News Flash

नव्या युगाचे बचत खाते लिक्विड फंड

म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेतील सर्वाधिक मालमत्ता ही लिक्विड फंड प्रकारात आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने आपल्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवरील व्याज कमी केल्याच्या बातमीला आर्थविषयक वार्ताकन करणाऱ्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले. स्टेट बँकेने बचत खात्यातील १ कोटी रुपयांपेक्षा कमी शिलकीवर व्याजाचा दर घटवून ४ टक्कय़ांवरून ३.५० टक्के केला. गौरी पवार या स्टेट बँकेच्या बचतखातेधारक आहेत. तरीसुद्धा गौरी पवार यांना या बदललेल्या धोरणाचा फटका बसणार नाही. कारण दर महिन्याचे वेतन मिळाल्यावर गरजेपुरते पैसे आपल्या बचत खात्यात राखून गौरी आणि त्यांचे पती घनश्याम ही सर्व रक्कम आपापल्या म्युच्युअल फंडाच्या लिक्विड खात्यात जमा करतात. दर आठवडय़ाच्याला सुरुवातीला मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने त्या आठवडय़ाच्या खर्चाइतकी रक्कम लिक्विड फंडाच्या खात्यातून बचत खात्यात जमा करण्याचा पायंडा गौरी आणि घनश्याम यांनी पडला आहे.

स्टेट बँकेच्या या दर कपातीचे परिणाम केवळ स्टेट बँकेच्या खातेदारांपुरते मर्यादित न राहता सर्वच बँका नजीकच्या काळात बचत खात्यावरील शिलकीवर देय व्याज दरात कपातीचे पाऊल उचलतील असे वाटते. या धोरणाचा फटका बसू नये असे वाटणाऱ्या खातेधारकांसाठी लिक्विड फंड हा ‘स्मार्ट पर्याय’ आहे.

लिक्विड फंड काय आहेत?

म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेतील सर्वाधिक मालमत्ता ही लिक्विड फंड प्रकारात आहे. लिक्विड फंड हा म्युच्युअल फंडाचा असा प्रकार आहे, जो या फंडाचा निधी, ‘मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स’ या प्रकारात गुंतवितो. बँकांच्या सीडी, कॉर्पोरेट सीपी, भारत सरकारची ट्रेझरी बिल्स, यांचा समावेश ‘मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स’ या प्रकारात मोडतो. मुदतपूर्तीसाठी ९१ दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक असलेल्या रोख्यांत लिक्विड फंडांना गुंतवणूक करणे सक्तीचे असते.

गुंतवणूक वैशिष्टय़े:

गुंतवणूकदारांसाठी लिक्विड फंडाचे वैशिष्टय़े म्हणजे यात गुंतवणुकीच्या कालावधीबाबत कमाल वा किमान अशी कोणतीही सक्ती नसते. बँकांच्या कामकाजाच्या दिवशी गुंतवणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ही त्या दिवसापुरती गुंतवणुकीसाठी सीमा असते. एखाद्या गुंतवणूकदाराने शुक्रवारी दुपारी २ वाजता गुंतवणूक केली व २ वाजून ५ मिनिटांनी पैसे काढून घेण्यासाठी विनंती केली तर त्या गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात सोमवारी सकाळी १० च्या सुमारास पैसे तीन दिवसांच्या गुंतवणुकीवरील नफ्यासकट जमा होतील.

लिक्विड फंडात गुंतविलेल्या रकमेवरील परतावा रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दराशी निगडीत असतो. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर वाढविला तर लिक्विड फंडांचा परतावा वाढतो व रेपो दर कमी केल्यास परतावा कमी होतो. सर्वसाधारणपणे लिक्विड फंडाचा परतावा रेपो दरापेक्षा थोडा अधिक असतो. खालील कोष्टकात लिक्विड फंडांची १ ऑगस्टच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही प्रमाणे विविध कालावधीतील परतावा कामगिरी दिली आहे.

लिक्विड फंड निवडीचे निकष :

लिक्विड फंडानी गुंतवणूक केलेल्या रोख्यांची मुदतपूर्ती ९१ दिवसांपेक्षा अधिक नसल्याने लिक्विड फंड बाजारातील चढ उतारांना सर्वात कमी प्रतिसाद देणारे असतात. परिणामी मुद्दलाची सर्वात कमी जोखीम असलेला हा गुंतवणूक प्रकार आहे. लिक्विड फंडाची गुंतवणुकीसाठी निवड करतांना अन्य म्युच्युअल फंडाप्रमाणे केवळ परताव्याचा दर न पाहता गुंतवणूक केलेल्या रोख्यांची पत तपासणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे फंडाची मालमत्ता (एयूएम), निधी व्यवस्थापक, त्याच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या अन्य योजना याचा तपशील विचारात घेणे गरजेचे असते.

