18 November 2017

News Flash

लार्ज, मिड की मल्टि-कॅप फंड?

बाजारात निरंतर सुरू असलेल्या गुंतवणूक ओघामुळेच निर्देशांकांना हे शिखर गाठता आले आहे.

व्यापार प्रतिनिधी | Updated: June 26, 2017 1:02 AM

 

सेन्सेक्स ३१ हजारापल्याड गेला असताना म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल काय असावे?

बाजार तेजीचा असताना चढाओढीने गुंतवणूक, तर बाजार नरमलेला असताना सर्वसामान्य बिथरलेला गुंतवणूकदार प्रसंगी नुकसान सोसून पळ काढतो, हे सर्वश्रुतच आहे. वस्तुत: दोन्ही स्थितींत दिसणारे गुंतवणूकदारांचे वर्तन चुकीचेच..  सामान्य दीघरेद्देशी गुंतवणूकदाराने बाजाराच्या तात्कालिक हालचालींवर कटाक्ष ठेवून गुंतवणुकीचा निर्णय घेऊच नये. तर मग गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल काय असावे याचे हे दिशादर्शन..

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी ३१,१३८ अंशांवर स्थिरावला. २१ जूनच्या व्यवहारात सेन्सेक्सने ३१,५२२ या सार्वकालिक उच्चांकी स्तराला गवसणी घातली होती. वर्षभरापूर्वीच्या २६,७६५ (२२ जून २०१६) वरून ३१,५०० हा प्रवास करताना, निर्देशांकाने सुमारे १८ टक्क्य़ांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

तथापि बाजारात निरंतर सुरू असलेल्या गुंतवणूक ओघामुळेच निर्देशांकांना हे शिखर गाठता आले आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रणीत सरकारचा सत्ताबदल, आर्थिक सुधारणापूरक या सरकारची धोरणे याबद्दल गुंतवणूकदारांच्या आस्थेचाही हा प्रत्यय आहे. जागतिक अर्थचित्रातही सकारात्मक फेरबदल दिसत आहेत. कंपन्यांच्या यंदाच्या सकारात्मक वित्तीय निकालांनी भारतीय अर्थव्यवस्था कलाटणी घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) सारख्या महत्त्वाच्या कर सुधारणेची अंमलबजावणी, दमदार मान्सूनचे कयास यातून नजीकचा काळ हा चलनवाढीचा दर अल्पतम राखणारा आणि ग्राहक मागणीत बरकतीचा राहील हे सुस्पष्टच आहे. सर्वासाठी घरे, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, मुद्रा वगैरे योजनांचे फलित अर्थवृद्धीत लक्षणीय भर घालणारे ठरेल.

या पाश्र्वभूमीवर बाजार निर्देशांक दररोज नवनवे शिखर दाखवीत असताना, गुंतवणूकदाराने सावध पवित्रा घेत तूर्त गुंतवणूक टाळून वाट पाहावी? बाजार तेजीचा असताना गुंतवणुकीला बहर चढतो आणि बाजार नरमलेला असताना सर्वसामान्य बिथरलेला गुंतवणूकदार प्रसंगी नुकसान सोसून पळ काढतो, हे सर्वश्रुतच आहे. वस्तुत: दोन्ही स्थितींत गुंतवणूकदारांचे सामान्यपणे जे वर्तन दिसते त्याच्या नेमके उलट असायला हवे; तथापि गुंतवणूक सल्लागारांचे ऐकाल तर, सामान्य दीघरेद्देशी गुंतवणूकदाराने बाजाराच्या हालचालींवर कटाक्ष ठेवून गुंतवणुकीचा निर्णय घेऊच नये.

मग गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल काय असावे? दमदार पाऊस-पाणी होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल या आशेने गुंतवणूक बाजारात कमालीचा विश्वास निर्माण केला असून, मुबलक उपलब्ध असलेली तरलता याचे द्योतक आहे. थेट शेअर बाजार म्हणा किंवा समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंड दिवसागणिक नव्या गुंतवणूकदारांची भर पडत आहे. गत आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांनी ७७ लाख नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले, तर सरलेल्या एप्रिल-मे या दोन महिन्यांत म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूक खाती (फोलियो) ही आणखी १९ लाखांनी फुगली आहेत. सर्वाधिक वाढ ही समभागसंलग्न (इक्विटी) योजनांमध्येच झाली आहे; परंतु इक्विटी फंडातही सद्य:स्थितीला पूरक प्रकार कोणता- लार्ज कॅप फंड, मिड, स्मॉल कॅप की मल्टि कॅप फंड?

