20 November 2017

News Flash

‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : ‘मिड कॅप’मधील वृद्धीचे पुढे कसे?

‘जीएसटी’च्या अंमलबजावणीचा लाभ काही चांगल्या मिड कॅप कंपन्यांना होण्याची शक्यता आहे.

राजेश तांबे | Updated: July 3, 2017 1:01 AM

‘जीएसटी’च्या अंमलबजावणीचा लाभ काही चांगल्या मिड कॅप कंपन्यांना होण्याची शक्यता आहे. परंतु, मिड कॅप गुंतवणूक करतांना सर्वात महत्वाचा व अवघड घटक हा व्यवस्थापनाचा दर्जा तपासणे हा आहे. व्यवस्थापन कौशल्याबरोबरच अल्पसंख्यांक लाभधारकांचे हित जपण्याची व्यवस्थापनाची प्रवृत्ती येथे महत्वाची असते. उच्च दर्जाचे व्यवस्थापन असेलला समभाग महागडा जरी वाटत असेल तरी दर्जेदार व्यवस्थापनाचे अधिमूल्य त्या कंपनीस देणे गरजेचे असते..

मागील वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक हादरे बसले आहेत. निश्चलनीकरणाचा अर्थव्यवस्थेला फायदा नेमका किती झाला आणि आता वस्तू व सेवा कर प्रणाली अर्थात जीएसटीचा नेमका किती फायदा झाला हे सिद्ध होण्यासाठी काही काळ जावा लागेल. सध्या भारतीय अर्थव्यवस्था अशा संक्रमणाच्या टप्प्यात आहे. याचा परिणाम म्हणून आगामी तीन वर्षांंचा विचार केला तर अनेक समभागांचे सध्याचे मूल्यांकन स्वस्त वाटते. परंतु विद्यमान स्थितीत अनेक समभाग महाग आहेत असेच वाटते. श्री सीमेंट, एबीबी, सिमेन्स या सारख्या पायाभूत सुविधा क्षेत्राशी निगडित समभागांचे मूल्यांकन हे भविष्यातील या कंपन्यांच्या नफ्याचा वृद्धीदर लक्षात घेता फारसे महागडे नाही.

जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर असंघटीत क्षेत्रातील उत्पादक व संघटित उत्पादक यांच्यातील उत्पादन किंमतीतील फरक नाहीसा होईल किंवा कमी होईल. याचा अंशत: लाभ मिड कॅप कंपन्यांना होण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांचा विचार केल्यास लार्ज कॅप कंपन्यांच्या विक्रीत १२-१४ टक्के वाढ दिसून आली आहे तर याचा काळात मिड कॅप कंपन्यांची विक्री २२ ते २६ टक्के दरम्यान वाढल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांत ‘एस अँड पी बीएसई १००’ निर्देशांकातील कंपन्यांच्या नफ्यातील वृद्धीदराच्या सरासरीपेक्षा अधिक वृद्धीदर राखणाऱ्या व चांगला व्यवस्थापन दर्जा असलेल्या किमान ५०० कंपन्यांना जीएसटीचा लाभ संभवत आहे. मागील तीन वर्षांत ‘बीएसई मिड कॅप निर्देशांक’ १८ टक्के वार्षिक दराने वाढला. मिड कॅप समभागांची ही वृद्धी अशीच सुरु राहील काय व सध्याच्या भावात मिड कॅप गुंतवणूक करावी किंवा कसे हा महत्वाचा मुद्दा आहे. मागील दहा वर्षांत मिड कॅप गुंतवणुकीची क्षितिजे विस्तारली आहेत. अनेक नवीन उद्योग क्षेत्रे गुंतवणुकीसाठी खुणावत आहेत.

उदाहरण द्यायचे तर भारतात आदरातिथ्य या उद्योग क्षेत्रातील इंडियन हॉटेल्स, ईस्ट इंडिया हॉटेल्स किंवा हॉटेल लीला या सारख्या तारांकित हॉटेल्स चालविणाऱ्या कंपन्यामधून गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होत्या. स्पेशालिटी रेस्टॉरन्ट्स व सीसीडी सारखी लहान उपाहारगृह शृंखला असणाऱ्या कंपन्या नव्याने उपलब्ध झाल्या.

