av-03आज सर्रास फोन येतात, ‘‘तुम्ही शेअर बाजारात, कमॉडिटी बाजारामध्ये गुंतवणूक करता का?’ आमच्याकडे डिमॅट खाते उघडा, खरेदी / विक्रीसाठी नोंदणी करा व आमच्या शिफारशीनुसार गुंतवणूक करा व भरपूर नफा मिळवा.’ हे सर्व फोन दिल्ली किंवा गुजरातमधून येत असतात. काही ब्रोकर आपल्या ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे शिफारशी करीत असतात. डे ट्रेटिंगसाठी ‘सल्लागार’ व्हॉट्अस अपवर ग्रुपसुद्धा असतात आणि हे कोणीही दुसऱ्याला सहज फॉरवर्ड करतो.
तथापि, बाजार नियंत्रक ‘सेबी’ने सर्व जनतेस सावध करण्याच्या दृष्टीने परिपत्रक क्र. २३५ / २०१५ हे २३ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध केले आहे. ज्यांना गुंतवणूक सल्ला किंवा संशोधन विश्लेषक (रिसर्च अ‍ॅनालिस्ट) सल्ला हवा असेल त्यांनी ‘सेबी’द्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा नोंदणीकृत संशोधन विश्लेषकांची मदत घ्यावी. असा सल्ला घेण्यापूर्वी त्यांनी सेबीच्या वेबस्थळावर (www.sebi.gov.in) जाऊन अशा सल्लागारांची नावे तपासून घ्यावीत. मगच व्यवहार करावा.
सर्वसामान्य जनतेने रोखे / शेअर बाजारात व्यवहार करताना अशा नोंदणीकृत नसलेल्या सल्लागारांनी दिलेल्या टिप्सची किंवा शिफारशींना, मोठय़ा परताव्याच्या आमिषांना भुलून जाऊ नये. तुम्हाला मोबाईलवर येणारे लघुसंदेशाच्या टिप्स किंवा सोशल साईट्सवरील पोस्ट्स किंवा वैयक्तिक,  फोन कॉल, ई-मेल संदेशांवरील माहिती योग्य असेलच असे नाही.
सेबी कायदा १९९२ नुसार, सेबी (इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर) परिपत्रक, २०१३ आणि सेबी (रिसर्च अ‍ॅनालिस्ट) परिपत्रक २०१४ नुसार कोणतीही व्यक्ती अथवा संस्था सेबीजवळ नोंदणीकृत असल्याचा दाखला घेत नाही, तोपर्यंत गुंतवणूक सल्लागार किंवा संशोधन विश्लेषक म्हणून काम करू शकत नाही. नोंदणी न करता व्यवहार केल्यास सेबी कायदा नियम ११ नुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.
शेअर ब्रोकरना या नोंदणीतून वगळण्यात आले आहे म्हणून त्यांच्या ग्राहकांना ई-मेलने सल्ला-शिफारशी पाठवणे शक्य होते. पण म्हणून ते दुसऱ्यांना फॉरवर्ड करणे योग्य नाही. त्या प्रमाणेच कंपनी सेक्रेटरी, वकील, सनदी लेखापाल यांना या नोंदणीतून वगळण्यात आले आहे. म्हणून त्यांना गुंतवणूक सल्लागार किंवा रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून व्यवसाय करता येणार नाही. त्यांचा या बाबतचा सल्ला त्यांच्या मूळ वकिली किंवा सनदी लेखापाल या व्यवसायाच्या अनुषंगाने आलेला असणे अभिप्रेत आहे.
आज भारतात गुंतवणूक सल्लागार, आíथक नियोजनकार, विश्लेषक हे शब्द कोणीही, कसेही ढिसाळपणे वापरतो. आज म्युच्युअल फंड एजंट आपल्या नावापुढे गुंतवणूक सल्लागार हा शब्द न वापरता, आíथक नियोजनकार, निवृत्ती नियोजनकार इ. बिरूदे लावत असतात. त्यातील काही ‘सर्टफिाईड फायनान्शियल प्लॅनर (सीएफपी)’ ही किंवा तत्सम परीक्षाही पास झालेले नसतात. पुष्कळसे विमा सल्लागार ‘लाईफ प्लॅनर’ असे आपल्या कार्डावर छापतात.
भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)तर्फे अकरावी म्युच्युअल फंड परिषद मुंबईत ३० जून २०१५ रोजी झाली. त्यावेळेस मुख्य अतिथी सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा होते. त्यांनी एकच व्यक्ती दलाल आणि गुंतवणूक सल्लागार असण्याबद्दल तसेच सल्लागार म्हणून नोंदणी न करण्याबाबत नाराजी व्यक्ती केली होती. ‘‘छोट्या शहरांत कदाचित हे मोठय़ा प्रमाणावर होत असेल परंतु हे जास्त काळ चालवून घेता येणार नाही. गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्याच्या दृष्टीने गुंतवणूक सल्लागार नोंदणी आवश्यक केली आहे.’’ सेबीला छोटय़ा शहरांत ज्यांची रोजीरोटी या दलालीवर अवलंबून आहे असे लहान एजंट आपल्याला काय संबोधून (सल्लागार/दलाल) घेतात याची चिंता/काळजी वाटते. परंतु मोठय़ा शहरातून दिवसाढवळ्या प्रतिष्ठित बँकांचे प्रतिनिधी चुकीचे मुच्युअल फंड किंवा चुकीच्या विमा पॉलीसी गळ्यात मारतात ते दिसत नाही. रघुराम राजन यांनी बँकांना सुचवले आहे की, त्यांनी या व्यवसायापेक्षा त्यांच्या मुख्य व्यवसायातील कर्ज थकीतावर (एनपीए) लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
३१ डिसेंबर २०१२ पासून इंग्लंडमध्ये तेथील नियामक संस्था ‘फायनान्शियल सíव्हसेस अथॉरिटी’ व ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज् अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट कमिशन’ यांनी ऑस्ट्रेलियात १ जुल २०१३ पासून गुंतवणूक सल्लागार नियमावली तयार केली आहे. तोच नियम सेबी भारतात लागू करीत आहे. यात ग्यानबाची मेख इतकीच आहे की दोन्ही देशांची लोकसंख्या साक्षरतेचे प्रमाण (आíथक साक्षरतेचे सुद्धा) एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दलाल व सल्लागार यांचे प्रमाण आणि त्याच तुलनेत भारतातील प्रमाण यांचा विचार झालेला नाही.
आज भारतात नोंदणीकृत दलाल भरपूर आहेत, परंतु त्यातील सक्रिय दहा हजारसुद्धा नाहीत. म्हणजे साधारणत: सव्वा लाख लोकांमागे एक दलाल तसेच २०१३ ऑक्टोबर पासून फक्त २९८ गुंतवणूक सल्लागार सेबीजवळ नोंदणीकृत झाले आहेत म्हणजे ४२ लाख लोकांस एक. आज भारतात सर्टफिाइड फायनान्शियल प्लॅनर परीक्षा उत्तीर्ण झालेले जवळपास पाच हजार लोक आहेत. चार्टर्ड वेल्थ मॅनेजर, सीएफए,तत्सम परीक्षा पास होऊन सल्लागार म्हणून काम करू शकतात असे जवळपास पाच हजार लोक असू शकतात. परंतु सेबीजवळ नोंदणीकृत होण्यास कोणाला इच्छा नाही.
