13 December 2017

News Flash

नियोजन भान.. : थोडा दूरचा विचार करू या..

पाण्यापरी पैसा जात होता, पण कारण काही कळतंच नव्हतं. बिच्चारी जिग्ना हैराण झाली आहे.

तृप्ती राणे | Updated: March 20, 2017 3:58 AM

संग्रहित छायाचित्र

आज खरं तर कामावर जायचा खूप कंटाळा आला होता. गेल्या आठवडय़ात होळी होती आणि येणाऱ्या आठवडय़ात गुढी पाडवा आहे. पुन्हा मार्च महिन्याचं कामाचं प्रेशर. कधी एकदा हा महिना संपतोय असं झालं होतं सगळ्या जणींना. त्यात आज जिग्ना आली नव्हती, त्यामुळे बड-बड गाडी बंद होती. सुदैवाने आज ट्रेन मात्र वेळेवर होती आणि परीक्षा चालू असल्यामुळे गाडीला गर्दीही नव्हती. ठाणे स्टेशन आलं आणि सोनल चढली. आज सुगंधाताई नव्हत्या, होळीसाठी गावाला गेल्या होत्या आणि अजून आठवडाभर तरी तिथेच राहणार होत्या. सोनलने सगळ्यांना मस्त गुड मॉर्निंग केल्याबरोबर सगळ्या जरा खूश झाल्या. आज सगळ्यांना शांत पाहून सोनलच्या लक्षात आलं की, जिग्ना नाही आहे. तिने मीनाक्षीला कारण विचारलं. तर म्हणाली – तिच्या मुलाला बरं नाही. तीन दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहे. ताप सारखा येतोय- जातोय. नक्की काय झालंय ते अजून लक्षात आलं नाही. होळीत धम्माल केली होती म्हणे. दिवसभर पाण्यात, रंगात आणि चिखलात खेळत होता आणि कोण काय देईल ते खात होता. दुसऱ्या दिवसापासून त्रास सुरू झाला. वाढत गेला. दोन दिवसांनी शेवटी हॉस्पिटलमध्ये रवानगी.

पाण्यापरी पैसा जात होता, पण कारण काही कळतंच नव्हतं. बिच्चारी जिग्ना हैराण झाली आहे. हे ऐकून सोनलला फार वाईट वाटलं. सर्वाना धीर देत म्हणाली – देव करो आणि तो लवकर बरा होवो. पण मला एक सांग – जिग्नाने आरोग्य विमा काढला आहे का? तिलोत्तमाने पटकन उत्तर दिलं – नाही!!! तिला कित्ती वेळा मी हे सांगितलं होतं, पण म्हणायची एवढय़ा तरुणपणी कशाला हवाय आरोग्य विमा. चाळिशीनंतर बघू असं म्हणून मला गप्प करायची. मग मी पण नाद सोडून दिला. आता तूच समजाव तिला. सोनल म्हणाली- ठीक आहे. मी फोन करते तिला.

चला आता आपण प्रत्येकाच्या यादीवरून पुन्हा एकदा नजर फिरवू या. पहिला नंबर कोणाचा? यास्मिन म्हणाली – माझ्या यादीपासून सुरुवात केली तरी चालेल. तिचं ऐकून सोनलने लगेच यास्मिनची यादी काढली आणि त्यावर तिने केलेलं- सांगायला सुरुवात केली:

यास्मिन अख्तर (४७ वर्षे)
arth05

सोनलचं विश्लेषण हे असं:

