X

कर समाधान : इतर उत्पन्न आणि प्राप्तिकर कायदा

करदात्याने आपले उत्पन्न हे योग्य प्रकारामध्ये विभागणे गरजेचे असते.

प्राप्तिकर कायद्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न हे फक्त पाच प्रकारच्या उत्पन्नामध्ये विभागले जाते. (१) वेतन किंवा पगारातून उत्पन्न, (२) घरभाडे उत्पन्न, (३) धंदा-व्यवसायापासून उत्पन्न, (४) भांडवली नफा आणि (५) इतर उत्पन्न. करदात्याने आपले उत्पन्न हे योग्य प्रकारामध्ये विभागणे गरजेचे असते. याचे कारण असे आहे की प्रत्येक उत्पन्नाच्या प्रकारामध्ये काही विशिष्ट वजावटी आहेत (उदा. घरभाडे उत्पन्नातून ३० टक्के प्रमाणित वजावट मिळते, किंवा गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते), काही प्रकारच्या उत्पन्नावर कमी दराने कर भरावा लागतो (उदा. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के सवलतीच्या दराने कर भरावा लागतो, किंवा काही भांडवली नफा हा करमुक्त आहे, वगैरे). उत्पन्न चुकीच्या विभागात दाखविले तर त्या वजावटी किंवा कर सवलती घेता येणार नाहीत.

वर दर्शविलेले पहिले चार प्रकार हे ठरावीक उत्पन्न आहे. जे उत्पन्न पहिल्या चार प्रकारांत मोडत नाही ते ‘इतर उत्पन्नात’ गणले जाते. यामध्ये खालील उत्पन्नाचा समावेश होतो :

१) फर्निचर, यंत्र याचे भाडे : करदात्याचा फर्निचर किंवा यंत्रे भाडय़ाने देण्याचा व्यवसाय असेल तर त्यापासून मिळणारे उत्पन्न हे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून गणले जाते. जर हा व्यवसाय नसेल तर फर्निचर किंवा यंत्र भाडे हे ‘इतर उत्पन्नात’ गणले जाते.

२) इमारतीसाहित फर्निचर, यंत्र याचे भाडे : इमारतीचे भाडे हे घरभाडे उत्पन्नात गणले जाते. इमारतीचा वापर कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक किंवा निवासी) केला गेला असला तरी त्याचे भाडे घरभाडे उत्पन्नात दाखवावे लागते. परंतु जर करदात्याने इमारतीसहित फर्निचर, यंत्रे इत्यादी दिले असतील आणि एकत्रित करार केला असेल आणि प्रत्येकाचे भाडे वेगळे दर्शविले नसेल तर त्यापासून मिळणारे उत्पन्न घरभाडे उत्पन्नात गणले जात नाही. जर करदात्याचा हा व्यवसाय असेल तर हे उत्पन्न धंदा-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून गणले जाते. जर हा व्यवसाय नसेल तर हे ‘इतर उत्पन्नात’ गणले जाते.

३) व्याज : ज्या करदात्याचा पैसे व्याजावर देण्याचा धंदा असेल तर त्याचे उत्पन्न हे ‘धंदा-व्यवसायाचे उत्पन्न’ म्हणून समजले जाते. इतर करदात्यांसाठी व्याज हे उत्पन्न इतर उत्पन्न म्हणून गणले जाते. यामध्ये सर्व प्रकारच्या व्याजाचा समावेश होतो. बचत खाते, आवर्ती खाते, मुदत खाते, सरकारी रोखे, वैयक्तिक उधार वगैरे सर्व प्रकारच्या गुंतवणूक किंवा कर्जावरील व्याज हे इतर उत्पन्न या सदराखाली गणले जाते.

४) जमिनीचे भाडे : मागील लेखात सांगितल्याप्रमाणे इमारतीबरोबर त्यालगतची मोकळी जमीन भाडय़ाने दिली असल्यास त्याचे उत्पन्न घरभाडे उत्पन्न म्हणून गणले जाते आणि नुसती जमीन भाडय़ाने दिली असेल तर ते उत्पन्न घरभाडे उत्पन्न म्हणून गणले जात नाही. जमीन भाडय़ाने देण्याचा व्यवसाय करदाता करत असेल तर ते उत्पन्न धंदा-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून गणले जाते अन्यथा ते ‘इतर उत्पन्नात’ गणले जाते.

५) ‘कीमॅन विमा’ योजनेंतर्गत मिळालेले पैसे : या योजनेअंतर्गत मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश जर ‘वेतन’ किंवा ‘धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नात’ होत नसेल तर ते उत्पन्न ‘इतर उत्पन्न’ म्हणून गणले जाते.

