वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

मला महिन्याच्या खर्चासाठी आवश्यक रक्कम बाजूला काढून इतर रक्कम लिक्विड फंडात गुंतवायची आहे. या फंडात इन्स्टंट रिडम्प्शनडेबीट कार्डसारख्या सुविधा असलेला चांगला पर्याय सुचवा.

विजय वरतकर, पोलादपूर जि रायगड</strong>

उत्तर : ‘सेबी’ने प्रत्येक फंड घराण्याला ‘इन्स्टंट रिडम्प्शन’ सुविधा असणारा किमान एक फंड गुंतवणूकदारांना प्रस्तुत करणे सक्तीचे केले आहे. या सुविधेनुसार प्रत्येक फंड घराण्याने कमाल ५० हजार किंवा फंडातील गुंतवणुकीच्या ९५ टक्के रक्कम ‘इन्स्टंट रिडम्प्शन’ सुविधेच्या अधीन उपलब्ध असलेला एक फंड सादर केला आहे. रिलायन्स म्युच्युअल फंडाने एचडीएफसी बँकेशी करार करून एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड आणि एटीएम वापरून रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही फंडातून रक्कम काढून घेता येते. रिलायन्स लिक्विड फंड ट्रेझरी प्लान ग्रोथ ऑप्शनमध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम मिळण्याची ही सुविधा उपलब्ध आहे.

माझे वय ३१ वर्षे असून आम्ही दोघे पती-पत्नी नोकरी करतो. दोघांचे मिळून मासिक उत्पन्न ६२ हजार रुपये आहे. त्यापैकी २८,५०० गृहकर्जाचा हप्ता असून मासिक विमा हप्ता २,४५० आहे. बँकेत महिन्याला २,००० रुपये आवर्ती ठेव असून म्युच्युअल फंडात दोन हजाराची एसआयपीआहे. २,२०० घरभाडे आहे. पुरेसे विमा छत्र नाही. आम्हाला दोघांना आताच एक मूल झाले असून ते १४ दिवसाचे आहे. मला बचतीची गरज असून भविष्यातील नियोजन कसे असावे ते सांगावे.

सागर शिंदे, पाली, रायगड

उत्तर : ज्या वयात बहुसंख्य मंडळी पगार येण्याआधी चैन करण्यात खर्च करतात, त्या ऐवजी तुम्ही भविष्यातील खर्चाचा विचार करून बचत करू इच्छित आहात. मुलाच्या जन्माच्या १४ व्या दिवशी तुम्हाला तुमच्या वित्तीय जबाबदारीची जाणीव झाली ही आनंददायक घटना आहे.

वित्तीय नियोजनाची सुरुवात बचतीआधी विम्याच्या हप्त्याने करायची असते. तुम्ही दोघेही कमावते असल्याने आणि तुम्हाला दोघांना विमा सुरक्षिततेची गरज आहे. सर्वसाधारणपणे वार्षिक उत्पन्नाच्या २० पट विमा मिळत असल्याने तुम्ही पात्र रकमेचा आणि तुमच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत शुद्ध विमा खरेदी करावा. स्त्रियांना बाळंतपणापासून एक वर्षे विमा मिळत नसल्याने पत्नी एका वर्षांनंतर जीवन विम्यासाठी अर्ज करण्यास पात्र होतील. बरेचदा स्त्रियांना नोकरी करायची इच्छा असूनही बाळंतपणानंतर नोकरी करणे कठीण होते. पत्नीचा विमा खरेदी करण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करावा. विम्याची गरज कमावत्या व्यक्तीस असते. पत्नी नोकरी करणार नसेल तर त्यांना विम्याची आवश्यकता नाही.

शुद्ध विमा दोघांनी खरेदी केल्यानंतर सध्याच्या पॉलिसीची आवश्यकता नाही. ही पॉलिसी पेड-अप करून घेऊन हप्ते देणे थांबवावे. तुमचे भविष्यातील खर्च पाहता तुम्ही करीत असलेली २.००० रुपयांची म्युच्युअल फंडातील नियोजनबद्ध गुंतवणूक अतिशय तुटपुंजी आहे. तुम्हाला मासिक किमान १५ हजार रुपयांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीची गरज आहे. वित्तीय ध्येयांची वर्गवारी ही जवळच्या काळातील ध्येये, मध्यम कालावधीतील आणि दीर्घ कालावधीतील ध्येये अशी करून १५ हजाराच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीचे नियोजन करावे. वाढत्या पगाराप्रमाणे किमान बचतीच्या रकमेत वार्षिक पाच टक्के वाढ होणे गरजेचे आहे. हे ढोबळ मार्गदर्शन असून वित्तीय ध्येये आणि या ध्येयांची पूर्तता करणारे योग्य ते फंड आणि त्यांच्या निवडीसाठी कुशल वित्तीय नियोजकाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.

आपलेही म्युच्युअल फंडविषयक काही प्रश्न असतील तर, आम्हाला पाठवा : arthmanas@expressindia.com