13 December 2018

News Flash

नियमित उत्पन्न स्रोतांचा गुरूमंत्र एसडब्ल्यूपी

बँकेच्या मुदत ठेवी किंवा कॉर्पोरेट एफडी, पोस्टाचे मन्थली इन्कम प्लान (एमआयपी) हे सेवानिवृत्तांचे आवडते पर्याय आहेत.

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर  नियमित उत्पन्नाची आवश्यकता असते. विशेषत: सेवानिवृत्तीपश्चात जेव्हा दर महिन्याला मिळणारा पगार थांबतो तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो. निवृत्तीवेळी एकरकमी पूंजी मिळते पण तीवर आयुष्य कसे काढायचे, हा ज्येष्ठांना प्रश्न सतावत असतो. बँकेच्या मुदत ठेवी किंवा कॉर्पोरेट एफडी, पोस्टाचे मन्थली इन्कम प्लान (एमआयपी) हे सेवानिवृत्तांचे आवडते पर्याय आहेत. अलीकडे दरमहा लाभांश देणाऱ्या म्युच्युअल फंडांकडे ओढा वाढलेला दिसतो. परंतु निश्चित उत्पन्न देणारे हे पर्याय सुरक्षित वाटले तरी ते महागाईवर मात करू शकत नाहीत.  गुंतवणुकीतील मर्यादित जोखीम आणि महागाईपेक्षा अधिक परतावा या कारणांमुळे सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लान अर्थात ‘एसडब्ल्यूपी’ निश्चितच उजवा पर्याय आहे. तुलनात्मक वेध घेत त्याची आपण चाचपणी करूया.

मुदत ठेवी/कॉर्पोरेट एफडी

मुद्दलाच्या सुरक्षिततेसह, नियमित आणि खात्रीने उत्पन्न यासाठी बँक अथवा कॉर्पोरेट मुदत ठेवींना पसंती दिली जाते. परंतु  या गुंतवणुकीतील जोखीमेकडे मात्र दुर्लक्ष होत असते. पहिली जोखीम म्हणजे ठरावीक मुदतीअंती हाती पडणारी रक्कम तसेच तिमाही/ सहामाही/वार्षिक मिळणारा व्याज लाभ हा करपात्र असतो आणि त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो. दुसरी जोखीम ही पुनर्गुतवणुकीची आहे. ठेवींची मुदत संपल्यानंतर, मुदत वाढविताना त्यावेळी प्रचलित व्याजदराप्रमाणे लाभ गुंतवणूकदाराला दिला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत साधारण वार्षिक ८.५ ते ९ टक्के असलेला मुदत ठेवींवरील व्याजदर हा सध्या वार्षिक ६.५ टक्क्य़ांवर आला आहे. प्रचलित प्रवाह पाहता, व्याजाचे दर आणखी खालावत जाण्याची शक्यता आहे. अशाच तऱ्हेच्या जोखीमा पोस्टाच्या एमआयपी योजनांनाही लागू आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे महागाई दरापेक्षा सरस परताव्याची या पर्यायांमधून अपेक्षा करता येत नाही. त्या तुलनेत भांडवली वृद्धी आणि कर कार्यक्षमता ठासून भरलेली म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नासाठी ‘एसडब्ल्यूपी’  संकल्पना कैक अंगाने फायदेशीर नक्कीच म्हणता येईल.

 ‘एमआयपीसरस आहे काय?

म्युच्युअल फंडांची मासिक उत्पन्न योजना (मन्थली इन्कम प्लान – एमआयपी) आहेत. हा एक रोखे संलग्न हायब्रीड फंड असून, त्यातून अल्प प्रमाणात (पाच ते ३० टक्क्य़ांदरम्यान) समभागात गुंतवणूक केली जाते. अलीकडे अनेकांचा नियमित उत्पन्नासाठी या फंडाकडे ओढा वाढल्याचेही दिसून येते. मासिक लाभांश वितरण करणाऱ्या या फंडातून नियमित उत्पन्नाचा स्रोत शोधणारेही गुंतवणूकदार आहेत. आता या गुंतवणुकीतील जोखमांकडे वळू या. ‘सेबी’च्या नियमानुसार लाभांशाचे वितरण हे नफा वसुलीतून करायचे असल्याने या फंडांचे निधी व्यवस्थापक लाभांश वितरणाइतक्या रकमेची मालमत्ता विकून नफा वसुली करतात. त्यामुळे लाभांश वितरणानंतर फंडाची एनएव्ही लाभांशाइतक्या रकमेने कमी होते. येथे मासिक लाभांश किती जाहीर करायचा ते निधी व्यवस्थापन ठरवत असल्याने, विपरीत बाजार परिस्थितीमुळे फंडास त्या महिन्यांत नफा झाला नाही तर फंड व्यवस्थापन लाभांश जाहीर करू शकणार नाही. मासिक लाभांशाचा टेंभा मिरविणाऱ्या एका मोठय़ा फंडास याच कारणाने तीन वेळा लाभांश जाहीर करणे टाळावे लागले होते. केवळ या उत्पन्नावर मदार असलेल्या सेवानिवृत्तींसाठी असे लाभांश अपवादाचे महिने खूपच गैरसोयीचे ठरतील. शिवाय एमआयपी योजनांतून मिळालेला लाभांश हा कर कार्यक्षम नसतो.  ‘एमआयपी’ पद्धतीच्या फंडांनी दिलेल्या लाभांशावर २८.८४ टक्के लाभांश वितरण कर (डीडीडी) भरावा लागतो. या तुलनेत ‘एसडब्ल्यूपी’मध्ये किती पैसे काढून घ्यायचे हे गुंतवणूकदार ठरवत असल्यामुळे विनाखंड स्रोत सुरू असतो.

