भावभावनांचे हिंदोळे हे बाजाराला नवे नाहीत आणि हा भावनावेगांचा प्रवाह कधीच एकसारखा नसतो हा बाजाराचा आणखी एक विशेष. सध्याच्या आवेगांचा प्रवाह हा पुन्हा लार्ज कॅप गुंतवणुकीकडे वळलेला दिसतो. बाजारातील नजीकची सुधारणा या बिनीच्या ‘मौल्यवान’ समभागांच्या खरेदीची संधीच ठरावी..
बाजारात अलीकडच्या उत्साही उधाणाचे नेतृत्व बिनीच्या अर्थात लार्ज कॅप समभागांकडून झालेले दिसून आले. विशेष म्हणजे दुसऱ्या व मागच्या फळीतील (मिड आणि स्मॉल कॅप) समभागांच्या तुलनेत वाजवी मूल्यांकनाला हे समभाग उपलब्ध होते. साहजिकच गुंतवणूकदारांच्या त्यांच्या खरेदीसाठी उडय़ा पडल्या. तिमाही निकालांचा हंगाम सरत असताना अनेक बडय़ा कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीने चांगली सुधारणा दर्शविली. अर्थव्यवस्था उभारी घेत असून, येणाऱ्या तिमाहींमध्ये कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीने लक्षणीय कलाटणी घेणे क्रमप्राप्तच दिसते.
बाजाराचा बदललेला हा कल निर्देशांकांच्या कामगिरीतूनही जोखता येईल. लार्ज कॅप समभागांचे प्रतिनिधित्व करणारा निफ्टी ५० निर्देशांक गत महिनाभरात ४.२२ टक्क्यांनी वधारला. त्या उलट निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकात याच काळात अवघी ०.५६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
फेब्रुवारी २०१६ पर्यंत बाजारातील कल वेगळा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतीत तीव्र उतार सुरू होता. जानेवारीत तर त्यांनी एका तपाचा तळ गाठला होता. जागतिक अर्थव्यवस्थेवर दाटलेल्या मंदीचे मळभ आणि मागणीच्या अभावाचेच हे द्योतक. परिणामी, दिग्गज विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला. त्यांची गुंतवणूक असलेल्या लार्ज कॅप समभागांच्या विक्रीचा सपाटा सुरू होता. परिणामी, उत्तरोत्तर लार्ज कॅप आणि मिड कॅप समभागांमधील मूल्यांकन तफावत रुंदावत गेली. साहजिकच विक्रीचा मारा सुरू असलेले लार्ज कॅपचे मूल्य आकर्षक बनले. सद्य तेजीपश्चातही लार्ज कॅप समभागांचे किंमत/ उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर हे १९ पट, तर मिड कॅप समभागांबाबत ते २५ ते २६ पट असे महागडे आहे.
आता खनिज तेलाच्या किमतींनी पिंपामागे ३० डॉलरवरून ५० डॉलपर्यंत फेर धरला आहे. त्याच वेळी पाठ फिरलेले विदेशी गुंतवणूकदार उभरत्या अर्थव्यवस्थांच्या विशेषत: समभाग गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. जगातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था या नात्याने भारताकडे यापैकी अधिकाधिक गुंतवणुकीचा ओघ वळणे क्रमप्राप्तच आहे. विदेशी गुंतवणुकीचा प्रमुख रोख हा अर्थातच लार्ज कॅप समभागांवरच केंद्रित असेल.
अर्थव्यवस्थेतील गती घ्यावी असे अनेक घटक दृष्टिपथात आहेत. दमदार पावसाचे कैक लाभ अर्थव्यवस्थेला होतील. महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांचा मार्गही सुकर बनेल अशी चिन्हे आहेत. अर्थगतीत वाढीचे थेट लाभार्थी म्हणून आघाडीच्या कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीतही आनुषंगिक बदल निश्चितच दिसतील. त्यामुळे त्यांचे मूल्यांकन आणखीच आकर्षक बनेल आणि आजच्या तुलनेत त्यांना खूप चांगला भाव मिळण्याची पक्की शक्यता दिसून येते. म्हणून आज खूपच खालच्या भावात उपलब्ध या समभागांना हेरून नजीकच्या भविष्यातील सुगीत त्याची मधुर फळे चाखण्याची नामी संधी गुंतवणूकदारांना आहे.
बाजारावरील बाह्य़ घडामोडींचा प्रभाव जरूर राहील. नजीकच्या दिवसांत अमेरिकेची मध्यवर्ती बँक -‘फेड’चा व्याजदरासंबंधीचा निर्णय, तर युरोपीय संघाच्या अभेद्यतेची कसोटी पाहणाऱ्या ब्रिटनधील सार्वमताचा कौलाचा (ब्रेग्झिट) बाजारात अस्थिरता निर्माण करणारा परिणाम दिसेल, परंतु तो तात्पुरताच असेल. किंबहुना, आपली नजर असलेल्या लार्ज कॅप समभागांचा भाव घसरलेला दिसल्यास, ती खरेदी नामी संधी मानली जायला हवी.
लार्ज कॅपच का? हा प्रश्नही स्वाभाविक आहे. कमी जोखीम, सुस्थिर पाया आणि छोटय़ा कंपन्यांच्या तुलनेत या समभागांमध्ये अस्थिरताही कमी हे याचे सोपे उत्तर आहे.
जोखमीबाबत दक्ष असलेल्या गुंतवणूकदारांनी थेट समभागांऐवजी म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबिणेही उपयुक्त ठरेल. अपेक्षित आर्थिक उभारी कोणत्या गतीने होईल, कोणत्या उद्योग क्षेत्रात परिणामकारकपणे दिसेल, त्या उद्योग क्षेत्रातील कोणते समभाग गुंतवणुकीसाठी निवडावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे सामान्य गुंतवणूकदारांच्या कुवतीबाहेरची आहेत. हे काम तज्ज्ञ निधी व्यवस्थापकानेच करणे अधिक सयुक्तिक ठरेल.
त्यामुळे सल्ला हाच की, लार्ज कॅप आणि ब्ल्यूचिप म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीसाठी निवडाव्यात. एकरकमी मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा, नियमित थोडी-थोडकी, मुख्यत: ‘एसआयपी’ धाटणीची आणि शक्यतो दीर्घावधीची गुंतवणूक फायद्याचीच ठरेल.
पंकज मठपाल
(लेखक, ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे व्यवस्थापकीय संचालक)