राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारूलागला. ‘‘राजा ६ व ७ जून रोजी झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीचे (एमपीसी) इतिवृत्त प्रकाशित झाले. या इतिवृत्तावरून भविष्यात व्याजदर कपात होईल असे वाटते काय, या प्रश्नाचे उत्तर ते तुला माहिती असूनदेखील तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळ राजाला म्हणाला.

‘‘व्याजदर ठरविण्याचे अधिकार रिझव्‍‌र्ह बँकेकडून एमपीसीकडे आल्यानंतर ६ व ७ जून रोजी झालेली बैठक ही पाचवी बैठक होती. या आधीच्या चार बैठकांमध्ये व्याजदर स्थिर ठेवण्याचे किंवा कमी करण्याचा निर्णय एमपीसीत एकमताने घेतला गेला. पाचव्या बैठकीत समितीत विचारभेद प्रगट झाले. सुरुवातीला गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी बँकांसमोरच्या अनुत्पादित कर्जाच्या प्रश्नाची माहिती समितीच्या सदस्यांना दिली व बँकांच्या भांडवली पुनर्भरणाची आवश्यकता स्पष्ट केली. विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांना भांडवली पुनर्भरणाची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. मार्च महिन्यात निश्चित उत्पन्न असलेल्या अल्पबचत योजनांचे दर सरकारने कमी केले तसेच बँकांनीसुद्धा ठेवी व कर्जावरील व्याजदरात कपात केल्याची माहिती समिती सदस्यांना दिली व व्याजदर निश्चित करण्यासाठी चर्चेस सुरुवात केली,’’ राजा म्हणाला.

‘‘चर्चेच्या सुरुवातीला समितीवरील तीन सदस्यांपैकी एक सदस्य असलेले रवींद्र ढोलकिया यांनी रिझव्‍‌र्ह बँकेने किमान अध्र्या टक्क्याची कपात गरजेचे असल्याचे आक्रमक प्रतिपादन केले. मागच्या बैठकीतील इतिवृत्ताच्या अनुषंगाने दुसऱ्या सदस्य पमी दुआ यांची रवींद्र ढोलकिया यांना व्याजदर कपातीच्या मुद्दय़ावर साथ मिळणे अपेक्षित होते. परंतु गव्हर्नर डॉ ऊर्जित पटेल यांच्या प्रतिपादनानंतर मागील बैठकीत व्याजदराच्या मुद्दय़ावर आक्रमक असलेल्या पमी दुआ यांनी ढोलकिया यांना साथ देण्याचे टाळले व व्याजदर स्थिर ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. डॉ. ऊर्जित पटेल यांनी आपल्या प्रतिपादनात देशाची अर्थव्यवस्था एका संक्रमणातून जात असल्याचे सांगत जीएसटीमुळे करसंकलनात अनिश्चितता असल्याने अध्र्या टक्क्याची कपात उतावीळपणे करण्यापेक्षा भविष्यात कल पाहून निर्णय घेण्याची सूचना सदस्यांना केली व व्याजदर ६.२५ टक्के राखण्याची सदस्यांना विनंती केली. रवींद्र ढोलकिया वगळता अन्य सदस्यांनी डॉ. पटेल यांच्या विनंतीला मान देत

व्याजदर स्थिर राखण्याच्या बाजूने मतदान केले, तर ढोलकिया हे आपल्या मतावर ठाम राहिले. भविष्यात किमान दोन सदस्यांचे मत परिवर्तन करण्यास ढोलकिया यशस्वी होतील असे वाटते,’’ राजा म्हणाला.

‘‘औद्योगिक उत्पादन व महागाईचे ताजे आकडे पाहता भविष्यात व्याजदर कपात निश्चित आहे. ऑगस्ट महिन्यात पाव टक्का की ऑक्टोबर महिन्यात अर्धा टक्का, हा प्रश्न उरतो. सदस्यांच्या मते जागतिक अर्थव्यवस्था सुधारल्याने ऑक्टोबरनंतर (तिसऱ्या तिमाहीत) निर्यात हळूहळू वाढू लागेल. कच्च्या तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या तळात आहेत. ‘ओपेक’ने सततच्या नवव्या महिन्यात तेल उत्पादनात कपात करूनदेखील, किमतीत सुधारणा झालेली नाही. हे सामितीच्या बैठकीत नमूद करून याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल अशी आशा गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केली. त्यानंतर जाहीर झालेला महागाईचा दर २.९९ टक्के इतका होता. रिझव्‍‌र्ह बँकेला महागाईचा दर ४ ते ६ टक्के अपेक्षित असल्याने व्याजदर कपातीस वाव असल्याची समिती सदस्यांची भावना असली तरी निर्णय घाईघाईत घेऊ  नये या मताचे गव्हर्नर असल्याने सदस्यांनी त्यांच्या मताचा आदर केल्याचे जाणवते. भविष्यात म्हणजे मार्च २०१८ पर्यंत पाव टक्क्याची कपात अपेक्षा आहे,’’ राजा म्हणाला.

अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

gajrachipungi@gmail.com