13 December 2018

News Flash

माझा पोर्टफोलियो : मारुतीचे ‘शेपूट’ वाढता वाढता वाढे!

हरयाणातील गुरगाव आणि मानेसर येथे कंपनीचे चार अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत.

वर्ष १९८७ मध्ये स्थापन झालेली जय भारत मारुती म्हणजे जेबीएम समूह आणि मारुती सुझुकीचा संयुक्त प्रकल्प. जेबीएम आणि मारुती या दोन्ही प्रवर्तकांचा कंपनीच्या भागभांडवलात समान हिस्सा आहे. साहजिकच मारुती सुझुकी ही मुख्य ग्राहक असून कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ८५ टक्क्यांहून अधिक हिस्सा मारुतीचा आहे. हरयाणातील गुरगाव आणि मानेसर येथे कंपनीचे चार अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीचे मुख्य उत्पादन शीट मेटल असले तरीही कंपनी आता वाहनाच्या इतरही सुटय़ा भागांचे उत्पादन ती करते. यात प्रामुख्याने एक्झॉस्ट सिस्टीम, एक्सेल, फ्यूएल फिल्टर आदींचा समावेश करता येईल. भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीवर जय भारत मारुतीची मदार असणे हा धोका तसेच फायदाही ठरू शकतो. मारुतीने गुजरातमध्ये सुरू केलेला प्रकल्प कंपनीसाठी फायद्याचा ठरेल. येत्या तीन-चार वर्षांत मारुती सुझुकी अनेक नवीन मॉडेल्स भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणेल याचाही फायदा कंपनीला निश्चित होईल. सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविणाऱ्या या कंपनीच्या शेअरच्या भावातही गेल्या सहा महिन्यांत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर २०१७ साठी संपणाऱ्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत २१५ टक्के वाढ साध्य केली असून ती ४१९.५६ कोटी रुपयांवर गेली आहे. तर नक्त नफ्यात २५ टक्के वाढ होऊन तो १६.६२ कोटी रुपयांवर गेला आहे. उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक, मारुती सुझुकीचे विस्तारीकरण तसेच आगामी काळातील योजना याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होईल. सध्या तेजीत असलेला हा शेअर ५९० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. मूल्यांकनाचे पारंपरिक निकष लावता, हा शेअर थोडा महाग असला तरीही मध्यम कालावधीसाठी खरेदीयोग्य वाटतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on December 25, 2017 12:37 am

Web Title: jay bharat maruti portfolio by ajay walimbe