यास्मिनवर कुटुंबाची जबाबदारी नसल्यामुळे तिची यादी एकदम सोपी आहे. पण तिच्या नवऱ्याचं आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल तर यास्मिनने स्वत:पुरती यादी बनवणं उचित होईल. परंतु नवऱ्याचं गणित जर चुकलं, तर मात्र निवृत्तीनंतरचा खर्च भागवणं कठीण होईल. म्हणून दोघांचं मिळून आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. आता बघू या यास्मिनने आजवर केलेली गुंतवणूक. सगळा उरलेला पगार हा पीपीएफ, एफडी, आरडी आणि सोन्याचे दागिने घेण्यामध्ये वापरलेला असल्यामुळे त्यावर मिळणारा परतावा जरी अगदी सुरक्षित असला तरी कमी आहे. कमी होणाऱ्या व्याजदरांमुळे पुढे तिच्या गुंतवणुकीला धोका आहे. सोन्याचे दागिने हे तिने मुली आणि सुनेसाठी करून ठेवले आहेत. त्यामुळे ते खर्च आहेत आणि गुंतवणूक नाही. पुन्हा लग्नाच्या वेळेपर्यंत फॅशन बदललेली असल्यामुळे ते मोडून पुन्हा आवडीचे करताना मजुरी वाया जाणार. एफडी आणि आरडी दोघांवर मिळणारं व्याजावर आपण कर भरतो. त्यामुळे पुढे जाऊन वाढत्या महागाई आणि करांमुळे कॉर्पस कमी पडू शकते. बाजूला ठेवलाय तो पैसा पुरेसा आहे का? तो कधी, कसा आणि किती वापरला जाणार आहे, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हे ध्येय एवढय़ा पैशात पूर्ण होईल का? यापुढे तिने सोन्याऐवजी गोल्ड ईटीएफ/ गोल्ड बॉण्ड्स आणि एफडी, आरडीच्या ऐवजी डेट म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक करून आपला पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने तयार करावा.

तीन वर्षांनंतर लागणाऱ्या पैशाची सोय बॅलन्स्ड किंवा इक्विटी म्युचुअल फंडात दरमहा एसआयपीच्या माध्यमातून करावी. पीपीएफला १५ वर्षे होऊन गेली आहेत. ते बंद करून कर प्लॅनिंग करता ईएलएसएस फंडाचा अवलंब करावा.  यास्मिनला आरोग्य विमा घेणं गरजेचं आहे. साधारणपणे ५ लाखाचा आरोग्य विमा तिने घेतला पाहिजे.

तिलोत्तमा म्हणाली आता माझा नंबर.

तिलोत्तमा बॅनर्जी (३७ वर्षे):
arth06

त्यावर सोनलचं विश्लेषण हे असं:

यास्मिनप्रमाणेच तिलोत्तमाच्या आर्थिक नियोजनामध्ये तिच्या नवऱ्याचा वाटा महत्वाचा आहे, किंबहुना जरा जास्तच. तिचं कुटुंब मोठं आहे आणि जबाबदाऱ्या जास्त. म्हणून दोघांचं एकत्र नियोजन गरजेचं आहे. त्या दोघांना त्यांच्या रिटायरमेंटच्या जवळपास बरेच महत्त्वाचे खर्च आहेत. आणि २०,००० प्रति महिन्याच्या बचतीतून हे पूर्ण होणे शक्य नाही. शिवाय मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ठरवलेला आकडा हा कदाचित कमी पडू शकतो. कारण येत्या काळात या क्षेत्रातली महागाई ही दरसाल १०-१५ टक्कय़ांच्या हिशोबाने वाढायचे संकेत मिळत आहेत. म्हणून बचतीचं प्रमाण वाढवणे खूप गरजेचे आहे. यास्मिनप्रमाणेच म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करून हे कुटुंब आपल्या उद्धिष्टांची पूर्तता करू शकतं.

कर नियोजनासाठी पीएफ/पीपीएफ, मुलांची टय़ुशन फी आणि ईएलएसएस फंडाचा वापर करावा. सोन्यामधील गुंतवणुकीचा हिस्सा १०-२० टक्के असावा आणि ते सुद्धा गोल्ड ईटीएफ /गोल्ड बॉण्ड्समध्ये. तिलोत्तमाकडे आरोग्य विमा फक्त १.५ लाखाचा आहे आणि जो काही पगारानुसार कामावर मिळतो इतकाच आहे. बॅनर्जी दाम्पत्याने किमान ७.५ लाखाचा कौटुंबिक प्लॅन घ्यावा आणि गरजेनुसार पुढे वाढवावा. आई-वडिलांसाठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा.

शिवाय नवरा-बायको यांनी आपल्या वार्षिक पगाराच्या किमान सहा पटीने तरी आयुर्विमा (टर्म प्लान) घ्यावा. स्टेप-अप पर्याय निवडल्याने पुढे कमी खर्चात विमा कव्हर वाढवता येईल.

