13 December 2018

News Flash

माझा पोर्टफोलियो : संयम हेच यशाचे गमक!

गेल्या १२ महिन्यांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,६२६ वरून ३४,०५६ अंशांवर गेला आहे

प्रातिनिधीक छायाचित्र

मराठी माणसाने शेअर बाजाराकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे व शेअर बाजारासारख्या अपारंपरिक गुंतवणुकीकडे वळावे या हेतूने सुरू झालेल्या आणि प्रत्यक्षात गुंतवणूकदारांना उत्तरोत्तर श्रीमंतीची अनुभूती देणाऱ्या समभागांच्या शिफारशीचे साप्ताहिक सदर सलग सहाव्या वर्षांत..

वर्ष २०१७ एकंदरीतच लक्षात राहील असे गेले. नोटाबंदीनंतरचा अपेक्षित अर्थसंकल्प, १ जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी, मूडीज या पतमानांकन संस्थेने बीएए-३ वरून बीएए-२ असा सुधारलेला भारताचा पतदर्जा, जागतिक बाजारपेठेत वाढत असलेले कच्च्या तेलाचे भाव आणि अर्थात गुजरात निवडणुका. इतके सगळे असूनही शेअर बाजारात मात्र कायम तेजीचेच वातावरण राहिले आहे. २६ डिसेंबरला ३४,००० चा टप्पा ओलांडल्यानंतर २०१८ मध्ये निर्देशांक ४०,००० वर जाणार काय असे कुतूहल वाटणे साहजिक आहे. खरे तर आपल्या आर्थिक प्रगतीचा अर्थात जीडीपी वाढीचा दर टक्क्यांनी घटला असून आपली वित्तीय तूटदेखील वाढत चालली आहे. सत्तेवर आल्यानंतर जीडीपी गणनेचे नवीन समीकरण काढून तो तेव्हा दोन टक्क्यांनी वाढविला होता, हेही इथे ध्यानात घेतले पाहिजे. बँकांच्या वाढत्या अनुत्पादित कर्जाबाबत सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेने उचललेले पाऊल, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच महागाई आणि बँकेचे व्याज दर नियंत्रणात असले तरीही औद्योगिक वाढीचा दर मात्र मर्यादितच किंबहुना कमी झाला आहे. वस्तू आणि सेवा कराचे संकलनदेखील घटले आहे. यंदा भारतीय वित्तीय संस्था आणि प्रामुख्याने म्युच्युअल फंडानी शेअर बाजारात सतत केलेली खरेदी वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल. याच तेजीचा फायदा घेऊन जीआयसी आणि न्यू इंडिया यासारख्या सरकारी विमा कंपन्यादेखील भरपूर अधिमूल्याने बाजारात सूचिबद्ध झाल्या. गेल्या दोन वर्षांत भारतीय शेअर बाजारातील शेअर्सचे सरासरी किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर १९ वरून २६ वर गेले असले तरीही नवीन वर्षांतदेखील तेजीचा हा माहोल असाच राहील अशी आशा आहे.

गेल्या १२ महिन्यांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,६२६ वरून ३४,०५६ अंशांवर गेला आहे म्हणजेच निर्देशांकात २७.९० टक्के वाढ झाली आहे. तर त्याच्या तुलनेत म्हणजे २०१६ सालच्या ‘माझा पोर्टफोलिओ’ने त्याच्या जवळपास दुप्पट म्हणजे ५४.९ टक्के अशी घसघशीत वाढ दाखविली आहे. इतका उत्तम परतावा शेअर बाजाराखेरीज इतर कुठलीही गुंतवणूक देऊ  शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यंदाच्या (२०१७ मध्ये) वर्षांतही आपल्या ‘माझा पोर्टफोलियो’चा परतावा ३३.४ टक्के आहे. सलग सहाव्या वर्षांत ‘माझा पोर्टफोलियो’ने हा षटकार मारला आहे. गेल्या सहा वर्षांत शेअर बाजारात अनेक चढ-उतार झाले. मात्र पोर्टफोलियोने कायम उत्तम कामगिरी करून गुंतवणूकदार वाचकांना समृद्ध केले आहे. पोर्टफोलियोच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमागे रिसर्च आणि थोडे परिश्रम असले तरीही वाचकांचा विश्वास, शेअर बाजारच्या चढ-उतारात गुंतवणूकदारांनी दाखविलेला संयम, केलेल्या सूचना आणि अर्थात नशिबाची साथ यांनाही श्रेय द्यावेच लागेल. योग्य वेळी केलेली खरेदी अथवा विक्री आणि वेळप्रसंगी ‘स्टॉप लॉस’ पद्धत कायम फायद्याची ठरते हे एव्हाना तुम्हाला कळून चुकलेच असेल.

पोर्टफोलियोमधील काही कंपन्या फायदेशीर ठरतात तर काही तोटय़ात. अर्थात, फायदा करून दाखविणाऱ्या कंपन्या जास्त असतील किंवा फायद्याचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही फायद्यात राहाल. २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत सुचविलेल्या काही कंपन्यांच्या शेअर्सपैकी ज्या शेअर्समध्ये ५०० टक्क्यांपेक्षा जास्त फायदा झाला आहे अशा कंपन्यांची नावे खाली दिली आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी हे शेअर्स अजूनही ठेवले असतील ते खरे दीर्घकालीन, संयमी आणि यशस्वी गुंतवणूकदार.

First Published on January 1, 2018 12:35 am

Web Title: patience is the achievement of success ajay walimbe maza portfolio positive approach stock market