एनएलसी इंडिया म्हणजे पूर्वाश्रमीची नेवेली लिग्नाइट कॉपरेरेशन भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक रत्न. पूर्वी फक्त खाणकाम आणि लिग्नाइट उद्योगात असलेली ही कंपनी आता औष्णिक ऊर्जा निर्मिती आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहे.

एनएलसी इंडियाचे पाच औष्णिक ऊर्जा प्रकल्प (थर्मल पॉवर स्टेशन्स) कार्यरत  असून त्यातून ३२४० मेगावॉट विजेची निर्मिती होते. त्या खेरीज सौर आणि ३४ पवन चक्की या द्वारे होणारी वीज निर्मिती लक्षात घेता कंपनीची एकूण ऊर्जा निर्मितीक्षमता ३३०१ मेगावॉट आहे. तसेच तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांत कंपनी त्या राज्यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प राबवत आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत सुमारे ८,५८१.५१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३,३९४.२१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावून कंपनीने सुखद धक्का दिला होता. यंदाच्या वर्षांतही पहिल्या सहामाहीपर्यंत कंपनीने उत्तम आर्थिक कामगिरी करून दाखविलेली आहे. सप्टेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १,९९२.८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३२६.६७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. आता पर्यंतच्या संपलेल्या बारमाहीचा विचार केला तर नफ्यात (३,४७२.३३ कोटी) २५५ टक्के वाढ दिसत आहे. कंपनी विस्तारीकरणाचे मोठे प्रकल्प राबवत असून २०२५ पर्यंत १,२८,९८३ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन ऊर्जा प्रकल्प तसेच वाढीव खाण प्रकल्पांचा समावेश आहे. कोळसा मंत्रालयाने त्याकरिता मंजुरी दिली असून जमीन अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे.

काही कंपन्या दुर्लक्षित राहतात मात्र नंतर अचानक प्रकाशात येतात तसेच काहीसे एनएलसीच्या बाबतीत होण्याची शक्यता वाटते. केवळ ४.६२ किंमत-उत्पन्न अर्थात पी/ई गुणोत्तर असलेल्या या कंपनीचे बाजारभावाच्या तुलनेत लाभांशाचे प्रमाण पाहता (७३ टक्के) एक दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक म्हणून एनएलसी इंडियाचा जरूर विचार करावा.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.