राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यवर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, अर्थव्यवस्थेवर मंदीछाया नसल्याची ग्वाही देणारे विधान अर्थमंत्र्यांनी केले व वर्तमानपत्रांनी या विधानाला बातमीचा मथळा केला. तर दुसऱ्या दिवशी मागील १६ वर्षांतील सर्वात सुमार वाहन विक्री डिसेंबर महिन्यात झाल्याच्या बातम्या झळकल्या. गुंतवणूकदार अशा परस्परविरोधी बातम्यांमुळे गोंधळून गेले असल्याने ती (अर्थव्यवस्था) सध्या काय करते, असा प्रश्न विचारीत आहेत. ती नेमकी काय करते या  प्रश्नाचे उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील’’, वेताळ राजाला म्हणाला.

निश्चलनीकरणानंतर व्यापार उदीम मंदावल्याबद्दल कोणी स्पष्टपणाने बोलत नसले तरी तशी कुजबुज होतीच. मंडईत कोणी फिरकत नाही मध्यरात्रीपर्यत खुल्या राहणारी हॉटेल रात्री १० वाजयाच्या आत बंद होऊ  लागली आहेत. शनिवारी संध्याकाळीसुद्धा मदिरालय ओस पडलेले आहेत. मुंबईत फणसवाडी नाक्यावरच्या हॉटेलातील झणझणीत मिसळ निश्चलनीकरणामुळे ‘विनय’शील झाली आहे. तर पुण्यात लक्ष्मी रोडवर मिसळीच्या रस्स्याहून तिखट असलेले मालक भलतेच ‘स्वीट’ झाले आहेत. हे निश्चनीकरणाचे परिणाम असूनही चांगल्या पावसामुळे हाती पिक आले; पण निश्चलनीकरणानंतर भाव पडले. पिकविण्याचे सोडा परंतु बाजारापर्यंत नेण्याचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची दैना झाली आहे. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे कालपर्यंत दबक्या आवाजात सुरू असलेली ही कुजबुजचा आवाज मोठा झाला आहे. ‘डिसेंबर महिन्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जेटली यांनी हे विधान केले. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी असे करायलाच हवे. परंतु हे सरकारी मालकीच्या व देशाच्या सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाकडून केल्या गेलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष जेटली यांच्यामाताहून वेगळी निरीक्षणे नोंदवत आहे. निश्चलनीकरणारा दोन महिने झाल्याच्या पाश्र्वभूमीवर स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने देशभर एक सर्वेक्षण केले. या संशोधनाचा निष्कर्ष जेटलींच्या वक्तव्यापेक्षा खूपच निराळा असून एका अर्थी या संशोधन अहवालातून जेटलींना घराचा आहेर मिळाला आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

३० डिसेंबर २०१६ ते ३ जानेवारी २०१७ दरम्यान मुंबई व पुण्यातील आभूषणाचे आलिशान विक्री दालन ते मंडईबाहेर जाऊन मिरची-कोथिंबीर विकणाऱ्या आजीबाईंना या सर्वेक्षण दरम्यान प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नकर्त्यांपैकी ६९ टक्के उत्तरे धंदा ५० टक्के किंवा अधिक घटल्याची कबुली देणारी आहेत. त्याच बरोबर ७० टक्के प्रश्नकर्त्यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय योग्य असल्याचे नमूद केले आहे. निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे सर्वाधिक बाधीत असलेल्या स्थावर मालमत्ता विकासक व रस्त्याच्या कडेने व्यवसाय करणारे फेरीवाले असल्याचा हा अहवाल नमूद करतो. निश्चलनीकरणारात राव आणि रंक यांना सम पातळीवर आणण्याची ताकद असल्याचे दिसून येते.  ६३ टक्के उत्तरे २००० च्या नोट छपाईचा सरकारी निर्णय पसंत न पडणारी आहेत. वस्त्रोद्योग, आभूषणे ग्राहकोपयोगी वस्तू हे उद्योग निश्चलनीकरणामुळे मध्यम बाधीत झालेले उद्योग आहेत. तर वाहनपूरक उत्पादने व औषध निर्मिती उद्योगांवर  निश्चलनीकरणाचा अत्यंत अल्प परिणाम झालेले उद्योग आहेत. निश्चनीकरणानंतर सर्वेक्षण केल्यापैकी १५ टक्के व्यवहार हे रोख व्यवहारातून डिजिटल पद्धतीत रुपांतरीत झाले असून डिजिटल व्यवहारांची ही चांगली सुरुवात असल्याचा हा अहवाल नमूद करतो. काही ठिकाणी डिजिटल व्यवहारांसाठी पुरेशा पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे निरीक्षण हा अहवाल सांगतो. हा अडथळा दूर केल्यास आणखी १५ टक्के व्यवहार डिजिटल रूपाने होतील, अशी आशा या अहवालात व्यक्त केली आहे.

हे सर्वेक्षण केवळ स्टेट बँकेच्या ग्राहकांपुरते मर्यादित व बँकेच्या शाखेत बसून फोनवरून केलेले नसून प्रत्यक्ष बाजारपेठा व रस्त्यावर उतरून माहिती संकलित करून केलेले आहे. या प्रकारचे संकलन अर्थशास्त्राचे विद्यार्थी  करतात. हे संशोधन हाती घेतल्याबद्दल व अर्थमंत्र्यांच्या वरील वक्तव्याच्या विरोधी कल असतानादेखील आपल्या निष्कर्षांशी प्रामाणिक राहून ते प्रसिद्ध करण्याचे धैर्य दाखविल्या बद्दल स्टेट बँकेचा आर्थिक संशोधन विभागाचे अभिनंदन करावयास हवे.

राजा म्हणाला ‘ती सध्या काय करते’ या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी आपआपल्या पद्धतीने दिले आहे. कोणाला ती रांगेत उभी असलेली दिसते. मला मात्र ती ‘अच्छे दिन’ येण्याच्या आशाने उल्हासित झालेली दिसते. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, सातत्याने घटणारी महागाई व स्थिरावलेले औद्य्ोगिक उत्पादन हे तिच्या उल्हासित होण्यास कारण ठरले आहेत.  २० वर्षांत ‘मार्केटकॅप टू जीडीपी’ हे प्रमाण २००३ मध्ये २० टक्के या सर्वात कमी तर २००८ मध्ये ९० टक्के या सर्वाधिक पातळीवर होते. मागील दहा वर्षांत अर्थव्यवस्था वाढीचा दर (महागाई जमेस धरून) १३ ते १४ टक्के दरम्यान होता. सध्या ‘मार्केटकॅप टू जीडीपी’ हे प्रमाण ६५ टक्के आहे. सध्याचे मुल्यांकन खरेदीस वाजवी असून येत्या दोन वर्षांत बाजारातून चांगली कमाईची संधी असल्याने निवडक समभागांची बेगमी आत्तापासून करायला हरकत नाही. या कारणांनी मला नक्की खात्री आहे की ‘ति’ला ‘अच्छे दिन’ नक्की येतील. राजाने उत्तर दिले. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊ न बसला.

पुंगीवाला gajrachipungi @gmail.com