19 February 2019

News Flash

माझा पोर्टफोलियो : ..या संधीचे सोने करावे!

किंबहुना आपण घेतलेल्या कंपनीचा शेअर चांगला असेल तर तो शेअर पुन्हा खरेदी करावा.

अजय वाळिंबे

वर्ष २०१७ मधील घवघवीत नफ्यानंतर २०१८ ची सुरुवातदेखील धडाकेबाज झाली होती. शेअर बाजार निर्देशांकाने ३५,४०० चा टप्पा गाठला असला तरीही आपले शेअर्स मात्र का खाली जात आहेत असा प्रश्न पडणे साहजिक आहे. शेअर बाजार निर्देशांकांत केवळ लार्ज कॅप शेअर्सचा समावेश असल्याने, मिड-कॅप तसेच स्मॉल कॅप शेअर्सच्या घसरणीचा परिणाम निर्देशांकावर होत नाही. त्यामुळेच शेअर बाजारातील सध्याची पडझड मुख्यत्वे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये असल्याने त्याचा विशेष परिणाम निर्देशांकावर झालेला दिसत नाही. पुस्तकी अर्थसंकल्प, दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील लागू झालेला कर, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेतील वाढते व्याज दर आणि बदलते व्यापार धोरण तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारी युद्ध या सर्वाचा प्रतिकूल परिणाम शेअर बाजारावर झालाच. अर्थात या सर्वच बाबींचे परिणाम दूरगामी असल्याने तसेच देशांतर्गतही बँकांची अनुत्पादित कर्जाची समस्या, वाढती वित्तीय तूट, वस्तू सेवा कराचा कमी झालेला महसूल, बेरोजगारीचा प्रश्न आणि सरकारला दावे व वास्तव याचे आलेले भान याचा नकारात्मक परिणाम सध्याच्या बाजारावर झालेला दिसून येतो.

कुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती. परंतु दरवर्षी शेअर बाजारात घवघवीत नफा मिळेल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. गेल्या काही वर्षांत शेअर बाजाराने अगदी सामान्य गुंतवणूकदाराला देखील भरभरून दिले आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील झालेली भरघोस वाढ अवाजवी वाटू लागल्याने त्यात विक्री होणे अपेक्षित होते. अजूनही अनेक स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सचे भाव दोन वर्षांपूर्वीच्या मानाने चढे असल्याने त्यांच्यात पुन्हा तेजी यायला वेळ लागेल.

यंदाचा बाजाराचा कल पाहता यावर्षी पोर्टफोलियोमध्ये लार्ज कॅप शेअर्सच्या निवडीवर तसेच ‘कंझम्प्शन थीम’ (मागणी/उपभोग) वर भर दिला आहे. अनेकदा या स्तंभातून सुचविल्याप्रमाणे शेअर बाजारात मंदीच्या लाटेचा फायदा हुशार गुंतवणूकदार घेत असतात. आपला वाचक वर्ग आता केवळ आर्थिक साक्षरच नव्हे तर तरबेज गुंतवणूकदार झाला असेल अशी अपेक्षा करून गुंतवणूकदार या संधीचे सोने करतील अशी अपेक्षा करूया.

आपल्या पोर्टफोलियोचा परतावा सध्या ०.७ टक्के अशा किरकोळ नुकसानीत असला तरीही त्याचा ‘आयआरआर’ १०.५ टक्के आहे. तसेच पोर्टफोलियोमध्ये सुचविलेली शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी गांगरून जाण्याचे काहीच कारण नाही. किंबहुना आपण घेतलेल्या कंपनीचा शेअर चांगला असेल तर तो शेअर पुन्हा खरेदी करावा. कारण मंदीत खरेदी करताना आपण खरेदी करत असलेला शेअर अजून किती खाली जाईल याची कल्पना नसल्याने अशा शेअर्सची टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हिताचे ठरते.

तसेच याच काळात लार्ज कॅप तसेच डिफेन्सिव्ह शेअर्स तुम्हाला तारू शकतात. त्यामुळे फार्मा, एफएमसीजी क्षेत्रातील तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे शेअर्स ही सुरक्षित खरेदी ठरू शकते. तसेच गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना त्या कंपनीवर कुठलेही कर्ज नाही किंवा त्या कंपनीचे इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर किमान ३ आहे याची खात्री करून घ्या.

जाता जाता महत्त्वाचे!

या स्तंभात पूर्वी सुचविलेल्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये खूप घसरण झाल्याने काही गुंतवणूकदारांच्या ई-मेल्स आल्या होत्या. गंमत म्हणजे हे शेअर्स सुचविल्यावर त्यामध्ये उत्तम वाढ झाली होती. खरे तर गुंतवणूकदाराने आपले टार्गेट पूर्ण झाल्यावर ते शेअर्स विकणे किंवा त्यातील किमान ५० टक्के शेअर्स विकणे अपेक्षित आहे. तसेच आतापर्यंत अनेकदा सांगितल्याप्रमाणे ‘स्टॉप लॉस’ पद्धत अवलंबणे अपेक्षित आहे.  दुर्दैवाने काही गुंतवणूकदार हे शेअर्स नफ्यात असताना विकत नाहीत आणि नंतर तो शेअर पडत असताना बघत राहतात. निदान आज हा लेख वाचल्यानंतर तरी वाचक गुंतवणूकदार धडा घेऊन अशा प्रकारे होणारे नुकसान टाळतील अशी अपेक्षा करूया.

First Published on July 2, 2018 5:14 am

Web Title: performance of stocks share performance performance shares