News Flash

साकारू अर्थ नियोजन : म्युच्युअल फंड अर्थ नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी  

वयाच्या प्रत्येक टप्प्यात बचत वेगवेगळी असते, परंतु फक्त बचत करणे म्हणजे अर्थ नियोजन करणे असे नव्हे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

फक्त बचत करणे म्हणजे अर्थ नियोजन करणे असे नव्हे. तर जमा केलेली बचत गुंतविण्यासाठी, नवनवीन योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय अभ्यासपूर्वक निवडून आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे हेच खरे अर्थ नियोजन..

आपल्या आयुष्याचा आलेख वयानुरूप लक्षात घेऊन, त्यानुसार अर्थ नियोजनाचा अभ्यास केल्यास उद्दिष्ट साध्य करणे सोपे जाते. आपण कुटुंबपद्धतीमध्ये विश्वास ठेवतो आणि म्हणूनच ‘कुटुंबाचे अर्थ नियोजन’ महत्त्वाचे. मग कुटुंबात एक जरी कमावती व्यक्ती असली तरी अर्थ नियोजन करताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा, उद्दिष्टांचा विचार करून गुंतवणूक करणे योग्य ठरते. घरात उत्पन्न आणणारी डोकी जास्त असतील तर त्यांनी मिळून बचत केल्यास ठरलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे सोपे होते. वयाच्या प्रत्येक टप्प्यात बचत वेगवेगळी असते, परंतु फक्त बचत करणे म्हणजे अर्थ नियोजन करणे असे नव्हे.

अर्थ नियोजन म्हणजे जमा केलेली बचत गुंतविण्यासाठी, नवनवीन योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय अभ्यासपूर्वक निवडून आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे. गुंतवणूकदाराच्या विविध वयांतील टप्प्यात आर्थिक उद्दिष्टे जशी बदलतात तशीच त्याची जबाबदारी, जोखीम घेण्याची क्षमता, होणारी बचत इत्यादी घटकदेखील बदलतात. हे विविध घटकांवर अवलंबून असते. गुंतवणुकीचे विविध पर्याय जसे गुंतवणूक – शेअर बाजारातील, रोख्यातील, सोन्यातील, बँकेच्या ठेवीतील, म्युच्युअल फंडातील, जमीनजुमल्यांतील इ. अशा विविध पर्यायांमध्ये योग्य पर्याय निवडणे हे खरे अर्थ नियोजन आहे. विविध पर्यायांची तुलना केल्यास आढळून येते की, ४० पेक्षा अधिक फंड घराणी १०० हून अधिक वेगवेगळ्या म्युच्युअल फंड प्रकारांचे पर्याय उपलब्ध करून देतात आणि हे पर्याय आयुष्याच्या विविध टप्प्यांवर कसे निवडावे हे मांडण्याचा हा प्रयत्न.

पहिला टप्पा : अर्थार्जनाच्या सुरुवातीचे वय वर्षे २२ ते २७

या वयातील जबाबदाऱ्या कमी असल्यामुळे, अंदाजे एकूण उत्पन्नाच्या सरासरी ८० टक्के बचत होऊ  शकते. आयुष्याच्या फक्त याच टप्प्यात सरासरी बचत होण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून योग्य असे, अधिक जोखमीचे, गुंतवणुकीचे पर्याय या वयासाठी योग्य ठरतात. सामान्यत: या वयात म्युच्युअल फंडाच्या समभाग आधारित योजना निवडणे योग्य ठरू शकते. या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भूत असते. जोखीम असल्याने अशा योजनेत शक्यतो एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान)द्वारे नियमित दीर्घ काळासाठी (किमान ५ वर्षे ते २० वर्षे) गुंतवणूक करावी, जेणेकरून ‘रूपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’ व चक्रवाढीचा फायदा मिळतो. आकर्षक उत्पन्न प्राप्त होते. यात गुंतवणूक करता यावेत असे विविध जोखीम आणि परताव्याचे प्रकार – लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज व मिड कॅप, मिड व स्मॉल कॅप, मल्टि-कॅप. तसेच या वयात ग्रोथ योजनेत, टॅक्स सेव्हिंग स्कीम्समध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते. ९० टक्के तरुणांवर या वयात कुटुंबाच्या (आई-वडील, त्यांची औषधे, घरचे भाडे, घराचा हप्ता इ.) जबाबदाऱ्या नसतात; परंतु या वयात जर जबाबदारी असेल तर गुंतवणुकीचे पर्याय बदलतात.

एकत्रित अर्थ नियोजनाचा दुसरा टप्पा: वय वर्षे २८ ते ३३

या वयात लग्न होऊन, नवीनच कुटुंबात जबाबदारीची नुकतीच चाहूल लागते. नवीन आयुष्याची सुरुवात, बाळाचे आगमन वगैरेतून खर्च वाढतात आणि बचत काहीशी मंदावते. या वयात खर्चाचे अगदी काळजीपूर्वक नियोजन केल्यास एकूण उत्पन्नाच्या सरासरी ५० टक्के बचत होते. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी, म्युच्युअल फंडातील मध्यम जोखमीच्या आणि दूरच्या टप्प्यातील गुंतवणुकीच्या योजना निवडल्या पाहिजेत, जेणेकरून बाळाच्या आगमनानंतर त्याच्या भविष्यातील शिक्षणासाठी, लग्नासाठी नियोजन करता येईल. त्यासाठी सेक्टर स्पेसिफिक फंड्स म्हणजे विशिष्ट व्यवसाय किंवा उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड्स निवडावेत. उदाहरणार्थ, बिँंकंग क्षेत्र/ आयटी क्षेत्र इ. योग्य पर्याय असू शकतील; परंतु या फंडात जास्त जोखीम असते म्हणून तसेच शेअर बाजाराची जाण असणाऱ्यांनीच अशा योजनेत गुंतवणूक करणे लाभदायक होऊ  शकते. तसेच या वयात ‘एसआयपी’द्वारे नियमित दीर्घकाळासाठी (किमान ५ वर्षे ते २० वर्षे) गुंतवणूक करणे फायद्याचे.

