नीलेश शहा

तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे यश तुमचे ‘आतील शत्रू’ आणि ‘भावनिक सापळे’ यांच्यावर तुम्ही कशाप्रकारे नियंत्रण मिळवता त्यावर अवलंबून आहे. आनंदाची बातमी ही की, प्राध्यापक डॅन एरियली यांनी ‘प्रेडिक्टेबली इररॅशनल’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे माणसांची वागणूक ही सूचकपणे असंमजस असते. एकदा का आपण हे ‘आतील शत्रू’ ओळखले की त्यांचा सामना करण्याचा मार्गही आपण शोधू शकतो. विचारपूर्वक निर्णय घेणारा गुंतवणूकदार या सूचक असमंजस वागणुकीवर मात करून कुठल्याही गोंधळात विचलित न होता हुशारीने निर्णय घेतो आणि इतरांच्या ‘वागणुकीतील असमतोलाचा’ फायदा उठवतो.

एक महत्त्वाचा आतील शत्रू म्हणजे ‘फाजील आत्मविश्वास.’ वारंवार आपण आपली क्षमता, ज्ञान आणि कौशल्य यांना अतिमहत्त्वाचे समजतो. २४ तास चालणाऱ्या बातम्यांच्या वाहिन्या पाहून आणि त्यावरील ‘तज्ज्ञांना’ ऐकून आपण स्वत:लाच तज्ज्ञ समजू लागतो आणि कुठलाही सखोल विचार न करता गुंतवणुकीचे निर्णय घेतो. आपण असा विचार करायला लागतो की आपण दैनंदिन किमतीमधील चढ-उताराचा अजूक अंदाज वर्तवू व त्यानुसार गुंतवणूक करू. अतिआत्मविश्वासामुळे खूप जास्त ट्रेडिंग होते व चुकीचे गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत शून्याधारित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. गुंतवणूकदाराला इतके हुशार असायला हवे की चांगला परतावा देणारी त्याची गुंतवणूक लगेच विकायची नाही आणि तोटा देणारी गुंतवणूक जास्त काळ टिकवून ठेवायची नाही.

आणखी एक महत्त्वाचे, भावनिक सापळा आपल्याला टाळायला हवा. ‘कळपासोबत चालणे’ आपल्याला टाळता यायला हवे. स्वत:च्या ज्ञानाव्यतिरिक्त लोक मोठय़ा समूहाच्या कृतीचे अनुकरण करायला लागतात. मोठय़ा प्रमाणावर असलेल्या सामाजिक मर्यादांमुळे प्रत्यक्षात असलेली किंमत आणि मूल्य यामध्ये मोठा फरक राहू शकतो. कळपासारख्या या वागणुकीमुळे एखाद्या समभागासाठी नफ्याची मोठी संधी निर्माण होऊ  शकते. मात्र सामूहिक असमंजसतेचा लाभ ठरावीक समभाग किंवा बाजारासाठी उठविणे कठीण असते. आपल्यापैकी बहुतांश लोकांना कळपाचा हिस्सा बनण्याची मोठी इच्छा असते, स्वतंत्रपणे उभे राहणे हे सोपे नाही. मात्र जर आपण आपल्या या वागणुकीवर नियंत्रण मिळवू शकतो तर आपल्या गुंतवणुकीपासून चांगला परतावा मिळू शकतो. वॉरेन बफे यासंदर्भात सांगतात, ‘जेव्हा इतर लोक हावरट असतात तेव्हा आम्ही घाबरून राहण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा इतर लोक घाबरून असतात तेव्हा आम्ही हावरट राहण्याचा प्रयत्न करतो.’ हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या भावनांवर मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.

संशोधनातून असे आढळून आले आहे की, वागणुकीतील चुकांमुळे गुंतवणुकीवरील परतावा १० ते ७५ टक्कय़ांपर्यंत कमी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे? एका शब्दात हे सांगता येईल, शिस्त. प्रत्येकाला नेहमीच स्मार्ट होण्यावर लक्ष देण्याची गरज नाही. वॉरेन बफेंनी एकदा सांगितले आहे, ‘तुमच्या आयुष्यात अवघ्या काही गोष्टी तुम्हाला बरोबर करायच्या आहेत, जर तुम्ही खूप गोष्टी चुकीच्या करणार नसाल तर.’ जर तुम्ही मोठी चूक टाळू शकणार असाल तर योग्य निर्णय त्यांची काळजी घेईल.

महत्त्वाचे काय?

’  समभाग विकत घेताना आणि विकताना ‘चेकलिस्ट’ वापरा. ती नेहमी छोटी आणि वाजवी ठेवा

’  गुंतवणुकीपूर्वी आवश्यक ती खबरदारी घ्या. सुरक्षित मार्जिन ठेवा, कधीही अघळपघळ गुंतवणूक करू नका.

’  ‘विकत घ्या आणि सांभाळा’ या धोरणाचा अवलंब करा आणि ठरावीक कालावधीने त्याचा पडताळा करा. जितके कमी तुम्ही बाजारातील चढ-उतार पाहाल आणि तुमचा पोर्टफोलिओ तपासून पाहाल तितके कमी तुम्ही शेअर बाजारातील नैसर्गिक चढ-उतारांमध्ये भावनिकरीत्या निर्णय घ्याल.

’  दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही एखादा समभाग १० वर्षांसाठी ठेवणार असाल तर एखाद दिवसाचा परतावा गेला तरी फरक पडत नाही. जेव्हा तुम्हाला पॅनिक वातावरण जाणवते तेव्हा आणखी एखादा दिवस वाट पाहा. गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचारपूर्वक केली असेल तर चांगल्या परताव्याची संधी नक्की मिळेल आणि भविष्यातही येईल.

’  संपत्तीचे विभाजन योग्यरीतीने करा आणि ठरावीक कालावधीनंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समतोल राखत राहा.

’  नम्र राहा आणि तुमच्या चुकांपासून शिका. जेव्हा तुम्हाला यश मिळते तेव्हा कोणत्या गोष्टींमुळे यश मिळाले ते पाहा आणि कशामुळे नाही मिळाले हेही पडताळा. योगायोगाने मिळालेल्या यशाचे श्रेय घेऊ  नका. अयशस्वी ठरल्यावर ते पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अपयशातील दुर्दैवाचा भाग आणखी मोठा करून सांगू नका.

(लेखक कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक)