26 September 2020

News Flash

गाजराची पुंगी : ‘लक्ष्मी’ची पावले..

बँक मोठा हिस्सा गुंतवणूकदारांना विकून ५०० कोटी भांडवल उभारणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा! सध्या मिड कॅप शेअर्सचे वाढलेले अवाच्या सव्वा भाव वाढले आहेत. हे बघता मिड कॅप मध्ये अजून दम राहिला आहे असे तुला वाटते काय? या बाबत तुझे काय मत आहे हे जाणून घेण्यास वाचक गुंतवणूकदार उत्सुक आहेत. या  प्रश्नाचे उत्तर जर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला प्रश्न केला.

‘‘हे पाहा आपल्या बाजारात ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’अशी वृत्ती चालत नाही. पण दुर्दैवाने अनेक गुंतवणूकदार याच मनोवृत्तीचे असतात. कोणी मला टीप देईल मग मी शेअर घेईन. नंतर ते वर जातील. मग मला त्यातून नफा होईल.. असे चालत नाही. ‘आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ हे खरे असते तरी मेहनतीने स्वर्गसुखाची जिवंतपणी सुद्धा प्राप्ती होते. त्यासाठी ‘आयत्या पिठावर रेघोटय़ा’ मारून चालत नाही. ‘उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी’ या न्यायाने कामात व्यग्र असायला हवे. दिसामाजी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे, हे समर्थ वचन यशस्वी गुंतवणूकदाराला अगदी लागू पडते. वर्तमानपत्राचे वाचन तर हवेच, पण आजूबाजूला दिसणारे बदल सजगतेने टिपता यायला हवेत. अनेकदा  गुंतवणूकदारांनी अनभिज्ञतेतून खरेदी केलेले शेअर खाली जातात. मग या लोकांना बाजार म्हणजे सट्टा वाटतो. ‘आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा’ असे असून चालत नाही. दूध काढायचे तर त्या साठी दुभती म्हैस असावी लागते. अशाच एका दूध देणाऱ्या म्हशीचा तुला आज मी परिचय करून देणार आहे,’’ राजा म्हणाला.

राजा पुढे म्हणाला, ‘‘बाजारातील खबऱ्यांकडून मिळालेल्या बातमीनुसार जाणत्या गुंतवणूकदरांनी लक्ष्मी विलास बँकेत रस घेण्यास सुरुवात केली आहे. बँक मोठा हिस्सा गुंतवणूकदारांना विकून ५०० कोटी भांडवल उभारणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. येस बँकेने ‘नो’ म्हटल्यामुळे जो फियास्को झाला त्या पाश्र्वभूमीवर या बातमीला महत्त्व आले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे पार्थसारथी मुखर्जी यांनी स्वीकारल्यापासून त्यांनी बँकेच्या विस्ताराच्या योजना आखल्या आहेत. मुखर्जी यांनी पदाची सूत्रे स्वीकारून एक वर्षांहून अधिक काळ झाला आहे. बँकेचा या पुढील केंद्रबिंदू किरकोळ ग्राहकांना कर्ज वाटप व बँकेत्तर सेवांसाठी शुल्करूपात मिळणारे उत्पन्न असणार आहे. या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत बँकेच्या कर्ज वाटपात व व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत बँकेच्या परिचालन नफ्यात ५५ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. खर्चाबाबत बोलायचे तर परिचालन खर्चात वाढ झालेली दिसली ती भारतीय बँक महासंघ अर्थात आयबीए आणि  बँक कर्मचारी संघटना यांच्यात कर्मचारी वेतन वाढीचा करार झाल्यामुळे ही खर्चात मोठी वाढ दिसत आहे. अनुत्पादित कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत २९ कोटी रुपयांवरून ३३ कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे.’’

‘‘बँक प्रगतीपथावर आहे आणि आगामी वर्षभरात बँकेच्या कर्जात १५ टक्के तर नफ्यात २२ टक्के वाढ दिसून येईल. हा शेअर तीन ते पाच वर्षे ठेवण्याच्या हेतूने घेतल्यास १२ ते १५% दराने भांडवली नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे,’’ राजाने आपला अभिप्राय दिला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

gajrachipungi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 1:06 am

Web Title: laxmi vilas bank
Next Stories
1 फंड विश्लेषण : भरभराटीचे मल्टी कॅप..
2 माझा पोर्टफोलियो : संरक्षण खर्चातील वाढीचा लाभ जरूरच!
3 कर समाधान : गुंतवणूक सवलत फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठीच!
Just Now!
X