परंतु खाली दर्शविलेले उत्पन्न हे ‘इतर उत्पन्न’ म्हणूनच गणले जाते :

१) लाभांश :

असा एक समज आहे की, लाभांश हा करमुक्त असतो. सर्व प्रकारचे लाभांश करमुक्त नसतात. भारतीय कंपन्यांनी दिलेला लाभांश ज्यावर ‘लाभांश वितरण कर’ (डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स) भरलेला आहे असा मिळालेला लाभांश करदात्याला करपात्र नसतो. त्यामुळे फक्त भारतीय कंपन्यांनी दिलेला लाभांश करमुक्त लाभांशामध्ये गणला जातो.

परंतु खालील लाभांश हा करपात्र असतो आणि तो ‘इतर उत्पन्न’ म्हणून विवरणपत्रात दाखवावा लागतो :

१. वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ), भागीदारी संस्था, इतर करदाते (स्वदेशी कंपनीव्यतिरिक्त) यांना मिळालेला शेअर्सवरील लाभांश १० लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे. या करदात्यांना १० लाख रुपयांपेक्षा जास्त लाभांशावर १० टक्के दराने कर भरावा लागतो. हा कर आपले इतर उत्पन्न कोणत्याही स्लॅबमध्ये असले तरी. करपात्र लाभांशाच्या (१० लाख रुपयांपेक्षा जास्त) उत्पन्नाच्या रकमेतून कोणतीही वजावट मिळत नाही.

२. परदेशी कंपन्यांकडून मिळालेला लाभांश : परदेशी कंपन्यांना ‘लाभांश वितरण कराच्या’ तरतुदी लागू नसल्यामुळे परदेशी कंपन्यांनी जाहीर केलेला लाभांश कलम १०(३४) नुसार करमुक्त नाही. असा लाभांश ‘इतर उत्पन्न’ या सदराखाली करपात्र आहे.

३. सहकारी संस्था किंवा सहकारी बँकांनी दिलेला लाभांश : प्राप्तिकर कलम ११५-ओनुसार फक्त भारतीय कंपन्यांना ‘लाभांश वितरण कर’ भरणे बंधनकारक आहे. आणि कलम १० (३४) नुसार, फक्त कलम ११५-ओनुसार ‘लाभांश वितरण कर’ भरणाऱ्या भारतीय कंपन्यांकडून मिळालेला लाभांश करमुक्त आहे. यानुसार भारतीय कंपन्यांशिवाय इतरांनी दिलेला लाभांश करमुक्त होत नाही. असा लाभांश ‘इतर उत्पन्न’ म्हणून करपात्र आहे.

२) भेटी आणि मोबदल्याशिवाय मिळालेली संपत्ती :

एकूण ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम, मोबदल्याशिवाय मिळालेले पैसे, म्हणजेच भेटी, या करपात्र आहेत. भेटी जर ५०,००० रुपयांपेक्षा कमी असतील तर त्या करमुक्त आहेत. जर एकूण भेटी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास संपूर्ण रक्कम करपात्र आहे. उदा. एका आर्थिक वर्षांत एकाला ‘अ’ या मित्राकडून २०,००० रुपयांची  भेट मिळाली, ‘ब’ या मित्राकडून २०,००० रुपये भेट मिळाली अशी एकूण ४०,००० रुपये भेट मिळाली तर ही ४०,००० रुपयांची भेट करमुक्त आहे समजा त्याला ‘क’ या मित्राकडूनसुद्धा  १२,००० रुपये भेट मिळाली आणि एकूण भेट ५२,००० रुपये मिळाली (म्हणजेच ५०,००० रुपयांपेक्षा जास्त) तर संपूर्ण हे ५२,००० रुपये करपात्र असतील.

ज्या स्थावर मालमत्तेचे मुद्रांक शुल्क प्रमाण (रेडीरेकनरप्रमाणे), मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशी स्थावर मालमत्ता कोणत्याही मोबादल्याशिवाय हस्तांतरित झाली असेल तर, रेडीरेकनरप्रमाणे असणारे स्थावर मालमत्तेचे मूल्य, हे मालमत्ता हस्तांतरित झालेल्या व्यक्तीला करपात्र आहे.