हे सांगितल्यावर सोनलने विचारलं – काय कळतंय ना मी काय सांगतेय आणि कशाला? तिलोत्तमाने मान डोलावली. मग मीनाक्षी म्हणाली – अक्का! आता मला सांगा ना!

मीनाक्षी नायर (२५ वर्षे) :
arth07

सोनलने तिची यादी काढली आणि सांगायला सुरुवात केली:

मीनाक्षीच्या बाबतीत एक गोष्ट खूप चांगली आहे आणि ती म्हणजे तिची बचतीची सवय. त्याला एक कारण हेसुद्धा आहे की तिच्यावर कुटुंबाची तशी जबाबदारी नाही आणि ती खर्च करताना खूप विचार करून करते. गेली चार वर्षं सगळा पगार आणून घरी देते आणि वडील जे काही पॉकेटमनी देतील त्यात भागवते. पण सगळी बचत ही एफडी आणि आरडीमध्ये केलेली आहे. त्यामुळे तिलासुद्धा दीर्घकाळात परतावे कमी मिळणार. शिवाय लग्नासाठीचा पैसा वापरल्यानंतर फारशी गुंतवणूक शिल्लक राहणार नाही. म्हणून तिने किमान ७०-८० टक्के बचत तीन-चार प्रकारच्या म्युचुअल फंडामध्ये करावी. सहा महिन्याचा पगार एफडी आणि लिक्विड फंडामधे इमर्जन्सीसाठी ठेवावा. तिलोत्तमाला जशी आयुर्विमा आणि आरोग्यविम्याची गरज आहे, तशी मीनाक्षीलादेखील आहे. लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराबरोबर पुन्हा आर्थिक नियोजन करावं.

हे ऐकून मीनाक्षी जरा साशंक झाली. विचारलं- काय झालं मीनाम्मा? त्यावर मीनाक्षी चाचरतच म्हणाली – अक्का, तुम्ही सांगताय ते मला पटतंय. पण अप्पा!!!! त्यांना कसं समजावू? त्याचं म्हणणं एकच – हातात आहे ते आपलं. आणि विम्याच्या बाबतीत तर म्हणतात फालतू खर्च आहे. मुळात म्हणजे नवीन काही ऐकायला तयारच होत नाही. सोनलने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाली – तुला एक आयडिया सांगते. तुझ्या अप्पांना दाखव की, त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पैसा कसा लागणार आणि कसा पुरणार. अगदी कागदावर छान मांडून दाखव. बघ कसा फरक पडतो. हे ऐकून मीनाक्षीला चांगलाच आधार वाटला.

चला आता माझा टर्न!!! – सिल्वी, उत्सुक होऊन म्हणाली.

सिल्वी डिसूझा (४० वर्षे):
arth08

सोनलने तिच्या यादीचं विश्लेषण सांगायला सुरुवात केली:

सिल्वी एकटी असल्यामुळे तिला सगळंच स्वत: करणं आहे. १५ वर्ष नोकरी करूनसुद्धा बचतीचं प्रमाण कमी आहे. प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्यामुळे आणि रिटायरमेंटनंतर पेन्शनची सोय नसल्यामुळे तिला भरपूर फंड तयार करावा लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. बचतीचे प्रमाण वाढवून योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्याने छान रिटायरमेंट फंड तयार करता येईल. २० वर्षांनी ७५ लाख तिला कमी पडतील असं माझा अंदाज आहे. तेव्हा तिने पुन्हा एकदा हा आकडा तपासावा. तिची आई पूर्णपणे तिच्यावर अवलंबून असल्यामुळे सिल्वीसाठी आयुर्विमा खूप महत्त्वाचा आहे. शिवाय आरोग्य विमा तर हवाच. एक अजून महत्त्वाची गोष्ट- तिच्या आईच्या नंतर ती एकटी असेल. एवढं पुढचं आयुष्य एकटय़ाने काढण्यासाठी तिला खूप विचार करून काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कदाचित तिचा गोव्याला जाऊन राहण्याचा निर्णयसुद्धा बदलावा लागेल. त्यानुसार खर्चाची मांडणी पुन्हा नव्याने करावी लागेल.

