ग्रामीण-निमशहरी भागातील गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद

* देशातील म्युच्युअल फंडांतील गंगाजळी गेल्या तिमाहीत थेट २० टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते जूनदरम्यान एकूण फंड मालमत्ता २३.४० लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे.

* फंड कंपन्यांची संघटना ‘अ‍ॅम्फी’च्या गेल्या कालावधीतील गुंतवणूकविषयक प्रसाराचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. भारतात सध्या ४२ फंड घराणी आहेत. त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांच्या निधीचे व्यवस्थापन होते.

* एप्रिल ते जून २०१७ दरम्यान एकूण फंड मालमत्ता १९.५२ लाख कोटी रुपये होती. तर तिमाही तुलनेत यंदाच्या जूनअखेरीस अवघ्या १.५ टक्क्यांनी फंड गुंतवणूक ओघ वाढला आहे. आधीच्या तिमाहीत ही गुंतवणूक २३.०५ लाख कोटी रुपये होती.

* प्रामुख्याने छोटय़ा शहरांमधून किरकोळ गुंतवणूकदारांचा निधी म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारात आला असल्याचे ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी एन. एस. व्यंकटेश यांनी म्हटले आहे.

* एकूण ४२ फंड कंपन्यांपैकी यंदाच्या तिमाहीत ३३ फंड कंपन्यांनी निधीतील वाढ नोंदविली आहे. तर ८ कंपन्यांमधील निधी ओघ यंदा रोडावला आहे.

* फंड कंपन्यामध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल ही कंपनी ३.१० लाख कोटी गंगाजळीसह अव्वल आहे. तर दुसऱ्या स्थानावरील एचडीएफसी म्युच्युअल फंडची मालमत्ता जूनअखेर ३.०६ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे.

* आघाडीच्या पाच मालमत्ता कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला सन लाईफ, रिलायन्स म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंडाचा क्रम अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा आहे.

‘अ‍ॅम्फी’ या संघटनेच्या ‘म्युच्युअल फंड सही है’ या मोहिमेला गुंतवणूकदारांचा उत्तम पाठिंबा मिळत आहे. ताज्या अस्थिरतेनंतर फंडातील निधी ओघ यापुढे वाढत राहिला. ३० शहरांमधील किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद असाच कायम राहिल.

’ एन. एस. व्यंकटेश, अ‍ॅम्फीचे मुख्य कार्यकारी

येस बँकेचा म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश

* देशाच्या खासगी क्षेत्रातील चौथ्या स्थानावरील येस बँकेला म्युच्युअल फंड व्यवसायात शिरकाव करण्यास ‘सेबी’ची मंजुरी मिळाली आहे. येस अ‍ॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारीत बँक येत्या सहामाही ते वर्षभरात नव्या व्यवसायाला सुरुवात करेल, अशी माहिती देण्यात आली आहे. अलीकडे डीएचएफएल, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र ही उद्योग घराणी फंड व्यवसायात आली आहेत.