एसडब्ल्यूपीचे महत्त्व!

ही अशी सुविधा आहे जी एखाद्या गुंतवणूकदारास पूर्वनिर्धारित कालांतराने (मासिक, तिमाही वगैरे) अस्तित्वात असलेल्या म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याची परवानगी देते. अशा तऱ्हेने पद्धतशीर काढून घेतलेल्या पैशाची दुसऱ्या फंडात पुनर्गुतवणूक केली जाऊ  शकते किंवा या रकमेचा गुंतवणूकदाराकडून वर म्हटल्याप्रमाणे उदरनिर्वाहाचा खर्च भागविण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

‘एसडब्ल्यूपी’च्या माध्यमातून किती रक्कम काढून घ्यायची ते गुंतवणूकदार स्वत: ठरवितो. शिवाय गुंतवणूकदाराला त्या रकमेत वार्षिक वाढ करणेसुद्धा शक्य आहे. याला ‘स्टेप-अप एसडब्ल्यूपी’ असे म्हटले जाते. वाढत्या महागाईसह वर्षांगणिक खर्च वाढत असल्याने हातात येणारी रक्कमही वाढणे गरजेचे असते, यासाठी ‘स्टेप-अप एसडब्ल्यूपी’ हा उत्तम मार्ग आहे.

स्टेप-अप एसडब्ल्यूपीचे स्वरूप

सर्वसाधारणपणे सेवानिवृत्ती पश्चात ‘एसडब्यूपी’साठी बॅलन्स्ड फंडाची तज्ज्ञांकडून शिफारस केली जाते.  सोबतच्या कोष्टकात ‘स्टेप-अप एसडब्ल्यूपी’च्या स्पष्टीकरणासाठी वापरलेले फंड  हे ‘बॅलन्स्ड फंड’ गटातील चांगली कामगिरी असलेले पाच फंड आहेत. बॅलन्स्ड फंड गुंतवणुकीतील मर्यादित धोका आणि महागाईहून अधिक मिळणारा परतावा हे फायदे समभाग गुंतवणूक वगळता अन्य कोणत्याही गुंतवणूक साधनांतील गुंतवणुकीतून मिळत नाहीत. चतुर गुंतवणूकदार बाजाराच्या चढ-उतारांचा परतावा वाढविण्यासाठी उपयोग करून घेतात. समभाग गुंतवणूक ६५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या या फंडातून एका वर्षांनंतर काढलेली रक्कम करमुक्त असते. तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातून तीन वर्षांनंतर काढलेल्या रकमेला ‘इंडेक्सेशन’चा लाभ मिळतो.

कोष्टकात तीन फंडाची ‘एसडब्ल्यूपी’ कामगिरी दाखविली आहे. या कोष्टकात दोन वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वार्षिक पाच टक्के वाढत जाणारी आणि दरवर्षी १० टक्के वाढत जाणारी रक्कम ‘स्टेप-अप एसडब्यूपी’ पद्धतीने काढण्यात आली आहे.  सेवानिवृत्तीपश्चातच्या ‘एसडब्ल्यूपी’साठी तीन किंवा चार बॅलन्स्ड फंडांची शिफारस केली जाते. चार फंड असल्यास तिमाहीतून एकदा फंडातून रक्कम काढली जाते, किंवा दरमहा रक्कम काढण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. ज्याची जशी गरज त्यानुसार ‘एसडब्ल्यूपी’चा वापर करता येतो.

सारांशात, संचयाच्या कालावधीत म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीतून दरमहा रक्कम मिळविण्याचे ‘एसडब्ल्यूपी’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. या पद्धतीत जी लवचीकता आहे ती लाभांश पद्धतीत नाही. भांडवली वृद्धी आणि कर कार्यक्षमता ठासून भरलेली असल्याने नियमित मासिक उत्पन्नासाठी मुदत ठेवींच्या ऐवजी आपल्या गुंतवणूक मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार ‘एसडब्ल्यूपी’चा वापर करायला हवा. हाच नव्या युगाचा गुरुमंत्र आहे.

arthmanas@expressindia.com

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

First Published on December 25, 2017 12:32 am

Web Title: regular income sources systematic withdrawal plan