एल अँड टी इक्विटी सेव्हिंगज फंड

नव्याने म्युच्युअल फंडांचा विचार करू लागलेली मंडळी ही मोठय़ा संख्येने मासिक लाभांश देणाऱ्या बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करीत आहेत. मुदत ठेवी म्हणजे सर्वात सुरक्षित गुंतवणूक असा समज झालेली या मंडळीनी बॅलन्स्ड फंड गुंतवणुकीतील धोका समजावून घेणे गरजेचे आहे.

पंढरीची वारी आहे माझे घरी।

आणिक न करी तीर्थव्रत।।

व्रत एकादशी करीन उपवासी।

गाईन अहर्निशी मुखी नाम।।

नाम विठोबाचे घेईन मी वाचे।

बीज कल्पांतीचे तुका म्हणे।।

ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या सोबतीने आषाढी वारी सुरू आहे. ‘विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप’ असं म्हणत वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वारकऱ्यांची खूण म्हणजे गळ्यात तुळशीची माळ कपाळावर बुक्का आणि एकादशी व्रत. इक्विटी सेव्हिंग्ज फंड हे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एकादशी व्रताप्रमाणे अत्यंत आवश्यक असलेले गुंतवणूक साधन आहे. म्युच्युअल फंड समुदायात इक्विटी सेव्हिंग्ज फंड हा फंड प्रकार नव्याने दाखल झाला असून बहुतेक फंड घराण्यांच्या भात्यात या फंड प्रकाराचा फंड उपलब्ध आहे. ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड’ या प्रकारच्या या फंडात समभाग गुंतवणूक आर्ब्रिटाज व निश्चित उत्पन्न देणारे रोखे या तीन प्रकारच्या गुंतवणुकांचा समावेश असतो.

जुलै २०१४ मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याची व्याख्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडासाठी तीन वर्षे करण्यात आली. त्यामुळे बँकांच्या मुदत ठेवी व तीन वर्षांंच्या आतील रोखे गुंतवणुकीवरील भांडवली नफ्यावरील कर आकारणी एकाच पद्धतीने करण्यात येऊ लागली. एका वर्षांच्या आतील गुंतवणूक व करमुक्त उत्पन्न या गरजेतून इक्विटी सेव्हिंग्ज फंड ही संकल्पना जन्माला आली. वार्षिक ७.०० ते ७.५० टक्के परतावा मिळण्याची शक्यता (खात्री नव्हे) असलेली ही गुंतवणूक बँकांच्या मुदत ठेवी इतकी सुरक्षित नसली तरी समभाग गुंतवणूक असलेल्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडाइतकी धोकादायक नक्कीच नाही.

एल अँड टी इक्विटी सेव्हिंगज फंडाच्या गुंतवणुकीची विभागणी तीन भागात आहे. यापैकी समभाग गुंतवणूक २० ते ३० टक्के दरम्यान असते. हा पोर्टफोलिओ एखाद्या लार्ज कॅप डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडासारखा असतो. भांडवली वृद्धी या उद्देशाने ही गुंतवणूक केली जाते. ३५ ते ७० टक्के आर्ब्रिटाज पोर्टफोलिओ असतो यामध्ये निफ्टी फ्युचर्स विकतात. काही गुंतवणूक निफ्टी निर्देशांकाबाहेरील समभागात असल्याने हे आर्ब्रिटाज पोर्टफोलिओ ‘परफेक्ट हेज्ड’ असे म्हणता येणार नाही. उर्वरित ३० टक्के गुंतवणूक शॉर्ट टर्म फंडाप्रमाणे, उच्च पत असलेल्या व तीन ते पाच वर्षे मुदत असलेल्या रोख्यांतून केली जाते. रोखे व समभाग गुंतवणूकीचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते.

या प्रकारच्या फंडांना दीर्घ इतिहास नाही. परंतु एका विशिष्ट सूत्राप्रमाणे गुंतवणूक केल्यास काय परतावा मिळू शकेल याचा संगणकीय प्रणालीनुसार आभासी पोर्टफोलिओ तयार केल्यास वार्षिक परतावा २.१७ टक्कय़ांपासून ९.२५ टक्के इतका मिळाळा असता. २०१३ सारख्या समभाग गुंतवणुकीवर उणे १० टक्के परतावा असलेल्या कालावधीत २.७५ टक्के तर समभाग व रोखे गुंतवणुकीसाठी नंदनवन ठरलेल्या २०१६ सारख्या वर्षांत ९.२५ टक्के वार्षिक परतावा फंडाकडून मिळविता आला असता असे अनुमान काढता येईल.

म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा कल असे दर्शवितो की, अनेक गुंतवणूकदार पहिल्यांदाच गुंतवणूक करीत आहेत. कारण येणाऱ्या अर्जासोबत ‘केवायसी’चा अर्ज फंडाकडे येत असतो. ही नव्याने म्युच्युअल फंडांचा विचार करू लागलेली मंडळी ही मोठय़ा संख्येने मासिक लाभांश देणाऱ्या बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करीत आहेत. मुदत ठेवी म्हणजे सर्वात सुरक्षित गुंतवणूक असा समज झालेली या मंडळीनी बॅलन्स्ड फंड गुंतवणुकीतील धोका समजावून घेणे गरजेचे आहे. अनेक बँकेचे ठेवीदार एका वर्षांसाठी गुंतवणूक करतात. व्याज खर्चासाठी वापरतात व मुद्दल पुन्हा मुदत ठेवीमध्ये गुंतवितात. या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवींवरील व्याजाइतका परतावा आणि शून्य करदायीत्व असलेली भांडवली लाभ देणारी ही योजना बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा थोडी अधिक धोक्याची आहे. शून्य करदायीत्व असलेला व नियमित मासिक उत्पन्न मिळविता येण्याची सोय या फंडात उपलब्ध आहे. व्याज हे उत्पन्नाचे साधन असलेल्या गुंतवणूकदरांसाठी ही आजची शिफारस..

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)