पॉवर ग्रिड कॉपरेरेशन ही सरकारी कंपनी असून भारतातील नवरत्न कंपन्यांतील एक प्रमुख कंपनी आहे. भारतातील ती विजेच्या पारेषणातील सर्वात मोठी कंपनी असून जगातील देखील सर्वात मोठी पॉवर ट्रान्समिशन यूटिलिटी कंपनी आहे. कंपनीची एकूण १४२,९८९ सीकेएम लांबीची ट्रान्समिशन लाइन्स असून तिची २२६ उप-स्टेशन्स आहेत. एकूण उलाढालीपैकी जवळपास ९१ टक्के उलाढाल ऊर्जा क्षेत्रातील असून उर्वरित उलाढाल ही कंपनीच्या इतर व्यवसायातील म्हणजेच टेलिकॉम तसेच कन्सल्टन्सी सेवेतून आहे.

चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सरकार भारतातील कानाकोपऱ्यात वीज पुरविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारीत आहे. अर्थात हा पल्ला गाठण्याकरिता मोठे आर्थिक नियोजन, सरकारी क्रियाशीलता आणि अर्थात सर्वच स्तरांवर नियोजन आणि सहकार्याची गरज असल्याने ते तितकेसे सोपे नाही. अपेक्षेप्रमाणे कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षांत आतापर्यंत सुमारे ३५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला असून त्यामध्ये चम्पा- कुरुक्षेत्र, वर्धा- निजामाबाद आणि अंगुल- श्रीकाकुलम या प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनीचे एक लाख कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकल्पांवर काम चालू असून येत्या चार वर्षांत जवळपास १.२४ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड

भारतातील १५० हून अधिक ग्राहकांना ट्रान्समिशनसंबंधी कन्सल्टन्सी सेवा देणाऱ्या कंपनीने आता जगभरातील २० देशांतील २५ मोठे ग्राहक मिळवले आहेत. २००७ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यावर कंपनीने कायम उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. जून २०१७ तिमाहीअखेर कंपनीने ७१८१.३५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २०५२.४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षांच्या तिमाहीपेक्षा तो १४ टक्कय़ांनी अधिक आहे. सरकारी निर्गुतवणूक  अपेक्षित असली तरीही उत्तम कामगिरीमुळे तसेच हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे हा शेअर वर्षभरात २० टक्के परतावा देऊ  शकेल. मध्यमकालीन गुंतवणुकीसदेखील आकर्षक परतावा देऊ  शकेल.

‘माझा पोर्टफोलियो’च्या वाचकांना दिवाळीची खरेदी मुद्दाम वेगळी सांगायची गरज नाही. गेल्या वर्षांत याच स्तंभातून सुचविलेल्या शेअर्सपैकी तब्बल १० शेअर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे ज्या वाचक-गुंतवणूकदारांनी हे शेअर्स पोर्टफोलियोमध्ये अजूनही ठेवले असतील त्यांची दिवाळीच..

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.