लिक्विड फंडांच्या अंतर्गत वृद्धी (ग्रोथ) आणि लाभांश (डिव्हीडंड) हे विकल्प असतातच, या व्यतिरिक्त डेली डिव्हीडंड अर्थात रोज लाभांश जाहीर करणारे, विकली डिव्हीडंड म्हणजे साप्ताहिक लाभांश जाहीर करणारे, मंथली डिव्हीडंड म्हणजे मासिक लाभांश जाहीर करणारे विकल्पही उपलब्ध आहेत. लिक्विड फंडातून मिळणारा लाभांश गुंतवणूकदारासाठी जरी करमुक्त असला तरी फंडाला २८.३२५ टक्के लाभांश वितरण कर भरावा लागतो. गुंतवणूकदाराच्या कर कक्षेनुसार व गुंतवणूकदाराच्या रोकड सुलभतेच्या गरजेनुसार, लाभांश किंवा वृद्धी यापैकी योग्य पर्यायाची निवड तो करू शकतो. लिक्विड फंडात केलेली गुंतवणूक तीन वर्षांपश्चात काढून घेतल्यास झालेल्या भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनचा लाभ मिळून गुंतवणूकदारांचे कराचे प्रमाण नगण्य अथवा किमान राखता येऊ शकते.

गुंतवणुकीची पद्धत:

लिक्विड फंडातील गुंतवणूक प्रक्रिया अन्य फंडाप्रमाणे आहे. ज्या गुंतवणूकदाराने केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे व ज्याचा म्युच्युअल फंडात फोलिओ (खाते) आहे असा गुंतवणूकदार, मोबाईल अ‍ॅपच्या साहाय्याने गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. त्यासाठी फंडाच्या किंवा सल्लागाराच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही.

लिक्विड फंडात गुंतवणूक करण्याचा व पैसे काढून घेण्याचा अनुभव असा सहज, सरळ आणि रंजक आहे. बँकेत जसे सर्वाचेच खाते असते तसेच लिक्विड फंडात गुंतवणुकीचा अनुभव सर्वानीच घेणे गरजेचे आहे.

बँक खात्यापेक्षा तत्पर ‘इंस्टंट रिडम्प्शन’ सुविधा

* ‘सेबी’ने चालू वर्षांत फंड घराण्यांना लिक्विड फंडाच्या योजनांपैकी किमान एक योजनेत ‘इंस्टंट रिडम्प्शन’ सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक फंड घराण्याकडे अशी एक योजना आहे ज्या योजनेत ‘इंस्टंट रिडम्प्शन’ सोय उपलब्ध आहे. आजवर लिक्विड फंड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडातून गुंतवणूक काढून घेण्यासाठी दुपारच्या तीन वाजण्याच्या आत विनंती केल्यास, गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात कामकाजाच्या पुढील दिवशी रक्कम जमा होत असे. मात्र ‘इंस्टंट रिडम्प्शन’ सुविधेअंतर्गत दररोज कमाल ५० हजार रुपये किंवा योजनेतील शिल्लक रकमेच्या ९५ टक्के यापैकी जी रक्कम जास्त असेल ती केव्हाही (रात्री १२ वाजता सुद्धा) काढता येते. रक्कम काढण्याची विनंती अ‍ॅपच्या किंवा इंटरनेटद्वारे नोंदविल्यावर रक्कम १० ते १५ मिनिटात गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमाही होते.

* लिक्विड फंडाशी संलग्न डेबीट कार्डाची सुविधा म्युच्युअल फंडांनी सुरू केली आहे. अगदी बँकांच्या डेबीट कार्डाप्रमाणे या कार्डाचा वापर करता येतो. अगदी एटीएममध्ये जाऊन रोखही काढता येते.

* म्हणजेच बँक बचत खात्याप्रमाणे सर्व सुविधा, सार्वत्रिक वापर शक्य असलेले एटीएम / डेबीट कार्ड आणि बचत खात्यापेक्षा सरस परतावा असे लिक्विड फंडात गुंतवणुकीचे फायदे आहेत.

* त्यामुळे वित्तीय नियोजक दरमहा होणारे वेतन हे बँक खात्यात जमा झाल्यासरशी लिक्विड फंडात जमा करण्याचा सल्ला देतात. ‘इंस्टंट रिडम्प्शन’ची सुविधा आणि एटीएम/डेबीट कार्डामुळे गरज पडेल तेव्हा गुंतलेला निधी सहजतेने वापरात येईल. महिनाअखेर लिक्विड फंडात शिल्लक रक्कम दीर्घावधीच्या गुंतवणुकीसाठी निवडलेल्या इक्विटी अथवा बॅलन्स्ड फंडात हस्तांतरीत करता येऊ शकतो.

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

arthmanas@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 1:02 am

Web Title: liquid fund an alternative to savings bank account
Next Stories
1 फंड जिज्ञासा  : ‘एसटीपी’ गुंतवणूक पद्धतीत कर भरावा लागतो काय?
2 माझा पोर्टफोलियो  : मेक इन इंडिया, जीएसटीचा सकारात्मक परिणाम
3 अर्थ.. मशागत : आयपीओ : समृद्धीची गुरुकिल्ली
Just Now!
X