वरील निकष पाहिल्यावर काही चोखंदळ वाचक हा शेअर का सुचवला असे म्हणू शकतात. मात्र काही वेळा थोडा धोका पत्करून काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तीच गुंतवणूक भरपूर नफा मिळवून देऊ  शकते. पराग मिल्क ही मला त्यातलीच एक कंपनी वाटते.

arth03पराग मिल्क या १९९२ मध्ये स्थापन झालेल्या पुण्यातील कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी मे महिन्यात आला होता. प्रत्येकी २१७ रुपये अधिमूल्याने विक्रीस काढलेल्या या समभाग विक्रीला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. डेअरी आणि दुग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्या पराग मिल्कचे गो, गोवर्धन, टॉप अप आणि प्राइड ऑफ काऊज हे चार ब्रॅण्ड प्रसिद्ध आहेत. गो आणि गोवर्धन हे ब्रॅण्ड भारतातील अव्वल ब्रॅण्ड्समध्ये मोडतात. चीज, पनीर, बटर, दूध, दही, तूप आणि आता व्हे प्रोटीनमध्ये पदार्पण केलेल्या या कंपनीची उत्पादने बऱ्यापैकी चांगली, दर्जेदार आणि लोकप्रिय आहेत. टॉप अप ब्रॅण्ड खाली कंपनीने आता तरुण पिढीसाठी फ्लेवर्ड दूध बाजारात आणले आहे. त्याला बाजारात प्रतिसाद चांगला आहे. महाराष्ट्रातील २९ जिल्हय़ांतून तसेच आंध्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या शेजारच्या राज्यांतून कंपनीची सुमारे ३,४०० गावांत दूध केंद्र तर १६ डेपो आहेत. प्रतिदिन सुमारे २० लाख टन दूध प्रक्रिया करणाऱ्या पराग मिल्कची चीज प्रोसेसिंग क्षमता भारतातील सर्वात जास्त म्हणजे प्रतिदिन ४० मेट्रिक टन आहे. भारतात ३,००० हून अधिक वितरक असलेल्या या कंपनीची उत्पादने ३६ देशांत निर्यात होतात. तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल तितकेसे चांगले नाहीत. कंपनीने या कालावधीत ४३८.१९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २१.४५ कोटी रुपयांचा तोटा केला आहे. याची अनेक कारणे असली तरी महत्त्वाची तीन कारणे म्हणजे नोटाबंदीचा उलाढालीवर झालेला परिणाम तसेच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि विक्रीकरासंबंधी केलेली १६.५ कोटी रुपयांची तरतूद. येत्या वर्षांत कंपनी आपल्या जाहिरातीवरील तसेच भांडवली खर्चात वाढ करणार आहे. ग्रामीण भागासाठी कंपनीने नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. गेल्या काळात दुधाच्या किमतीची जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली होती. ही वाढ आपल्या उत्पादनावर एकदम न लादता टप्याटप्याने वाढविण्यात येईल. नुकतीच आणलेली नवीन उत्पादने बदाम मिल्क, दुधाची भुकटी तसेच अवतार या नावाने बाजारात आणलेले व्हे प्रोटीन या सर्व कारणामुळे कंपनीच्या उलाढालीत भरीव वाढ होईल. सध्या हा समभाग खराब निकालामुळे आयपीओच्या किमतीला उपलब्ध आहे. परागमधील दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला चांगला फायदा मिळवून देऊ शकेल.

arth04सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.