23 October 2018

News Flash

‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : रिगॅसिफिकेशन इंधनमंत्र!

कंपनी आखातातून द्रव रूपातील वायू भारतात आयात करून पुन्हा वायुरूपात भारतात वितरित करण्याच्या व्यवसायात आहे.

पेट्रोनेट एलएनजी ही कंपनी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील गेल, ओएनजीसी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी प्रवर्तित केली आहे. कंपनीचे दहेज आणि कोची येथे दोन एनएनजी टर्मिनल्स असून तिसरा टर्मिनल बांधण्याचे काम आंध्र प्रदेशात गंगावरम येथे सुरू आहे. कंपनी आखातातून द्रव रूपातील वायू भारतात आयात करून पुन्हा वायुरूपात भारतात वितरित करण्याच्या व्यवसायात आहे. या व्यवसायातील कच्च्या मालाचा पुरवठा आणि वायू रूपातील मागणी यांच्यातील जोखीम कमी करण्यासाठी कंपनीने रास गॅस, कतार यांच्याशी द्रव रूपातील वायूपुरवठय़ासाठी तर कंपनीच्या प्रवर्तक असलेल्या कंपन्यांशी वायू रूपातील तयार मालासाठी दीर्घकालीन कंत्राट केले आहे. कंपनीला नफा मुख्यत्वे ‘रिगॅसिफिकेशन’ मुळे होत आहे. मागील पाच वर्षांत कंपनीच्या ‘रिगॅसिफिकेशन’ क्षमतेत वार्षिक १५ टक्के वाढ झाली असून गंगावरम येथील प्रक्रिया क्षमता सुरू झाल्यानंतर विद्यमान क्षमतेत २५ टक्के भर पडणार आहे.

कंपनीच्या भाग भांडवलात ६५ टक्के वाटा प्रवर्तक आणि आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थांचा असून ही गुंतवणूक धोरणात्मक प्रकारची आहे. प्रवर्तकांपैकी गेल भारतातील सर्वात मोठी वायू वितरण करणारी कंपनी आहे तर अन्य प्रवर्तक कंपन्या तेल आणि वायू क्षेत्रातील बलाढय़ कंपन्या आहेत. या कंपन्यांनी इंधनपुरवठय़ाच्या व्यवसायात बस्तान बसविले असल्याने याचा फायदा व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने पेट्रोनेट एलएनजीला होत आहे. गेलने दहेज- उरण आणि दहेज- विजापूर या दोन पाइपलाइन्सचा क्षमता विस्तार केला असून त्यामुळे पेट्रोनेट एलएनजीला थेट ग्राहकापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. कंपनी दहेज येथे तयार होणारा वितरणयोग्य वायू ६०:३०:१० या प्रमाणात अनुक्रमे गेल, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यांना विकते. तर कोची येथील उत्पादित वायू ३०:३०:४० या प्रमाणात अनुक्रमे विकते. हे कंत्राट २५ वर्षांचे आहे. कंपनी दहेज येथील प्रक्रिया केंद्रातून तयार होणारा वायू मुख्यत्वे पश्चिम आणि उत्तर भारतातील ग्राहकांसाठी पुरवठा करते. तर कोची येथील प्रक्रिया केंद्रात तयार होणारा वायू दक्षिण भारतातील ग्राहकांना पुरविला जातो. ‘रिगॅसिफाइड एलएनजी’ हे अन्य इंधनांच्या तुलनेत स्वस्त आणि पर्यावरणस्नेही इंधन असल्याने अनेक कारखाने आपली इंधनाच्या गरजा ‘रिगॅसिफाइड एलएनजी’ने भागवत आहेत. विशेषत: वीज आणि रासायनिक खताच्या उत्पादकांनी आपल्या इंधनाच्या गरजात बदल केला असून अनेक उत्पादक आपली प्रकिया कोळशावरून ‘रिगॅसिफाइड एलएनजी’वर बदलत आहेत. पर्यावरणविषयक नियम कठीण होत असल्याने हे उत्पादक आपल्या व्यवसायाचा विस्तार करताना इंधन म्हणून ‘रिगॅसिफाइड एलएनजी’ला पसंती देत आहेत.

वर्ष २०२२ पर्यंत पश्चिम भारतातील ‘रिगॅसिफाइड एलएनजी’ची मागणी १०० एमएमएस सीएमडी इतकी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या पश्चिम भारतातील विद्यमान ग्राहकांपैकी एस्सार (हाजिरा), एनटीपीसी (कासाव आणि गांधार), जीएसपीसी, अडानी (दहेज पॉवर प्लांट), महाजेन्को (उरण विस्तार) हे ग्राहक नवीन क्षमता स्थापित करीत असून या क्षमता विस्तारात ‘रिगॅसिफाइड एलएनजी’ला इंधन म्हणून पसंती दिली आहे. दिल्ली- मुंबई औद्योगिक मालवाहतूक सुविधा ही भारतातील सर्वात मोठी पायाभूत विकास योजना असून यादरम्यान जगातील एका मोठे औद्योगिक उत्पादन आणि व्यापारकेंद्र उदयाला येत आहे. परिणामी भविष्यात ‘रिगॅसिफाइड एलएनजी’साठी नवीन बाजारपेठ विस्तारत आहे. अमेरिकेत शेल गॅसच्या उत्पादनाला मागील दशकात सुरुवात झाल्यापासून आखातातील एलएनजीची मागणी घटली असल्याचा परिणाम एलएनजीच्या किमती स्थिर राहण्यात झाली आहे. या कंपनीच्या नफ्याची टक्केवारी जरी स्थिर असली तरी ‘रिगॅसिफाइड एलएनजी’ वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या नफ्यात वाढ होईल.

कमी जोखीम आणि वर्षांगणिक नफ्यात निश्चित वाढ असलेला हा समभाग आपल्या गुंतवणुकीचा भाग असायला हवा. (समाप्त)

arthmanas@expressindia.com

(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)

First Published on December 25, 2017 12:34 am

Web Title: regasification fuel petronet lng company