एवढं सांगून सोनल थांबली. जिग्ना आणि सुगंधा ताई आज नसल्यामुळे त्यांच्या यादीचं विश्लेषण पुढच्या वेळी करू या असं म्हणून बाय बाय करून निघून गेली. चार लिंबू मग बसले चर्चा करायला. तिलोत्तमा आणि यास्मिनसमोर एकच प्रश्न- नवऱ्याला समजावणं!!! त्यावर मीनाक्षी म्हणाली – मी सोनलआक्काने सांगितल्याप्रमाणे अप्पांना समजावते. तसंच तुम्ही पण प्रयत्न करा आणि शिवाय सोनल आक्का पण आहे ना. फरक नक्कीच पडेल.

सिल्वी खूप विचारात होती, कारण तिच्या आयुष्यातलं एक कटू सत्य आज सोनलने तिच्यासमोर परत आणलं होतं – तिच्या एकटेपणाचं!!! आज कितीही पाटर्य़ा करून ती वेळ घालवत होती. पण नंतर काय होणार या गोष्टीकडे आज कितीही कानाडोळा केला तरीही हे सत्य तिला सतत बोचत होतं. बाकी तिघींच्या बडबडीकडे तिचं लक्ष नसल्यामुळे तिचं स्टेशन आलंय याचं भानसुद्धा तिला राहिलं नाही. शेवटी यास्मिनने जोरात चिमटा काढून तिला भानावर आणलं. तिची भांबावलेली स्थिती पाहून तिलोत्तमा तिला समजावत म्हणाली – सिल्वी, आम्हाला कळतंय की आत्ता तुझ्या मनात काय चाललंय. आपण नंतर बोलू या विषयावर.

आजची टीप :

रिटायरमेंट फंड किती असावा याचं गणित दोन प्रकारे मांडता येतं. एक, आपल्या राहणीमानानुसार तयार केलेला पोर्टफोलिओ. उदा. एखाद्या व्यक्तीची रिटायरमेंटच्या वेळेला जर दरमहा मिळकत ५०,००० आणि त्याच्या गुंतवणुकीवर १० टक्के (कर वजा करून) परतावा मिळत असेल, तर त्याचा फंड किमान ६० लाख असावा. आणि दुसरा, आपल्याला एक साधं आयुष्य जगायला लागणारा किमान पैसा पुरवणारा पोर्टफोलिओ. उदा. एखाद्या व्यक्तीचा रिटायरमेंटच्या वेळेला जर सर्वसाधारण मासिक खर्च २०,००० रुपये असेल आणि त्याच्या गुंतवणुकीवर १० टक्के (कर वजा करून) परतावा मिळत असेल, तर त्याचा रिटायरमेंट फंड किमान २४ लाख असावा. शिवाय महागाई लक्षात घेता हा फंड वाढलासुद्धा पाहिजे. त्यामुळे पहिल्या वर्षी जरी २,४०,००० – ६,००,००० रुपये इतका परतावा मिळाला तरीही पुढल्या वर्षी जर महागाई ६ टक्के असेल तर परतावा २,५४,४०० – ६,३६,००० रुपये मिळायला हवा. बॅंक एफडी, पोस्ट ऑफिस एफडीसारख्या गुंतवणुकीतून मिळणारे परतावे जरी सुरक्षित असले तरी महागाईसमोर जास्त काळ टिकत नाही. शिक्षण, लग्नकार्य, आजारपण यासारख्या खर्चाचा व्यवस्थित हिशोब घालून प्रत्येकाने आपलं गणित हे रिटायरमेंटच्या आधी किमान १० वर्षं तरी जुळवून घ्यावं. खरं तर जेवढी लवकर सुरुवात करता येईल तेवढा फायदा जास्त. म्हणूनच आपल्या जोखीम क्षमतेनुसार, योग्य माहिती मिळवून, चांगल्या सल्लागाराकडून आपलं आर्थिक नियोजन करून रिटायरमेंट फंड तयार करावा.

सूचना : वरील नमूद नावांचा कुणाही व्यक्तीशी- जीवित अथवा मृत, संबंध नाही. या व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि आर्थिक नियोजनाच्या कथेत फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून भूमिका साकारत आहेत.

तृप्ती राणे trupti_vrane@yahoo.com

First Published on March 20, 2017 1:03 am

Web Title: long term financial planning