टाटा उद्योग समूहातील व्होल्टास ही एक प्रमुख अभियांत्रिकी कंपनी आहे. प्रकल्प उभारणी, अभियांत्रिकी उत्पादने, वस्त्रोद्योग, यंत्रसामग्री, ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम यंत्रसामग्री, पाणी प्रक्रिया प्रकल्प, वातानुकूलन यंत्रणा यांसारख्या बहु-व्यवसायात असलेली ही कंपनी आहे. निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा कराचा विपरीत परिणाम कंपनीच्या पहिल्या तिमाही निकालांवर स्पष्ट दिसून आला आणि चालू वित्तीय वर्षांच्या दुसऱ्या तिमाही निकालांवर वस्तू व सेवा कराचा विपरीत परिणाम कायम राहणार आहे. बदलत्या व्यवस्थेमुळे असंघटित क्षेत्राकडे असलेला व्यापार उदिमाचा वाटा, संघटित क्षेत्राकडे वळलेला दिसणार असल्याचा व्होल्टास प्रमुख लाभार्थी असेल.

व्होल्टास स्वत:च्या उत्पादनासोबत अनेक मुख्य उत्पादकांसाठी एक पुरवठादार म्हणून भूमिका बजावत असतो. व्होल्टासच्या मुख्य उत्पादनांच्या विक्रीवर वस्तू आणि सेवा कराचा परिणाम दिसला, तरी एक पुरवठादार म्हणून झालेल्या विक्रीत १७ टक्के वाढ झालेली दिसून येत आहे. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे सरासरी कर दोन टक्क्यांनी वाढून २८ टक्के झालेला असला तरी उत्पादित वस्तूंच्या किमतीत व्होल्टासने सध्या वाढ न करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

वातानुकूलन यंत्रांच्या ‘इन्व्हर्टर एसी’ या प्रकारच्या यंत्राच्या एकूण हिस्सा २१ टक्क्यांवर गेलेला आढळतो. व्होल्टास उत्पादन करीत असलेल्या फिक्स्ड स्पीड एसी प्रकारच्या विक्रीत वृद्धी झाली आहे. वातानुकूलन यंत्रांच्या बाजारपेठेतील एक स्पर्धक एलजीने ‘फिक्स्ड स्पीड एसी’ या प्रकारच्या यंत्रांचे उत्पादन थांबविल्यामुळे आणि आणि इन्व्हर्टर एसी श्रेणीतील वातानुकूलन यंत्रांच्या किमती निश्चित करण्याच्या धोरणात बदल केल्यामुळे एलजीची उत्पादने दर्शनी महाग वाटतात. मध्यम क्षमतेच्या यंत्रांचा मोठा हिस्सा काबीज करणे व्होल्टासला यामुळे शक्य झाले आहे. फिक्स्ड स्पीड एसी या प्रकारच्या वातानुकूलन यंत्रांना मुख्यत्वे ग्रामीण भागातून मागणी असल्याने आणि दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने व्होल्टासने या प्रकारच्या यंत्रांचे उत्पादन सुरू ठेवण्याचे धोरण आखले आहे. मल्टी ब्रॅण्ड आऊटलेट प्रकारच्या विक्री दालनातून विकल्या जाणाऱ्या वातानुकूलन यंत्रांपैकी सर्वाधिक यंत्रे व्होल्टासची असतात व यापुढे व्होल्टास आपला बाजार हिस्सा राखण्यात यशस्वी होईल.

युरोपमधील घरगुती वापराच्या वस्तूंची निर्माती असलेल्या आर्सेलिक एएस सोबत संयुक्त कंपनी व्होल्टासने स्थापन केली आहे. ही प्रस्तावित कंपनी कपडे धुलाई यंत्रे, शीत कपाटे, मायक्रोवेव्ह ओव्हन इत्यादी वस्तू व्होल्टास या नाममुद्रेने विकण्यात येणार आहेत. या वितरणाला ऑक्टोबर २०१७ पासून प्रारंभ होणार होता. दसऱ्यापासून सुरूहोणाऱ्या हंगामात या वस्तूंच्या वितरणास होणारा प्रारंभ ‘जीएसटी’ आणि अन्य काही कारणांनी निर्धारित कालमर्यादेपेक्षा उशीर झाला असून येत्या जानेवारीपासून उत्पादनांच्या विक्रीस सुरुवात होण्याची शक्यता व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात येत आहे. घरगुती वापराच्या वस्तूंची बाजारपेठ वार्षिक दोन कोटी नग असून, विक्रीत १२ ते १५ टक्के वार्षिक वाढ होत आहे. वाढत्या कौटुंबिक उत्पन्नामुळे मध्यमवर्गातील कुटुंबाचा कल या वस्तू खरेदी करण्याकडे आहे. वाढत्या नागरिकीकरणाचा लाभ व्होल्टासला होत आहे. सध्याचे व्होल्टासचे मूल्यांकन फारसे महाग नाही. येत्या दोन वर्षांतील उत्सर्जनातील (प्रति समभाग मिळकतीतील) वाढ लक्षात घेतली तर सध्याची किंमत उत्सर्जनाच्या २९ पट आहे. दोन ते तीन वर्षांच्या मध्यम कालावधीसाठी ही गुंतवणूक चांगली वृद्धी देऊ  शकेल असे मानायला वाव असल्याने ही शिफारस.

राजेश तांबे – arthmanas@expressindia.com

(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)