07 April 2020

News Flash

कर-बोध :  विवरणपत्र वेळेत दाखल करा.. अन्यथा विलंब शुल्क भरा!

म्युच्युअल फंडाकडून मिळालेल्या लाभांशावर गुंतवणूकदाराला कर भरावा लागत नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रवीण देशपांडे

प्रश्न : मी बँकेतून सेवानिवृत्त झालो आहे. मी बँकेत मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतविले आहेत. माझा प्रश्न असा आहे की, बँकेने ३१ मार्च रोजी मुदत ठेवींवरील व्याज गणून उद्गम कर वजा केला आहे; परंतु हे व्याज माझ्या बचत खात्यात जमा केलेले नाही, तर हे व्याज मला उत्पन्न म्हणून दाखवावे लागेल का?

– सुरेश शिंपी, ईमेलद्वारे

उत्तर : व्याज हे बचत खात्यात प्रत्यक्ष जमा झाल्यानंतर उत्पन्न म्हणून दाखवायचे (कॅश बेसिस) किंवा जमा झालेले दाखवायचे (अक्रुड बेसिस) हे करदात्याने ठरवायचे असते. करदात्याने निवडलेली ही पद्धत करदात्याने सातत्याने पाळली पाहिजे. बँक मात्र ठरावीक कालावधीने जमा झालेले व्याज गणून त्यावर उद्गम कर (टीडीएस) कापून सरकारकडे जमा करीत असते. त्यामुळे करदात्यानेसुद्धा या पद्धतीने उत्पन्न दाखविल्यास उद्गम कराचा दावा करणे सोपे जाईल.

प्रश्न : मी केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झालो आहे. मला मिळालेली रक् कम मी म्युच्युअल फंडात गुंतविली आहे. मला या गुंतवणुकीवर दरमहा ७,००० रुपये इतका लाभांश मिळतो. हा लाभांश करपात्र आहे का?

– मनोहर ठाणेकर, ईमेलद्वारे

उत्तर : म्युच्युअल फंडावरील लाभांश हा करमुक्त आहे. म्युच्युअल फंडाकडून मिळालेल्या लाभांशावर गुंतवणूकदाराला कर भरावा लागत नाही. या लाभांश वितरणावर फंडाला कर भरावा लागतो.

प्रश्न :  माझे वय ६५ वर्षे आहे. मला निवृत्तिवेतन मिळते आणि बँकेतील बचत खाते आणि मुदत ठेव यावरील व्याज मिळते. मला विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरावा लागेल?

– नीलेश कोल्हे, वर्धा

उत्तर : आपले उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी असले तर आपल्याला विवरणपत्राचा फॉर्म १ भरता येईल.

प्रश्न : मी माझे स्वत:चे चौथ्या मजल्यावरील घर भाडय़ाने दिले आहे आणि मी दुसरीकडे पहिल्या मजल्यावरील भाडय़ाच्या घरात राहतो. माझ्या घराच्या भाडय़ाचे मला वर्षांला १,०४,००० रुपये मिळतात आणि मी ज्या घरात राहतो त्या घराचे वर्षांला दीड लाख रुपये भाडे देतो. विवरणपत्रात १,०४,००० रुपये घरभाडे उत्पन्न दाखवून दीड लाख रुपयांची वजावट घेता येईल का?

– जयदीप आफळे, पुणे

उत्तर : घर भाडय़ाने दिले असेल तर त्यावरील उत्पन्न ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरात दाखवावे लागते. आपल्याला मिळालेले उत्पन्न हे करपात्र आहे. (आपणास मिळालेले उत्पन्न हे नगरपालिकेने ठरविलेले मूल्य, त्या भागातील वाजवी मूल्य आणि भाडे नियंत्रण कायद्यांतर्गत आदर्श भाडे यापेक्षा जास्त आहे असे गृहीत धरले आहे. कारण या मूल्यांपेक्षा, आपल्याला प्रत्यक्ष मिळालेले घरभाडे जास्त असेल तर, प्रत्यक्ष मिळालेले घरभाडे करपात्र आहे.) या घरभाडय़ाच्या उत्पन्नातून मालमत्ता कर, ३० टक्के प्रमाणित वजावट आणि व्याजाची वजावट फक्त घेता येते. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खर्चाची वजावट आपल्याला घेता येत नाही. कलम ८० जीजीनुसार आपण भाडय़ाच्या घरात राहात असल्यास घरभाडय़ाची वजावट घेता येते; परंतु ही वजावट आपले स्वत:चे घर असल्यास मिळत नाही.