याला कारणे दोन. सेबीच्या तावडीत न सापडता चार हात दूर राहण्याला लोक पसंती देतात. हे तावडीत सापडणे म्हणजे सेबीने आखून दिलेल्या नियमावलीचे अनुपालन (कंप्लायन्स) होय. दुसरे म्हणजे मागील दोन वर्षांत जरी सल्लागारांची तपासणी (इन्स्पेक्शन) झालेली नसली तरी कधीही होऊ शकते. बोहारणीला कोरा करकरीत शालू जरी दिला तरी त्यात ती काहीतरी खोट काढतेच, तसे या तपासणी अधिकाऱ्यांचे असते. पूर्वी शेअर दलाल म्हणून आमच्याही कार्यालयात एक तपासणी अधिकारी आला. त्याने ‘केवायसी फॉर्म’वरील फोटोवर काही ग्राहकांनी सही न केल्याने दंड नमूद केला होता. मग सल्लागार म्हणून नोंदणी करून ‘आ बल मुझे मार’ हे कोण करेल? माझ्या परिचयातील एका सीएफपीने आíथक नियोजनकाराचा व्यवसाय बंद करून कंपनी सेक्रेटरी म्हणून व्यवसाय सुरू केला. तर दुसऱ्याने पूर्वी बंद केलेला सनदी लेखापालाचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. मला एका मोठय़ा म्युच्युअल फंडाच्या उच्च पदस्थाने नाव न सांगण्याच्या अटीवर एक मुद्दा सांगितला, ‘आप कुछ भी करो, लेकीन सेबी के साथ पंगा नहीं लेना।’ आपल्या नियमकाबद्दल किती आत्मीयता व आत्मविश्वास आहे बघा. असे असेल तर कोण नोंदणी करेल.
दुसरा मुद्दा गुंतवणूकदारांची मानसिकता – त्यात महत्त्वाचा भाग गुंतवणूकदारांची धोका पत्करण्याची क्षमता व वृत्ती यांचा अंदाज घेऊन गुंतवणूक योजना सुचविणे. मध्यमवर्गीय माणसांस जमीन, घर, सोने-चांदी यातील गुंतवणूक १०० टक्के सुरक्षित वाटते. गुंतवणूक सल्लागाराने कितीही धोके समजावून दिले तरी अशीलास ते मान्य नसतात. रिस्क प्रोफाईलनुसार समतोल गुंतवणूक करावयाची झाल्यास गुंतवणूक म्हणून घेतलेले दुसरे घर विका सांगितल्यास ग्राहक पळून जाईल.
तसेच आज गुंतवणूकदारांची सल्लागाराला फी देण्याची मानसिकता नाही. आयुर्वमिा व अल्पबचत  एजंटांनी आपल्याला मिळणाऱ्या दलालीतील अर्धा हिस्सा गुंतवणूकदारांना परत देण्याची सवय वर्षांनुवष्रे चालू ठेवली आहे आणि हेच एजंट स्वत:ला सल्लागार म्हणवून घेतात. मग तुम्हाला आम्ही वरती फी काय म्हणून द्यायची असा ते प्रश्न विचारतात.
सनदी लेखपालांना सीए इन्स्टिटय़ूट मार्गदर्शन करते. कंपनी सेक्रेटरींना त्यांची इन्स्टिटय़ूट मार्गदर्शन करते. (ऑडिट कसे करावे, रिपोर्ट कसा द्यावा वगैरे) सेबीद्वारा नोंदणीकृत सल्लागारांची अशी संस्था नाही. गेल्या दोन वर्षांत नोंदणीकृत सल्लागारांचे प्रश्न हाताळण्यासाठी सेबीने एकही बठक घेतलेली नाही. सेबीचा कोणताही अधिकारी स्थापनेपासून (१९९२) सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न समजावून घेताना कोणी पाहिला आहे काय? राजकारणी लोक निदान पाच वर्षांतून एकदा तरी भेटतात. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय लोकांची मानसिकता समजत नाही. यांना फक्त थंड हवेच्या ऑफिसात बसून ‘फर्मान’ काढता येतात. म्हणून सेबीबद्दल दहशत वाटते (दरारा नव्हे), आदर किंवा आत्मीयता तर नाहीच नाही.
(लेखक सेबीद्वारा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)
sebiregisteredadviser@gmail.com