालाही होऊ शकतो. काही गंभीर आजार जसे की,किडनी निकामी होणे, कर्करोग वगैरेंसाठी उपचाराचा खर्चही खूप जास्त असतो.
‘क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स’ हा असे गंभीर आजार झाल्याचे निदान झाल्यावर लगेचच संपूर्ण विम्याची रक्कम देतो. कर्करोगासाठी स्वतंत्र विमासुद्धा बाजारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर लगेचच संपूर्ण विम्याची रक्कम मिळाल्यामुळे पुढच्या उपचाराच्या खर्चाची तरतूद होऊ शकते.

५. स्थावर मालमत्ता विमा :
आपले घर ही आपली सगळ्यात किमती मालमत्ता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे घराला नुकसान होऊ शकते. त्यासाठी स्थावर मालमत्ता विमा आपली नुकसानभरपाई देऊ शकतो. घराबरोबरच घरातील काही किमती वस्तू इत्यादींचा विमाही काढता येऊ शकतो. व्यावसायिकांसाठी कमर्शिअल इन्शुरन्स घेतल्यास त्यांची नुकसानभरपाई घेता येते.
एक गोष्ट अतिशय महत्त्वाची ती म्हणजे विम्याचे फायदे मिळविण्यासाठी विम्याचा हप्ता वेळेवर भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे याआधीच्या लेखात सुचविल्याप्रमाणे वित्तप्रवाह विश्लेषण करताना विम्याच्या हप्त्याची भरावी लागणारी वार्षिक रक्कम लिक्विड फंडामध्ये किंवा बँक आवर्ती ठेवी (आरडी)मध्ये प्रत्येक महिन्यात जमा करून ठेवावी जेणेकरून विम्याचा हप्ता वेळेवर भरण्यासाठी रक्कम उपलब्ध होऊ शकेल.
आकस्मिक आणि आणीबाणीच्या खर्चाचे नियोजन भविष्यासाठी केलेल्या गुंतवणुकीला हात न लावता कसे करावे हे पुढील लेखात आपण पाहू.

किती आयुर्विमा कवच आवश्यक?
१. मानवी जीवन मूल्य (ह्य़ुमन लाइफ व्हॅल्यू- एचएलव्ही) : घरातील एखाद्या कर्त्यां व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या सध्याच्या मिळकतीची भविष्यातील किंमत जी ती व्यक्ती तिच्या कुटुंबासाठी त्याच्या पश्चात उपलब्ध करून देऊ शकेल. एचएलव्हीची सर्वात सामान्य व्याख्या म्हणजे तुमच्या भविष्यातील सर्व मिळकतींचे सध्याचे मूल्य जे तुम्ही आपल्या कुटुंबीयांसाठी मिळवू इच्छिता.
२. मिळकतीच्या बदल्यात मिळणारे मूल्य : ही अगदी साधी पद्धत आहे जी तुमच्या सध्याच्या वार्षिक मिळकतीच्या गणनेवर अवलंबून असते.
विम्याची गरज = वार्षिक मिळकत x सेवानिवृत्तीसाठी बाकी असलेली वर्षे.
समजा, तुमची वार्षिक मिळकत रु. ६,००,०००/- इतकी आहे आणि तुमचे वय ४० वर्षे आहे. म्हणजे सेवानिवृत्तीसाठी अजून २० वर्षे आहेत. या उदाहरणाप्रमाणे तुमची विम्याची गरज रु. ६,००,००० x २० वर्षे = रु. १,२०,००,०००/-
३. आवश्यकता विश्लेषण (Need Analysis) : या पद्धतीत तुमच्या गरजा, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा यांचे गणित मांडून त्याचे सांख्यिकी विश्लेषण करावे लागते. यात सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे तुमच्या मिळकतीवर अवलंबून असलेल्या तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि त्यांच्या गरजा जाणून घेतल्या जातात. यात खाली दिलेले काही महत्त्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतात.
* एकूण कुटुंबीयांचे कर्ज
* तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना देऊ इच्छिणारे राहणीमान
* मुलांचे शिक्षण
* मुलांची लग्ने
* आर्थिकदृष्टय़ा अवलंबून असलेले पालक
* आपली स्वप्न किंवा इच्छा जसे कीएखाद्या सेवाभावी संस्थेला देण्याचा दानधर्म वगैरे.
या प्रकारे तुमच्यावर एकूण असलेल्या कर्जाची रक्कम वजा करून तुमच्या विम्याची रक्कम ठरवू शकता जी तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल.

किरण हाके – kiranhake@fingenie.co.in
लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.