18 February 2019

News Flash

निर्देशांकांनी तळ गाठला का?

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून येत्या आठवडय़ातील निर्देशांकांच्या संभाव्य वाटचालीचा वेध..

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

अनेकांगाने सुन्न करणारा घटनाक्रम सुरू असताना, तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून येत्या आठवडय़ातील निर्देशांकांच्या संभाव्य वाटचालीचा वेध..

बाजाराचा तंत्र कल

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे सरलेल्या आठवडय़ात निर्देशांकांनी ३३,५००/ १०,३५० चा स्तर आसपासच्या नाटय़मय घडामोडीत देखील टिकवून ठेवला. यात नीरव मोदी, गीतांजली जेम्स् – पंजाब नॅशनल बँक आणि त्या अनुषंगाने इतर सरकारी बँकांचा हमीपत्रांद्वारे झालेला घोटाळा, त्यातून होणारा संभाव्य तोटा याचा एकत्रित परिणाम ‘बँक निफ्टी’ निर्देशांक कोसळण्यात होत होता. भरीला रोटोमॅक कर्ज-घोटाळा, त्यानंतरचा फोर्टसि हेल्थकेअरच्या आर्थिक ताळेबंदावर सनदी लेखाकारांनी स्वीकृती व स्वाक्षरी करण्यास दिलेला नकार (सनदी लेखाकारांनुसार कंपनी प्रवर्तकांनी ४५० कोटींची रक्कम खासगी कारणांवरून इतर कंपन्यांमध्ये वळवली आहे.) त्या अनुषंगाने बाजार नियत्रंक – ‘सेबी’ने कंपनीला दिलेली नोटीस आणि हे सर्व ज्ञात असताना गुंतवणूक क्षेत्रातील ज्येष्ठ, अग्रगण्य गुंतवणूकदारांनी फोर्टिसच्या भागभांडवलाचा हिस्सा खरेदी करणे, अशा उलटसुलट डोक्याला सुन्न करणाऱ्या मंदीपूरक घटना घडत असताना निर्देशांकांनी तांत्रिक विश्लेषणातील महत्त्वाचा असा ३३,५००/ १०,३५० चा स्तर तर राखलाच आणि या स्तराचा आधार घेत सणसणीत वरची उसळी मारली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

   शुक्रवारचा बंद भाव –

*  सेन्सेक्स : ३४,१४२.१५     

* निफ्टी    : १०,४९१.00

आता चालू असलेली सुधारणा ही तळ मारल्यानंतरची तेजी की क्षीण स्वरूपाची सुधारणा (रिलीफ रॅली) या प्रश्नाचे उत्तर निर्देशांकावरील ३४,१०० ते ३४,५०० आणि निफ्टीवरील १०,५०० ते १०,६०० चा स्तर देईल.

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाला ३४,१०० / १०,५०० आणि त्यानंतर ३४,५००/ १०,६०० चा स्तर ओलांडण्यास वारंवार अपयश आल्यास निर्देशांक ३३,४८० / १०,२५० आणि नंतर ३२,५०० /१०,०५० पर्यंत खाली घसरू शकतो. शाश्वत तेजी ही ३५,३००/ १०,८०० च्या स्तरावरच सुरू होईल.

सोन्याचा  

किंमत-वेध

सोन्याच्या भावाने रु. २८,००० वरून ३०,७०० चा पल्ला अवघ्या दीड महिन्यात गाठल्यामुळे सोन्याच्या आलेखावर हलक्याशा विश्रांतीचा उल्लेख केला होता. ही विश्रांती आपण आता अनुभवत आहोत. सोन्याच्या भावाच्या बाबतीत रु. ३०,५०० ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी (ट्रेंड डिसायडर लेवल) आहे. रु. ३०,५०० च्या वरील इच्छित उद्दिष्ट हे रु. ३०,८०० ते ३१,१०० असे असेल. रु. ३०,५०० च्या स्तराखाली सोने रु. ३०,२०० ते ३०,००० पर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग

एडेल्वाईस फायनान्शियल

(बीएसई कोड – ५३२९२२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २६०.६०

ल्ल  वित्तीय सेवा पुरवणारी, विमा व्यवसाय, लघुउद्योजकांना अर्थसाहाय्य करणारी अशा या सर्व क्षेत्रातील भांडवली बाजारातील आघाडीची कंपनी म्हणजे एडेल्वाईस फायनान्शियल. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा रु. २२५ ते २७५ आहे. रु. २७५च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट  रु. ३०० ते रु. ३२५ आणि दीर्घकालीत उद्दिष्ट रु. ३७५ ते ४०० असेल. गुंतवणूक योग्य रक्कम २५ टक्क्य़ांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रु. १७५ चा स्टॉप लॉस ठेवावा.

आशीष अरविंद ठाकूर ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on February 26, 2018 5:43 am

Web Title: possible movement of stock market index in the coming week