जबाबदार आयुष्य  : वय वर्षे ३४ ते ३९

आयुष्याचा हा टप्पा पूर्णपणे कुटुंबाला वाहून दिलेला, इतर अपेक्षांपेक्षा मुलांच्या इच्छा जास्त जवळच्या वाटतात. तारुण्यसुलभता हरवत चाललेल्या, घरातील वयोवृद्धांच्या औषधाचा खर्च, घराचा हप्ता, मुलांच्या वाढत्या मागण्या आदींमध्ये बचत होते, असे म्हणण्यात फारसा काही अर्थ उरत नाही. एकूण उत्पनाच्या जास्तीत जास्त १० टक्के बचत शक्य होते आणि म्हणूनच या टप्प्यात नवीन गुंतवणुकीचे पर्याय शक्यतो निवडणे कठीण जाते. केलेल्या गुंतवणुकीकडे लक्ष ठेवणे आणि त्याच पुढे घेऊन जाणे योग्य. खास करून शून्य जोखीम असणाऱ्या सरकारी रोख्यात गुंतवणूक करणारे गिल्ट फंड पूर्णपणे सुरक्षित पर्याय ठरतात. या वयात विविध कारणांसाठी रुपयांची गरज पडू शकते म्हणून लिक्विड फंड, जे थोडय़ा कालावधीसाठी गुंतवणूक करवितात त्यांना निवडणे योग्य ठरेल.

आरोग्यमान दक्षता : वय वर्षे ४० ते ५१

वयाचा हा मोठा टप्पा प्रत्येकास अपरिहार्यच. आपण थकतो आहोत याची जाणीव करून देण्यास येथून सुरुवात होते. म्हणून या वयात स्वत:च्या आणि जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे, नियमित वैद्यकीय तपासणी, मुलांच्या वाढत्या मागण्या, गृहकर्ज इ. अनेक घटक खर्चाच्या नियोजनाचा विचार करण्यास अधिक तीव्रतेने भाग पडतात. खर्चाचे उत्तम नियोजन करीत या वयात परत एकदा एकूण उत्पनाच्या सरासरी ३० टक्के बचत शक्य बनते, कारण नोकरी-पेशात अनुभवाच्या जोरावर उत्पन्न काहीसे वाढलेले असते. या वयात प्रामुख्याने विचार करावा तो आपल्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाचा. या वयात बॅलन्स्ड फंड जवळ करावेत. बचत जर नियमित होत असेल तर या वयात क्लोज-एंडेड अर्थात ठरावीक काळासाठी गुंतवणूक कुलूपबंद करणाऱ्या योजना निवडल्या जाऊ शकतात.

निवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज : वय वर्षे ५२ ते ५७

आता वेळ येते ती, अपत्यांच्या शिक्षणासाठी/ लग्नासाठी जी तरतूद, आर्थिक नियोजन केले असेल ती वापरण्याची. या वयात मुले काही प्रमाणात आर्थिक स्वावलंबी बनतात आणि आपले काही खर्च कमी होत बचतीचे प्रमाण वाढू शकते. ही बचत परत एकदा एकूण उत्पन्नाच्या अंदाजे ५० टक्के एवढी शक्य होऊ  शकते. या वयात परत एकदा जोखीम जास्त असणारे, कमी कालावधीतील ग्रोथ फंड निवडणे योग्य ठरते.

स्वत:चे आयुष्य जगण्याचे  वय : वर्षे ५८ च्या पुढे

आता वेळ आहे आनंदाने, स्वाभिमानाने आणि आपल्यासाठी जगण्याची. आपण केलेल्या आर्थिक नियोजनातून आता आपल्या उर्वरित आयुष्यासाठी उत्पन्न घेण्याची. या वयात आपल्या सर्व इच्छापूर्तीना प्राधान्य देत इंटरव्हल स्कीम योग्य उपाय ठरू शकेल तसेच इन्कम योजनेतील (सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यातील गुंतवणूक) – इन्कम प्लान (७५ ते ८०% रक्कम दीर्घ मुदतीच्या सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात व उर्वरित २० ते २५% रक्कम शेअर बाजारात गुंतवले जातात व नियमित दरमहा/त्रमासिक डिव्हिडंड दिला जातो), फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान (या योजनेत जवळपास जोखीम नसते), इ. योजनेद्वारे उत्पन्न उभे करता येऊ  शकते आणि आपणास स्वावलंबी जीवन देऊ करते.

आयुष्यभर सर्व जबाबदारी आनंदाने पूर्ण करीत, आपण केलेल्या, योग्य आर्थिक नियोजनामुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य समाधानाने, अगदी आधीसारखेच जगता येऊ  शकते आणि म्हणूनच निवृत्तीनंतरच्या काळासाठी तरुण वयापासूनच आर्थिक नियोजन करणे हाच शहाणपणाचा निर्णय ठरतो आणि त्यासाठी सर्व प्रकारे मदत करतात म्युच्युअल फंडाच्या विविध योजना..

दीपाली चांडक arthasanvad@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 1:03 am

Web Title: mutual funds for each stage of the finance planning
Next Stories
1 फंड विश्लेषण : कार्य सिद्धीस नेणारा फंड
2 ‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : पायाभूत विकासपर्वातील दमदार गडी..
3 माझा पोर्टफोलियो : ..तरी मूल्यांकन आकर्षक!
Just Now!
X