स्थावर मालमत्ता अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित झाली असेल तर मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य आणि मोबदला यामधील फरकाएवढी रक्कम (५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास) मालमत्ता हस्तांतरित झालेल्या व्यक्तीला करपात्र आहे. उदा. एका करदात्याने त्याच्या मित्राकडून एक घर १५,००,००० रुपयांना खरेदी केले, मुद्रांक शुल्काप्रमाणे त्या घराचे मूल्य २५,००,००० रुपये इतके आहे. हा व्यवहार अपुऱ्या मोबदल्याने झाला आहे आणि मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य हे मोबदल्यापेक्षा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त, म्हणजेच १०,००,००० रुपये (२५,००,००० वजा १५,००,००० रुपये) आहे. म्हणून, करदात्याला १०,००,००० रुपये हे ‘इतर उत्पन्न’ या सदराखाली करपात्र आहेत. जर मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य १५,४०,००० रुपये असते तर मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य हे मोबदल्यापेक्षा ५०,००० रुपयांपेक्षा कमी,  म्हणजेच ४०,००० रुपये (१५,४०,००० वजा १५,००,००० रुपये) असते तर करदात्याला ४०,००० रुपये उत्पन्न करपात्र नसते. हे इतर उत्पन्नात दाखविण्याची गरज नाही.

स्थावर मालमत्तेशिवाय इतर विशिष्ट मालमत्ता, ज्याचे ‘योग्य बाजार मूल्य’ ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशी मालमत्ता कोणत्याही मोबादल्याशिवाय हस्तांतरित झाली असेल तर, ‘योग्य बाजारमूल्य’ याप्रमाणे असणारे मालमत्तेचे मूल्य, हे मालमत्ता हस्तांतरित झालेल्या व्यक्तीला करपात्र आहे. उदा. एका करदात्याला त्याच्या मित्राने एक गाडी भेट दिली त्या गाडीचे ‘योग्य बाजारमूल्य’ ५,००,००० रुपये आहे. तर करदात्याला ही रक्कम करपात्र नाही. कारण गाडी ही ‘विशिष्ट मालमत्ता’ म्हणून गणली जात नाही. ही भेट जर दागिन्यांची असेल तर करदात्याला ही रक्कम करपात्र झाली असती.

स्थावर माल्मात्तेशिवाय इतर विशिष्ट मालमत्ता अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित झाली असेल तर ‘योग्य बाजारमूल्य’ याप्रमाणे मूल्य आणि मोबदल्यामधील फरकाएवढी रक्कम (५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर) मालमत्ता हस्तांतरित झालेल्या व्यक्तीला करपात्र आहे.

या तरतुदी खालील व्यवहारांसाठी लागू नाहीत :

– ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळालेली मालमत्ता. ठरावीक नातेवाईकांमध्ये पती/पत्नी, भाऊ, बहीण, पती किवा पत्नीचे भाऊ/बहीण, आई/वडिलांचे भाऊ/ बहीण, वंशपरंपरेतील किंवा पती/पत्नीच्या वंशपरंपरेतील इत्यादींचा समावेश होतो.

*  लग्नात मिळालेल्या भेटी-अहेर

*  मृत्युपत्राद्वारे किंवा वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता किंवा रक्कम,

*  धर्मादाय संस्थांकडून मिळालेली रक्कम, इत्यादी.

३) लॉटरी, शब्दकोडे, शर्यतीपासूनचे उत्पन्न, जुगार वगैरे :

लॉटरी, शब्दकोडे, शर्यतीपासूनचे उत्पन्न, जुगार, पत्ते इत्यादी खेळापासून उत्पन्न हे इतर उत्पन्न म्हणून गणले जाते. हल्ली टीव्हीवर अनेक गेम शो चालू असतात त्या शोमधून मिळणारी बक्षिसाची रक्कम ही उत्पन्न म्हणून करपात्र असते.

४) करदात्याला मालकाकडून मिळालेले भविष्य निर्वाह निधी, सेवानिवृत्ती निधी :

करदात्याला त्याच्या मालकाकडून भविष्य निर्वाह निधी, सेवानिवृत्ती निधी, राज्य विमा कामगार योजना किंवा इतर कामगार योजनेंतर्गत मिळालेले पैसे हे इतर उत्पन्न म्हणून करपात्र आहेत.

५) भांडवली संपत्ती करार रद्द झाल्यास :

भांडवली संपत्ती विक्रीसाठी आगाऊ रक्कम घेतली असेल आणि काही कारणाने करार रद्द झाला आणि आगाऊ  रक्कम जप्त केली असेल तर अशी आगाऊ  रक्कम ही इतर उत्पन्न म्हणून करपात्र असेल.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)

First Published on: October 2, 2017 1:24 am
  • Tags: Income Tax Act,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain