मरणाचे स्मरण असावे।

हरिभक्तीस सादर व्हावे।

मरोन कीर्तीस उरवावे।

येणे प्रकारें।

प्रपंच आणि परमार्थ या दोघांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे सांगणाऱ्या समर्थाच्या दासबोधातील बाराव्या समासातील ही ओवी. आयुष्य जगत असताना जन्माला आलेली अनेक मंडळी अमरत्व घेऊन आल्याप्रमाणे वागत असतात. म्हणूनच समर्थ रामदास मृत्यूच्या शाश्वत सत्याची जाणीव करून देतात. या जगात जन्मास आलेल्यास मृत्यू हा अटळ आहे, म्हणूनच या जगास ‘मृत्युलोक’ असेच म्हटले जाते. मरणाचे स्मरण असणे म्हणजे मरणाच्या भीतीने जीवन व्यतीत करणे नव्हे. ज्या अनंत क्षुल्लक बाबींना अवास्तव महत्त्व देऊन आपण आपले अनमोल आयुष्य व्यर्थ दवडत असतो त्या बाबी मनातून झटकून टाकण्यासाठी व जीवनाचे अंतिम ध्येय (समर्थाच्या लेखी जे ईश्वरी साधना होती) यासाठी मरणाचे स्मरण आवश्यक आहे. मृत्यू हा शाश्वत आहे तितकाच अकस्मात आहे. मृत्यू कोणाला कधी येईल हे सांगता येत नाही. यासाठी आपले इच्छापत्र करणे गरजेचे आहे.

अनेकांची अशी समजूत आहे की, जे कोणी धनाढय़ आहेत त्यांनाच त्यांचे इच्छापत्र करणे गरजेचे आहे. या गैरसमजुतीमुळे, अनेक मंडळी इच्छापत्र करीत नाहीत. वास्तविक केवळ अचल मालमत्ताच नव्हे तर आपल्या हक्कांचेसुद्धा हस्तांतरण आपल्या उत्तराधिकाऱ्याकडे होणे गरजेचे असते. एखाद्या व्यक्तीचे मृत्युपत्र केलेले नसताना न करता निधन झाले तर मालमत्तेचे विभाजन वारसदारांमध्ये (वारसा हक्क कायद्यान्वये – Law of Succession ) मृत व्यक्तीच्या धर्माच्या तरतुदीनुसार केले जाते. भारतातील वारसा हक्कांबाबतचे कायदे किचकट असल्याने जर एखादी व्यक्ती या मृत्युपत्र केलेले नसताना, न करता मेली तर न्यायव्यवस्था कायद्याचा अर्थ लावत मालमत्तेचे वारसांकडे हस्तांतरण करते. हे होत असताना वारसांपैकी एखाद्यावर अन्याय होणे नाकारता येत नाही. किंवा उपयुक्त नसलेल्या एखाद्या हक्काचे किंवा मालमत्तेचे हस्तांतरण होण्याची शक्यता असते. यासाठी हयात असताना मृत्युपत्र करणे कुटुंबाच्या दृष्टीने हिताचे असते.

एखाद्या मालमत्तेसाठी केलेले नामनिर्देशन व मृत्युपत्र यापैकी न्यायव्यवस्था मृत्युपत्राला प्राधान्य देते. जो मृत्युपत्र करतो, त्याने त्याची स्मरणशक्ती शाबूत असताना केले आहे, यासाठी या मृत्युपत्रावर दोन साक्षीदारांच्या सह्या असणे गरजेचे असते. हे दोन साक्षीदार मृत्युपत्राचे लाभार्थी किंवा लाभार्थ्यांच्या रक्ताचे नातेवाईक नसावेत. उदारणार्थ, वडील आपल्या मुलाला आपल्या संपत्तीचा एखादा हिस्सा देणार असतील तर त्या मृत्युपत्रावर त्या मुलाच्या पत्नीची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी नसावी; परंतु या गोष्टी सापेक्ष आहेत. इच्छापत्र नोंदणीकृत असण्याची आवश्यकता नाही. इच्छापत्राबाबत काही गैरसमज आढळतात. इच्छापत्र मुद्रांक कागदावर (स्टॅम्प पेपर) असावा असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात स्टॅम्प पेपरवरच काय; परंतु कायदेशीर दस्तऐवज ज्या हिरव्या लेजरपेपरवर असतात, त्या लेजरपेपरवरही इच्छापत्राचा मजकूर असण्याची आवश्यकता नाही. एका कागदावर मृत्यूपश्चात मालमत्तेच्या विभाजनाचा तपशील असावा. ज्या मालमत्तेवर आपली मालकी नाही त्या मालमत्तेचे आपल्या वारसदारांमध्ये विभाजन करण्याचा आपल्याला अधिकार नाही. अशा परिस्थितीत मिळालेल्या हक्कांचे हस्तांतरण करता येते. उदारहणार्थ एखाद्या भाडय़ाच्या जागेचे मालकी हक्क जरी नसले तरी भाडे अधिकारचे हस्तांतरण करणे गरजेचे आहे. तुमच्या पैशाने विकत घेतलेल्या सर्व मालमत्ता, वारसा हक्कांनी मिळालेल्या मालमत्ता, आपला अधिकार असलेल्या अन्य मालमत्तांचे हस्तांतरण मृत्युपत्रामार्फत करता येते. नामनिर्देशन केले याचा अर्थ मृत्युपत्राची गरज नाही असे नाही. नामनिर्देशित व्यक्ती व वारस या दोन संकल्पना कायद्याच्या संदर्भात वेगवेगळ्या आहेत. नामनिर्देशानामुळे व्यवस्थापनाचा अधिकार मिळतो, मालकी हक्क नव्हे. इच्छापत्रासाठी एक व्यवस्थापक असणे गरजेचे असते.

सध्याच्या डिजिटल युगात मृत्युपत्र डिजिटलरूपात अर्थात ऑनलाइन पद्धतीने करता येते. अशा सेवा देणारी अनेक संकेतस्थळे आहेत. लीगलजिनी, एनएसडीएल ई गव्हर्नन्स यांसारख्या सेवापुरवठादरांनी सुलभ इच्छापत्र तयार करण्याची सुविधा देऊ  केली आहे. सीडीएसएलकडेसुद्धा ‘माय इझी विल’ ही सेवा उपलब्ध आहे. मोठय़ा संख्येने इच्छुक याचा लाभ घेत आहेत. इच्छापत्राच्या बदलत्या संकल्पनेनुसार बौद्धिक तसेच डिजिटल मालमत्तांचा समावेश इच्छापत्रात होणे गरजेचे असते. ऑनलाइन पद्धतीने इच्छापत्र करणाऱ्या सेवा पुरवठादार या सर्व मालमत्तांचा समावेश इच्छापत्रात करण्याची सुविधा देत असतात. डिजिटलरूपात अर्थात ऑनलाइन पद्धतीने इच्छापत्र करण्याचा कालावधी सुमारे दोन आठवडय़ांचा असतो. काळाला अनुसरून या पद्धतीने आपण आपले इच्छापत्र तयार करू शकतो.

वकील किंवा वर उल्लेख केलेल्या ऑनलाइन पद्धतीने इच्छापत्र करून देणाऱ्या कंपनीस आपल्या मालमत्तांचा तपशील सादर केल्यानंतर चार-पाच दिवसांत इच्छापत्र करू इच्छिणाऱ्या व्यक्तीस प्रस्तावित इच्छापत्राचा मजकूर असलेला खर्डा पाठविला जातो. हा मजकूर काळजीपूर्वक वाचून आपल्याला जे अपेक्षित आहे तेच मजकूर विनीत करीत असल्याची खात्री करावी. वर उल्लेख केल्याप्रमाणे मृत्युपत्राची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीची इच्छापत्राचे व्यवस्थापक म्हणून काम करण्यास हरकत नसावी. स्वत: स्वाक्षरी करून दोन साक्षीदारांच्या सह्या घेऊन इच्छापत्राचा कागद लखोटय़ात बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. इच्छापत्र करण्यास वयाचा विचार न करता शक्य तितक्या लवकर इच्छापत्र करणे गरजेचे आहे.

मृत्यूपत्र : हे महत्त्वाचे!

  • धनाढय़ आहेत त्यांनाच मृत्युपत्र करणे गरजेचे आहे, हा गैरसमज.
  • स्टॅम्प पेपरवरच काय, कायदेशीर दस्तऐवज ज्या हिरव्या लेजरपेपरवर असतात, त्या लेजरपेपरवरही मृत्युपत्राचा मजकूर असणे आवश्यक नाही.
  • नामनिर्देशित व्यक्ती व वारस या दोन संकल्पना कायद्याच्या संदर्भात वेगवेगळ्या आहेत.
  • मालमत्तेसाठी केलेले नामनिर्देशन व मृत्युपत्र यापैकी न्यायव्यवस्था मृत्युपत्राला प्राधान्य देते.
  • सध्याच्या डिजिटल युगात मृत्युपत्र डिजिटलरूपात अर्थात ऑनलाइन पद्धतीने करता येते.
  • मृत्युपत्र करण्यास वयाचा विचार न करता शक्य तितक्या लवकर ते करणे गरजेचे आहे.

AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.