25 November 2017

News Flash

म्युच्युअल फंड : अर्थपूर्ण मित्र!

सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने गुंतवणूक करताना मुख्य दोन मुद्दे कळीचे असतात.

लोकसत्ता टीम | Updated: June 26, 2017 1:04 AM

गुंतवणूक कशात करावी याचे काही एकावेळी सगळ्यांना लागू होणारे ठोस निकष नाहीत, तरीही नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंड हा एक भरवशाचा पर्याय ठरतो. सरस परतावा मिळवायचा तर म्युच्युअल फंडांकडे वळावेच लागेल!

कौस्तुभ जोशी

सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने गुंतवणूक करताना मुख्य दोन मुद्दे कळीचे असतात. त्यातील एक म्हणजे गुंतवणूक सुरक्षित आहे ना? आणि दुसरा त्यात व्याज किती मिळणार? अनेक वर्षांपासून बँक मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी आणि पोस्टाच्या योजनांतील ठेवी या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांचा अवलंब आपण करत आलो आहोत. आता भविष्याचा विचार करता आपला पोर्टफोलिओ जरा बदलायची गरज निर्माण झाली आहे. गुंतवणूक कशात करावी याचे काही एकावेळी सगळ्यांना लागू होणारे ठोस निकष नाहीत, गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी, वय, आर्थिक जबाबदारी, त्याला गुंतवायची रक्कम अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मात्र या सगळ्या बाबी एकाच वेळी लक्षात घेऊन आणि तरीही सरस परतावा देणारा एक पर्याय आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे म्युच्युअल फंड होय!

भारतात म्युच्युअल फंड व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली ती युनिट ट्रस्ट अर्थात ‘यूटीआय’ या तेव्हाच्या सरकारी कंपनीने, पुढे उदारीकरणाच्या काळात अनेक खासगी आणि परदेशी संस्था यात आल्या. आजमितीस सुमारे २० लाख कोटी एवढय़ा मोठय़ा गुंतलेल्या रकमेचे व्यवस्थापन भारतीय फंड उद्योग यशस्वीपणे करीत आहेत हे महत्त्वाचे.

सर्वसामान्य मराठी घरात शेअर बाजार आणि त्याबाबतीत गुंतवणुकीसाठी फारसे पोषक वातावरण नसते. मात्र हे चित्र अलीकडील काळात बदलत चालले आहे. मात्र थेट शेअर्सची गुंतवणूक सगळ्यांना शक्य होईलच असे नाही. वेळेची उपलब्धता, शेअर बाजाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि आवश्यक तेवढे भांडवल ही त्रिसूत्री नेहमी जमेलच असे नाही. यावेळी म्युच्युअल फंड हा एक भरवशाचा पर्याय ठरतो.

तुम्हाला अगदी कमी पैशाची गुंतवणूक करायची आहे का? ते शक्य आहे! तुम्हाला जोखीमही हवी आहे मात्र शाश्वत परतावाही हवाय? हेही शक्य आहे! तुम्ही गुंतवलेले पैसे गरज लागली तर त्वरित मिळायला हवेत? होय हे शक्य आहे! तुम्हाला एकरकमी गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्यात करायची आहे? हे सुद्धा शक्य आहे! तुम्हाला कर बचत करायची आहे? हे सुद्धा शक्य आहे!

ज्यांनी नुकतीच नोकरी व्यवसायाला सुरुवात केली आहे त्यांनी आत्तापासूनच शिस्तबद्ध गुंतवणूक करायला पाहिजे. कारण येत्या काळात पारंपरिक गुंतवणुकीच्या प्रॉडक्ट्समधून मिळणारे व्याज हे महागाईच्या दराला मागे टाकेल अशी स्थिती नक्कीच नाही. उलट पडत्या व्याजदर आणि चढय़ा महागाईच्या काळात फंडातील गुंतवणूक किफायतशीर ठरते यात शंकाच नाही. तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक करता त्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला वेबस्थळावरून मिळू शकते. एखादा फंड कोठे गुंतवणूक करतो यावर त्याची जोखीम अवलंबून असते. शुद्ध इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंड मोठय़ा, मध्यम किंवा लहान भांडवलाच्या कंपन्यात पैसे गुंतवतो. जर तो बॅलन्स्ड फंड असेल तर समभाग आणि स्थिर उत्पन्न देणारे अशा दोघांत गुंतवणूक करतो. त्यामुळे आपली जोखीम घेण्याची तयारी किती आहे त्यावरून आपल्याला आपला एक दीर्घकालीन पोर्टफोलिओ तयार करता येतो. आपण म्युच्युअल फंडाची जाहिरात वाचतो तेव्हा त्यात ‘गुंतवणूक करण्याआधी दस्तावेज पाहा’ अशी सूचना केलेली असते, मात्र बहुतांशी मंडळी आपल्या एजंट किंवा सल्लागाराच्या सांगण्यावरून फॉर्मवर सही करतात (यात फसवणूक होते. असे येथे अपेक्षित नाही!) कारण सगळे जोखीम घटक समजून घेण्याएवढे ज्ञान सगळ्यांना असलेच असे नाही! त्यासाठी ‘रिस्कोमीटर’ हा नवीन आणि सुलभ पर्याय आपल्यासाठी आला आहे. छ६, टीि१ं३ी’८ छ६, टीि१ं३ी, टीि१ं३ी’८ ऌ्रॠँ, ऌ्रॠँ अशा प्रकारात याचे वर्गीकरण केले जाते. या रिस्कोमीटरचा काटा ज्या बाजूला झुकला असेल त्यावरून जोखमीचा अंदाज चटकन येऊ  शकतो!

आता गरज आहे ती दीर्घकालीन नियोजन करून गुंतवणूक करायला आरंभ करायची! जितक्या कमी वयात आपण फंडात गुंतवणूक करू तेवढे सुमधुर फळ आपल्याला मिळेल यात शंकाच नाही. यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात ‘एसआयपी’ या इतका दर्जेदार पर्याय असूच शकत नाही. एकरकमी गुंतवणूक करताना आपल्याला बाजाराचा अंदाज घ्यावा लागतो, आणि ते नक्कीच सुलभ नाही अशावेळी दर महिना एक स्थिर रक्कम फंडात गुंतवल्यास बाजाराच्या चढ उताराचा आपल्याला फायदा मिळतो आणि जोखीम कमी होते. तुमच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण करेल आणि तुम्हाला दीर्घकालीन समृद्धी देईल तीच खरी आदर्श गुंतवणूक असते. हे विचारात घेऊन फंड का फंडा तरुणांनी आता अंगीकारायला हवाच!

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून हे शक्य आहे..!

  • अगदी कमी पैशातून तुम्हाला गुंतवणूक करता येईल
  • गुंतवणूक एकरकमी न करता टप्प्याटप्प्याने करायची आहे
  • जोखीमही हवी आहे मात्र शाश्वत परतावाही हवाय
  • गुंतवलेले पैसे गरज लागली तर त्वरित मिळायला हवेत
  • कर बचत करायची आहे

joshikd28@gmail.com

(लेखक अर्थशास्त्राचे अध्यापन करतात आणि गुंतवणूक सल्लागार आहेत)

First Published on June 26, 2017 1:04 am

Web Title: mutual fund investment advised