इक्विटी म्युच्युअल फंडांचे लार्ज, मिड, स्मॉल आणि मल्टि-कॅप असे सर्रास फंड प्रकार केले जात असले, तरी आश्चर्यकारकरीत्या भारतात या वर्गवारीला निश्चित करणारे कोणतेही मार्गदर्शक सूत्र अस्तित्वात नाही. बीएसई आणि एनएसई या शेअर बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार-भांडवलानुरूप वर्ग पडतात. कंपनीचे हे बाजार भांडवल म्हणजे त्या कंपनीच्या भरणा झालेल्या सर्व समभागांच्या प्रचलित भावाची गोळाबेरीज होय. कंपन्यांच्या या बाजार भांडवलानुरूप ठरणारे फंडाचे प्रकार, त्यांचे गुंतवणूकविषयक डावपेच आणि गुंतवणुकीचे होणारे विभाजन हे सामान्य गुंतवणूकदारांनीही समजावून घ्यायला हवे.

लार्ज कॅप फंड्स :

नावाप्रमाणेच या फंडातून मोठे बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा हिस्सा मोठा असतो. वर बाजार भांडवलाच्या केलेल्या व्याख्येनुरूप या कंपन्यांच्या भरणा झालेल्या समभागांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे अर्थातच या लार्ज कॅप कंपन्यांतील गुंतवणूक ही मिड अथवा स्मॉल कॅप कंपन्यांच्या तुलनेत निश्चितच तरल (लिक्विड) स्वरूपाची असते. लार्ज कॅप फंडांद्वारे त्या त्या उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या व प्रथितयश अशा बडय़ा कंपन्यांत गुंतवणूक करून परतावा मिळवून देण्याचे उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ, विशिष्ट लार्ज कॅप फंडांतून बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अ‍ॅण्ड टी, इन्फोसिस वगैरे आघाडीच्या कंपन्यांत स्वाभाविकच गुंतवणूक असेल. भारतातील आर्थिक संक्रमणाला साजेशी कंपनी, त्यातून व्यावसायिक भरभराटीचा सर्वाधिक लाभ या गटातील अग्रणी कंपन्यांनाच अधिक होईल. बुद्धी व अनुभव चातुर्याने अशा कंपन्यांना हेरण्याचे काम लार्ज कॅप फंडाचे निधी व्यवस्थापक करीत असतात.

मिड-कॅप फंड्स :

या फंडांच्या नावाप्रमाणेच त्यातून मध्यम आकारमानाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. वर म्हटल्याप्रमाणे निश्चित व्याख्येच्या अभावी, या फंडातून साधारणपणे ५०० कोटी ते १००० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते; तथापि अल्प बाजार भांडवल हे या मिड-कॅप कंपन्यांतील गुंतवणुकीसाठी मोठी जोखीम ठरते, कारण बाजारातील अकस्मात बदलत्या मूडचे प्रत्यंतर त्यांच्या भावावर सत्वर पडलेले दिसून येते. उदाहरणार्थ, विशिष्ट मिड-कॅप फंडातून बाटा, ल्युपिन, गोदरेज, अपोलो टायर्स, बायोकॉन वगैरे कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल.

मल्टि-कॅप फंड्स :

विविध उद्योगक्षेत्रांत कंपन्यांच्या बाजार भांडवल न पाहता मल्टि-कॅप फंडांमधून गुंतवणूक केली जात असते. हे फंड ऑल-कॅप फंड म्हणूनही ओळखले जातात. विशिष्ट उद्योग क्षेत्र अथवा बाजारवर्गात गुंतवणुकीचे बंधन नसणे ही बाब या फंडांच्या पथ्यावर पडते आणि त्यातून बव्हंशी तुलनेने अधिक परतावा दिला जातो. प्रचलित बाजारस्थितीनुसार, त्या त्या वेळी चांगली कामगिरी करणाऱ्या उद्योग क्षेत्र अथवा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा रोख बदलण्याचे गतिमान धोरण या फंडांच्या व्यवस्थापकांना आखता येते. बव्हंशी उत्तम परतावा देत असल्याने मल्टि-कॅप फंड्स जोखीम कमी करणारा फंड प्रकार मानला जातो. समजा मिड-कॅप कंपन्यांची कामगिरी चांगली होत नसेल तर या फंडातून लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये अथवा अन्य मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढविला जाईल. त्यामुळे संपूर्णपणे मिड-कॅप फंडांपेक्षा या फंडातून परताव्याची शक्यता निश्चितच वाढते. उदाहरणार्थ, या फंड प्रकारातून आयटीसी, नेस्ले, डॉ. रेड्डीज, बजाज ऑटो, टायटन वगैरे कायम प्रकाशझोतात असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल.

