वर्षांच्या सुरुवातीपासून शेअर बाजार खूपच वर खाली होताना दिसतोय. वरील सर्व पोर्टफोलिओ (बँक आवर्ती ठेवीवगळता) हे नुकसान दाखवत आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यात पैसे गुंतवायला सुरुवात केली असेल, त्यांच्यासाठी हे चित्र थोडे निराशाजनक असेल. परंतु एक लक्षात घेणे गरजेचे आहे की आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला पूर्ण विश्वस असायला हवा. हा विश्वास तेव्हा योग्य असेल जेव्हा तुम्ही गुंतवणुकीसाठी योग्य सूत्रांचा आधार घ्याल. आज निर्देशांकांच्या इतक्या मोठय़ा शिखराने सामान्य माणूस शेअर बाजाराकडे वळला आहे – स्वत: किंवा म्युचुअल फंडाच्या माध्यमातून, तेव्हा या सूत्रांचे महत्त्व अजूनच वाढले आहे.


अमेरिकी शेअर बाजारातील एक अतिशय यशस्वी गुंतवणूकदार म्हणून वॉरेन बफे हे नाव बहुतेक सर्वानाच माहीत असेल. १९३० साली ओमाहा, नेब्रास्का येथे जन्माला आलेले बफे हे जागतिक पातळीवर तिसरे श्रीमंत गृहस्थ आहेत (फेब्रुवारी २०१८ च्या आकडय़ांनुसार). क्वचितच एखादा शेअर बाजारातील गुंतवणूकदार असेल ज्याला यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. वयाच्या ११व्या वर्षांपासून त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. व्यवसायाचा अनुभव ते लहानपणीच घेऊ  लागले होते. स्वत:च्या आजोबांच्या किराणा मालाच्या दुकानात काम करणे, बबलगम – कोका कोला – साप्ताहिक पत्रिका दारोदारी जाऊन विकणे, रोजचा पेपर टाकणे अशी कामं त्यांनी केली. १९४४ साली जेव्हा ते १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी स्वत:च्या बचतीतून ४० एकर शेतजमीन विकत घेतली होती, आणि आयकर विवरण पत्र भरले होते. महाविद्यालयीन शिक्षण पुरे होईपर्यंत त्यांच्याकडे स्व-कमाईतून ९,८०० डॉलर इतकी बचत होती (आजचे साधारणपणे ६५ लाख रुपये). बर्कशायर हाथवे ही त्यांची नामांकित गुंतवणूक कंपनी त्यांनी थोडी थोडी करून १९६२-१९६७ या काळात विकत घेतली जिचा एक इक्विटी शेअर (क्लास ए) हा आज २९५,००० डॉलरचा (सुमारे रु १.९० कोटी) आहे. बफे यांनी ही कंपनी घेतल्यापासून, समभागधारकांना फक्त एकदाच लाभांश मिळाला आणि तोही १९६७ साली. बफे यांचं ध्येय एकच – समभागधारकांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक परतावा! आणि तो दिलासुद्धा (१९६५ पासून वार्षिक पुस्तकी मूल्यात सरासरी १९ टक्के वाढ!)

२००६ साली त्यांनी त्यांची पुष्कळशी इस्टेट दान केली. २००८ साली फोर्ब्स या कंपनीने त्यांना जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून घोषित केले. तर अशा प्रकारचा इतिहास असणाऱ्या बफे यांची खालील गुंतवणूक सूत्रे ही प्रत्येक गुंतवणूकदाराने नुसती वाचून न ठेवता ती मेंदूत कोरून घेतली पाहिजेत:

१. कधी पैसे घालवू नका. शेअर बाजारात रोज काही न काही होते. पण आपला गृहपाठ चांगला ठेवा आणि योग्य किंमत मोजा म्हणजे नुकसान टाळता येईल.

२. किंमत मोजताना शेअर बाजारातील रोजचे वरखाली होणारे भाव पाहू नका. गुंतवणुकीचे मूल्यमापन करा.

३. अशा गुंतवणुकीपासून लांब राहा जी समजत नाही. कमी जोखीम पत्करून परतावे कसे वाढवता येतील याकडे लक्ष असू द्या.

४. चांगल्या आणि योग्य लोकांबरोबर राहा, जे तुमच्यापेक्षा हुशार आहेत. संगतीचा फरक पडतो.

५. पुढे काय होणार हे ठरविण्यापेक्षा मागे झालेल्या गोष्टींचा आढावा घेणे सोपे आहे.

६. ठीकठाक कंपनी चांगल्या किमतीला घेण्यापेक्षा चांगली कंपनी ठीकठाक किमतीत घ्या.

७. मोठी स्वप्ने बघा आणि त्यांना प्रत्यक्षात कसे उतरवता येईल यावर नेहमीच लक्ष ठेवा.

८. अशी गुंतवणूक करा की, पुढे १० वर्षे जर शेअर बाजार बंद राहिला तरी चालेल.

९. गुंतवणूक करताना दीर्घकाळाचा विचार करा.

१०. गृहपाठ चांगला असेल तर गुंतवणूक सोपी आहे. अन्यथा लोक सोप्या गोष्टींना क्लिष्ट करतात.

११. प्रत्येक वेळी काही न काही केलंच पाहिजे असे नसते. कधी कधी नुसतेच बसून योग्य संधीची वाट पाहणे योग्य ठरते.

१२. तुम्हाला जे मिळाले त्यातून समाजाला परत द्या.

१३. स्वत:चे अंदाज बांधा, दुसऱ्याचे अंदाज हे तुमचे भविष्य सांगू शकत नाही.

१४. नाही म्हणायची सवय लावा. नेहमी हो म्हणणारे बहुतेक वेळा फसतात.

१५. अल्पकालीन गुंतवणुकीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक करा. जो शेअर १० वर्षांसाठी घेणार नसाल, तो     १० मिनिटांसाठीही घेऊ नका.

सूचना:

हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत आणि संपूर्ण माहिती मिळवूनच गुंतवणूक करावी. तुमच्या फायदा किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

* या सदरामधे गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.

* सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.

* यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले  जातील. परंतु त्याचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.

* गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर नियमांचा आढावा घ्या.