मिड कॅप गुंतवणूक करतांना सर्वात महत्वाचा घटक हा व्यवस्थापनाचा दर्जा तपासणे हा आहे. मिड कॅप कंपन्या फारशा प्रसिद्ध नसल्याने या कंपन्यांची माहिती काढणे सोपे नसते. वॉरेन बफे यांच्या मते एखाद्या कंपनीतील गुंतवणूक ही भागीदारी असते. गुंतवणुकीचा वाटा मोठा नसल्याने व्यवस्थापन कौशल्यापेक्षा अल्पसंख्यांक लाभधारकांचे हित जपण्याची प्रवृत्ती महत्वाची असते.

या बाबतीत एस्सार समूहाचे उदाहरण घेऊ . या समूहाने एस्सार गुजरात व एस्सार स्टील या कंपन्यांच्या प्रकल्पासाठी भांडवली उभारणी शेअर बाजाराच्या माध्यमातून केली. व्यवसायात जे अनेक धोके असतात त्यापैकी एक धोका प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्याचा, पर्यायाने उत्पादनास ठरल्याप्रमाणे सुरुवात न होण्याचा हा धोका आहे. दुसरा धोका असाही की, प्रकल्प पूर्ण होऊन उत्पादनास सुरुवात झाल्यावर या गुंतवणुकीची फळे चाखायला अनेक लाभधारक तयार होतात. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ही फळे आपल्या भागधारकांना चाखायला मिळण्याआधी आपल्या कंपनीची नोंदणी बाजारातून रद्द केल्यास लाभधारक भांडवली वृद्धीपासून वंचित राहतो. नेमके हेच एस्सारच्या प्रवर्तकांनी केले. अनैसर्गिक किंमतीवर समभाग खरेदी करून कंपनीची नोंदणी बाजारातून त्यांनी रद्द केली. अनिल अंबानी यांच्या समूहातील रिलायन्स ब्रॉडकास्ट, आयटीडब्ल्यू सिंग्डोम सारख्या अनेक चांगल्या कंपन्यांची नोंदणी प्रवर्तकांनी रद्द केल्याने भविष्यातील भांडवली वृद्धीपासून भागधारकांना वंचित ठेवले गेले. हिंदुस्थान युनिलिव्हरने दोन वेळा आपाल्या समभागांची पुनर्खरेदी (बाय बॅक) केली. दोन्ही वेळेला ज्या भावात खरेदी झाली त्यापेक्षा कितीतरी पट भांडवली वृद्धी भविष्यात झाली. अशी अनेक उदाहरणे प्रवर्तकाचा व्यवस्थापन दर्जा का महत्वाचा हे जाणून घेण्यासाठी दाखला म्हणून तपासता येतील. कंपनी जेव्हा परिचालनातून अतिरिक्त रोकड उत्पन्न करते तेव्हा या रोकडीचा उपयोग लाभांश वाटपासाठी करावा की कंपनीच्या ताळेबंदात स्थावर मालमत्ता खरेदी करून या मालमत्तेचा वापर प्रवर्तकांसाठी असावा किंवा कसे हे ठरविण्याचा अधिकार अल्पसंख्यांक समभागधारकास नसतो. तरी अल्पसंख्य समभागधारकाचे हित सांभाळणारा पैलू व्यवस्थापनाकडे असायला हवा. एखादा समभाग महाग वाटला आणि उच्च दर्जाचे व्यवस्थापन असेलला असेल तर दर्जेदार व्यवस्थापनाचे अधिमूल्य त्या कंपनीस देणे गरजेचे असते.

अशाच महाग वाटणाऱ्या तरी आश्वासक भांडवली वृद्धी देणाऱ्या मिड कॅप कंपन्यांची ओळख पुढील काही भागांत करून घेऊ.

First Published on July 3, 2017 1:01 am

Web Title: midcap stocks likely to get benefit from gst bill