जोखीम व परताव्याचे स्वरूप

  • लार्ज कॅप फंड्स : मिड अथवा मल्टि-कॅप फंडांच्या तुलनेत या फंडांद्वारे जोखमीचे प्रमाण तुलनेने अल्प असते, ते या फंडातून गुंतवणूक केल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या मुख्यत: आकारमानामुळे! अर्थात या फंडाद्वारे मिळणारा परतावा अकस्मात उंचावलेलाही दिसणार नाही. स्मॉल-कॅप कंपन्यांप्रमाणे लार्ज-कॅप कंपन्यांच्या भावाने एकदम उसळी घेतल्याचे क्वचितच दिसून येईल. त्यामुळे या फंडातून सातत्यपूर्ण व स्थिर स्वरूपाचा परतावा अपेक्षिता येईल आणि बाजारातील वादळी वध-घटींचा त्यांच्यावरील परिणामही अल्पच दिसून येईल.
  • मिड-कॅप : वर म्हटल्याप्रमाणे लार्ज आणि मल्टि-कॅप फंडांच्या तुलनेत सर्वाधिक जोखमेचा हा फंड प्रकार ठरतो; परंतु त्याच जोडीला प्रसंगी दीर्घ मुदतीत उमदा परतावाही या फंडांमधून अपेक्षिता येईल. साधारणत: फंड व्यवस्थापक आपल्या पोर्टफोलियोत अशा कंपन्यांची निवड करतात ज्यांच्यात मध्यम आकाराच्या कंपनीतून बडय़ा कंपनीत संक्रमित होण्याची धमक दिसून येते. या कंपन्यांमधील दीर्घ मुदतीतील वृद्धीप्रवणता दूरदृष्टीने जोखून झालेल्या या गुंतवणुकीतून त्यामुळे अर्थातच चांगला परतावा मिळविण्याची संधी गुंतवणूकदारांना असते. त्यामुळे या फंडातून ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जात आहे त्यानुसार विविधांगी परतावा मिळविता येऊ शकतो.
  • मल्टि-कॅप फंड्स : या प्रकारातही फंड व्यवस्थापकाकडून वेळोवेळी घेतला जाणारा गुंतवणूक पवित्रा आणि तत्पर धोरण यानुसार परताव्याचे प्रमाण ठरते. अर्थात त्या त्या वेळी घेतले जाणाऱ्या निर्णयाचा परिपाक अनुकूल अथवा प्रतिकूल यापैकी काहीही ठरणारा असल्याने मल्टि-कॅप फंड प्रकार जोखमीचाच ठरतो.

निष्कर्ष:

बाजार तेजीचा असो वा पडझडीचा म्युच्युअल फंडांमधून गुंतवणूकदारांना स्थिर स्वरूपाचा परतावा अपेक्षिता येऊ शकेल. विविध बाजार-भांडवलानुरूप कंपन्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे विभाजन हेच गुंतवणुकीच्या जोखीम व परताव्याचे स्वरूप निश्चित करीत असते. त्यामुळे तिन्ही प्रकारच्या फंडात शक्य तितक्या ‘डायव्हर्सिफिकेशन’चा अवलंब केव्हाही फायद्याचात. विविधांगी बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची कामगिरी ही प्रतिकूल बाजारस्थितीतही तुलनेने चांगली राहण्याचा संभव सर्वाधिक असतो. विशिष्ट बाजारस्थितीत प्रसंगी गुंतवणूक गंगाजळी रोखीत सांभाळून मल्टि-कॅप फंड गुंतवणूकदाराला लार्ज-कॅप फंडापेक्षा उत्तम परतावा मिळवून देतो. एक गुंतवणूकदार म्हणून फंड वर्गवारीची निवड करताना, फंडासोबत त्या त्या फंड वर्गवारीच्या कामगिरीसंबंधी दिलेला लेखाजोखा आणि फंडाचा पोर्टफोलियो हे घटक तपासूनच गुंतवणुकीचा निर्णय घेणे श्रेयस्कर ठरेल.

arthmanas@expressindia.com  

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. 

First Published on June 26, 2017 1:02 am

Web Title: multi cap fund large fund mutual fund investment