’  शेअर निर्देशांकांनी उच्चांकी झेप घेतली आहे, या स्थितीत बाजाराचा आगामी कल आणि गुंतवणूकदारांनी घ्यावयाच्या गुंतवणूकविषयक पवित्र्याबाबत तज्ज्ञांचे दिशानिर्देश..

शेअर बाजाराचे निर्देशांक नवीन शिखरांना स्पर्श करतात तेव्हा आजपर्यंत कुंपणावर बसलेले गुंतवणूकदार एक तर एकरकमी मोठी गुंतवणूक करतात किंवा आधीपासून गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आपल्या ‘एसआयपी’ थांबवितात. खरे तर बाजाराची आजची अवस्था अर्धा पेला भरला आहे अशी आहे. तरी शेअर बाजार म्हटल्यावर नजीकच्या काळात चढ-उतारांना सामोरे जावे लागले तर आश्चर्य वाटायला नको. एक मात्र खरे की, आज देशाची अर्थव्यवस्था आश्वासक वळणावर आहे. किंबहुना निर्देशांक नवीन शिखरांना स्पर्श करीत आहेत, कारण नजीकचा काळ अर्थव्यवस्थेसाठी उज्ज्वल असेल असे संकेत मिळत आहेत.

समभागांचे वर्तमानातील मूल्यांकन नजीकच्या भविष्यकाळातील उत्सर्जन (मिळकत अर्थात ‘ईपीएस’) वाढीवर ठरत असते. सध्याचे मूल्यांकन अपेक्षित उत्सर्जनातील वाढीपेक्षा थोडे अधिक आहे हे मान्य. परंतु निर्देशांक नवीन उच्चांकावर का आहे हे पाहणेसुद्धा आवश्यक आहे. मागील वर्षभरापासून सरकारने आर्थिक सुधारणांचा धडाका लावलेला आहे. निश्चलनीकरण, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी, त्या कररचनेत आवश्यक बदलांची लवचीकता इत्यादीमुळे कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ दिसणे अपेक्षित होते. काही देशांतर्गत आणि भारताबाहेरील घडलेल्या घटनांनी उत्सर्जनातील अपेक्षित वाढ दोन ते तीन तिमाही पुढे ढकलली गेली असल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे अर्थव्यवस्थेचा संक्रमणकाळ वाढल्यामुळे उत्सर्जनातील वाढ प्रत्यक्षात येण्यास विलंब होत आहे. माझ्या मते उत्सर्जनातील वाढ पुढील वर्षांच्या पहिल्या तिमाहीपासून अनुभवता येईल.

बाजाराचे सध्याचे मूल्यांकन फार महाग नाही आणि फार स्वस्तही नाही अशा मध्यम स्तरावर आहे. समभागांच्या उत्सर्जनात मागील सहा वर्षांत वाढ न दिसल्यामुळे ते महाग वाटत आहेत. अनेक उद्योग क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहे जसे की जगभरात जिनसांच्या किमतीत सुधारणा दिसून आल्यामुळे धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ दिसू लागली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थासुद्धा २००८ मधील जागतिक पडझडीनंतर प्रथमच सशक्ततेचे संकेत देत आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय कंपन्यांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या अघटित कारणामुळे बाजारात जरी घसरण झाली तरी बाजार मूळ पातळीवर येण्यास विलंब लागणार नाही. गुंतवणूकदारांनी मागील वर्षभराचा परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक न करता बाजारातील परताव्याच्या अपेक्षासुद्धा थोडय़ा माफक ठेवणे गरजेचे झाले आहे. पाच-सहा वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास १० ते १२ टक्के परतावा मिळविणे शक्य असेल. कमी होणारी महागाई आणि कमी होणारे व्याजदर लक्षात घेता परताव्याचा हा दर गुंतवणुकीवरील समाधानकारक परतावा आहे. या पाश्र्वभूमीवर आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा आढावा घेणे गरजेचे आहे. आमच्या फंड घराण्याच्या आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंट लाइन इक्विटी फंड, आदित्य बिर्ला सनलाइफ बॅलन्स्ड ९५ फंड, किंवा उपभोग या संकल्पनेवर आधारित आदित्य बिर्ला सनलाइफ जेननेक्स्ट फंड इत्यादी फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीत केल्यास आनंदच वाटेल.

तथापि ही गुंतवणूक एकरकमी करण्यापेक्षा एक तर ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी’ किंवा ‘सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान – एसटीपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करणे हिताचे ठरेल.

महेश पाटील

लेखक आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.