प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. बँकेने माझ्या मुदत ठेवींवरील व्याजावर २५,००० रुपयांचा उद्गम कर (टीडीएस) कापला आहे. बँकेच्या काही तांत्रिक कारणाने फॉर्म १६ अ माझ्या नावाने बनत नाही; परंतु बँक मला लेटरहेडवर उद्गम कर कापल्याचे प्रमाणपत्र देण्यास तयार आहे. मला या प्रमाणपत्रावर कर परतावा मिळेल का?

अरविंद कुलकर्णी, ईमेलद्वारे

उत्तर : उद्गम कराचा दावा करावयाचा असेल तर फॉर्म १६ अ मिळविणे गरजेचे आहे. फॉर्म १६ किंवा फॉर्म १६ अ मधील रक्कम फॉर्म २६ एएस मध्ये दर्शविली जाते. आपण ही रक्कम आपल्या विवरणपत्रात दाखवू शकता; परंतु प्राप्तिकर खाते ती रक्कम आपल्याला फॉर्म २६ एएस मध्ये दिसल्याशिवाय आपला उद्गम कराचा दावा ग्राह्य़ धरत नाही. बँकेने उद्गम कर कापला असेल तर बँकेला फॉर्म १६ अ देणे बंधनकारक आहे. आपण बँकेकडे पाठपुरावा करून फॉर्म १६ अ मिळविणे गरजेचे आहे.

प्रश्न : माझ्याकडे एकच राहते घर आहे. मी या राहत्या घराचा मालमत्ता कर भरला आहे आणि शिवाय सोसायटीला देखभाल खर्चसुद्धा दिला आहे. मला या दोन्ही खर्चाची वजावट मिळेल का? असल्यास ती विवरणपत्रात कुठे दाखवावी?

अमित कांबळी, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्याकडे एकच राहते घर असेल तर त्या घराचे ‘घरभाडे उत्पन्न’ शून्य समजले जाते. या उत्पन्नातून मालमत्ता कराची वजावट आणि ३० टक्के प्रमाणित वजावट घेता येत नाही. यातून फक्त गृह कर्जावरील व्याजाची वजावट घेता येते. त्यामुळे आपल्याला कोणत्याच खर्चाची वजावट घेता येणार नाही.

* प्रश्न : मी पुण्याला राहतो आणि काही कारणाने मला गावी दोन महिने राहावे लागत आहे आणि मी घरी परत ऑगस्ट महिन्यात परतत आहे. माझे विवरणपत्र मी ऑगस्टमध्ये दाखल करू शकतो का? मला दंड भरावा लागेल का?

– प्रकाश जाधव, ईमेलद्वारे

उत्तर : ३१ मार्च २०१८ पर्यंत विवरणपत्र, कर निर्धारण वर्ष संपल्यानंतर दाखल केल्यास ५,००० रुपये दंडाची तरतूद होती. करदात्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जात होती; परंतु ही तरतूद १ एप्रिल २०१८ पासून रद्द करण्यात आली आहे. या तरतुदीऐवजी कर निर्धारण वर्ष १ एप्रिल २०१८ पासून विवरणपत्र वेळेत दाखल न केल्यास शुल्क भरावे लागणार आहे. हा दंड नाही, त्यामुळे करदात्याला आपले म्हणणे मांडण्याची संधीसुद्धा मिळणार नाही. आपले कारण कोणतेही असो, विवरणपत्र वेळेत दाखल न केल्यास, आपल्याला हे शुल्क भरावे लागेल. हे शुल्क खालीलप्रमाणे-

उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा

विवरणपत्र दाखल करण्याची तारीख जास्त   कमी

३१ डिसेंबर २०१८ पूर्वी           ५,०००  १,०००

३१ डिसेंबर २०१८ नंतर          १०,००० १,०००

त्यामुळे आपल्या उत्पन्नानुसार आपल्याला शुल्क भरावे लागेल. करदात्यांनी आपले विवरणपत्र वेळेत दाखल करा आणि शुल्क वाचवा.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:22 am

Web Title: pravin deshpande article on information about income tax return file
Next Stories
1 गुंतवणूक कट्टा.. : कर्ज किती घ्यावे?
2 डेट फंडाची विक्री  आणि कर आकारणी!
3 माझा पोर्टफोलियो : गमावलेली खरेदीची संधी परत!
Just Now!
X