23 January 2018

News Flash

प्रधान मंत्री वय वंदना योजना लक्षात घ्यावयाच्या ठळक बाबी

या योजनेत गुंतवणुकीची कमाल आणि किमान मर्यादा ठरविण्यात आली आहे.

व्यापार प्रतिनिधी | Updated: July 24, 2017 5:21 AM

निश्चित व्याजदराने पेन्शन आणि १० वर्षांनंतर गुंतलेल्या रकमेची परतफेडही अशी ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच एक आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. विशेषत: बँकांच्या ठेवींवरील व्याजदर घसरत असताना, नियमित व निश्चित स्वरूपाचे उत्पन्न देणारा हा पर्याय ज्येष्ठांना खूपच उपयुक्त ठरेल.

या योजनेवर एक दृष्टिक्षेप..

* शुक्रवार, २१ जुलै २०१७ रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘प्रधान मंत्री वय वंदना योजने’ची औपचारिक लोकार्पण केले. प्रत्यक्षात तिची विक्री ४ मे २०१७ पासून ‘एलआयसी’कडून सुरू झाली आहे. ही योजना ३ मे २०१८ पर्यंत गुंतवणुकीस खुली राहील.

* एलआयसीने ४ मे २०१७ पासून २० जुलैपर्यंत ५८,१५२  जणांना या योजनेची विक्री केली असून, त्यायोगे २,७०५ कोटी रुपये उभे केले आहेत.

* वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.

* सरकारची ही योजना एलआयसी मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेला वस्तू व सेवा करातून वगळण्यात आले आहे (हा कर एरव्ही विमा अथवा पेन्शन योजनेच्या हप्त्यांवर लागू आहे.) योजनेत हमी दिलेला व्याजदर आणि एलआयसीला प्रत्यक्षात लाभ आणि प्रशासन खर्च यात तफावत राहत असल्यास त्याची सरकारकडून भरपाई केली जाईल. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली गेली आहे.

* या योजनेंतर्गत लाभार्थ्यांस गुंतवणुकीवर वार्षिक ८ टक्के दराने १० वर्षे पेन्शनची हमी देण्यात आली आहे. मासिक, त्रमासिक, अर्ध वार्षिक आणि वार्षिक पेन्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

* या योजनेत गुंतवणुकीची कमाल आणि किमान मर्यादा ठरविण्यात आली आहे. ही किमान/कमाल मर्यादेची रक्कम लाभार्थ्यांकडून पेन्शनप्राप्तीसाठी निवडण्यात आलेल्या कालावधीनुरूप वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. जर वार्षिक पेन्शन घ्यायची असल्यास किमान रु. १,४४,५७८ तर कमाल रु. ७,२२,८९२ योजनेत गुंतविले जाऊ शकतील. त्या उलट मासिक पेन्शन हवी असणाऱ्यांना किमान रु. १,५०,००० आणि कमाल रु. ७,५०,००० गुंतविणे आवश्यक ठरेल. (तक्ता पाहावा)

* पेन्शनची रक्कम किमान १,००० रुपये प्रति महिना असा योजनेचा प्रयत्न आहे, त्यासाठी दीड लाख रुपये एकरकमी गुंतवावे लागतील. तर योजनेत प्रति महिना पेन्शनची कमाल रक्कम ही ५,००० रुपये निर्धारीत करण्यात आली आहे.

६ योजनेचा १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, पेन्शनधारक हयात असल्यास योजनेची मूळ खरेदी रक्कम (मुद्दल) त्याला अंतिम पेन्शन हप्त्यासह परत केली जाईल.

* या योजनेत गुंतविलेली रक्कम १० वर्षेपूर्ण होण्याआधी केवळ स्वत:च्या व पती किंवा पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी काढता येईल. वैद्यकीय कारणांसाठी रक्कम काढावयाची असल्यास गुंतविलेल्या रक्कमेच्या ९८ टक्क्य़ांपर्यंत रक्कम काढता येईल.

* योजनेच्या कालावधीत आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाची गरज भासल्यास गुंतवणूकदारास रोकड सुलभता तीन वर्षांनंतर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर खरेदी रकमेच्या (मुद्दल) ७५ टक्क्य़ांइतकी रक्कम त्याला कर्ज म्हणून मिळविता येईल. या कर्जावरील व्याज देय पेन्शनमधून कापण्यात येईल.

*  १० वर्षे कालावधीत पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, पूर्ण खरेदी रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस देण्यात येईल.

First Published on July 24, 2017 1:10 am

Web Title: key points of pradhan mantri vaya vandana yojana
 1. P
  Pandurang Desai
  Aug 10, 2017 at 11:45 pm
  Good Scheme
  Reply
  1. A
   Arun
   Jul 24, 2017 at 11:47 am
   साठी पार केल्यावर ७५ पर्यंत निरोगी शरीर हल्लीच्या काळात आयुष्य जगत आहे. पण पुढील १५ वर्षात महागाई सुद्धा तशीच वाढत रहाणार त्यामुळे ५ हजार रुपये महिन्यात दिवस निघणे सोपे नाही. हल्लीच्या दिवसातच कठीण आहे. कमीतकमी १५ हजार प्रति वृद्ध व्यक्ती प्रति महिना पेन्शन येईल याप्रमाणे कमाल गुंतवणूक तिप्पट करायला हवी होती. गेल्या १५ वर्षात सरकारी पगार किती टक्के वाढले त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ह्या योजनेत पुढील वर्षांत जास्तीचे पेन्शन येईल अशी आखणी हवी होती.
   Reply