21 November 2017

News Flash

कर  समाधान : ज्येष्ठ नागरिक आणि प्राप्तिकर कायदा

भारतातील कायद्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे.

प्रवीण देशपांडे | Updated: May 15, 2017 3:35 AM

संयुक्त राष्ट्राच्या अनुमानानुसार भारतात २०११ मध्ये ९ कोटी ज्येष्ठ नागरिक होते आणि ही संख्या वाढत आहे.

भारतातील कायद्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्राच्या अनुमानानुसार भारतात २०११ मध्ये ९ कोटी ज्येष्ठ नागरिक होते आणि ही संख्या वाढत आहे. भारताने १९९९ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर केले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी योजना राबवत आहे.

वित्त मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना आखल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने प्राप्तिकर कायद्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेल्या सवलती, विमा, पेन्शन, बचतीवर जास्त व्याज वगैरेंचा समावेश होतो.

* व्याज : बँकेत आणि पोस्ट ऑफिसात ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना सुरू केल्या आहेत. सर्व बँका ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% पर्यंत जास्त व्याज देतात. निश्चलनीकरणानंतर व्याज दरात बरीच घट झाली. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे प्रमुख उत्पन्न व्याज आहे. वाढती महागाई आणि कमी होणारे व्याज दर ही मोठी समस्या ज्येष्ठ नागरिकांना सतावत आहे. उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालणे कठीण झाले आहे. आपल्या पंतप्रधानांनी ३१ डिसेंबर २०१६ रोजी अशी घोषणा केली की, ज्येष्ठ नागरिकांच्या ७,५०,००० रुपयांपर्यंतच्या ठेवीवर ८% इतके व्याज दिले जाईल.

* प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी :

प्राप्तिकर कायद्यात ज्येष्ठ नागरिक हे दोन प्रकारांत विभागले आहेत.

*     ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे असे ज्येष्ठ नागरिक आणि,

*     ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे असे अतिज्येष्ठ नागरिक.

करदात्याने आर्थिक वर्षांत (त्या वर्षांत कोणत्याही दिवशी) ६० वर्षे किंवा ८० वर्षे पूर्ण केली आहेत त्या वर्षांपासून तो अनुक्रमे ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक होतो. उदा. एखाद्या करदात्याची जन्मतारीख १० डिसेंबर, १९५६ आहे त्याच्या वयाची ६० वर्षे आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये पूर्ण होतात, त्यामुळे तो ज्येष्ठ नागरिक आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून होतो. आता प्रश्न पडतो की, ज्यांचा जन्म १ एप्रिल १९५७ रोजी झाला आहे त्याचा ६० वा वाढदिवस १ एप्रिल २०१७ रोजी येतो म्हणजेच आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये येतो, त्याला आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा मिळेल का? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जुलै २०१६ मध्ये परिपत्रक जारी करून असे सांगितले आहे की, वरील उदाहरणात ६० वा वाढदिवस १ एप्रिल २०१७ असला तरी ६० वर्षे पूर्ण आदल्या दिवशी म्हणजे ३१ मार्च २०१७ रोजी पूर्ण झाल्यामुळे त्या करदात्याला ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा मिळेल.

* करसवलत : ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ (कर निर्धारण वर्ष २०१७-१८) साठी खालील दराने करआकारणी होईल :-
arth03

*     ज्या ज्येष्ठ नागरिकाचे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांना कलम ८७ अनुसार ५,००० रुपयांपर्यंत करसवलत मिळते. हे विचारात घेऊन ३,५०,००० रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.

* ज्या ज्येष्ठ नागरिकाचे करपात्र उत्पन्न ३,५०,००० रुपयांपेक्षा कमी आहे अशांना कलम ८७ अनुसार २,५०० रुपयांपर्यंत करसवलत मिळते. हे विचारात घेऊन ३,५०,००० रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.

*      ही सवलत फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. अनिवासी भारतीयांना ही सवलत मिळत नाही. जर एखाद्या अनिवासी भारतीयाचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असले तरी तो प्राप्तिकर कायद्यासाठी ज्येष्ठ नागरिक होणार नाही.

* विवरणपत्र दाखल करण्यात सवलत:

ज्या करदात्याचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी कर परताव्याचा (रिफंड) दावा केला आहे अशा करदात्यांना विवरणपत्र संगणकाद्वारे ई-फाइल करणे बंधनकारक आहे. म्हणजेच ज्या करदात्याचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे किंवा ज्यांनी कर परताव्याचा दावा केलेला नाही, अशा करदात्यांना विवरणपत्र संगणकाद्वारे ई-फाइल करणे बंधनकारक नाही. ते कागदी विवरणपत्र दाखल करू शकतात. यामध्ये अतिज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली आहे. जर करदाता अतिज्येष्ठ नागरिक असेल आणि त्याचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याने कर परताव्याचा दावादेखील केला आहे अशा अतिज्येष्ठ करदात्यांना विवरणपत्र संगणकाद्वारे ई-फाइल करणे बंधनकारक नाही, असे करदाते कागदी विवरणपत्र दाखल करू शकतात.

* अग्रिम कर भरण्यापासून सुटका :

जर करदात्याचे प्रस्तावित कर दायित्व (उद्गम कर वजा जाता) १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर आणि १५ मार्चपूर्वी अनुक्रमे १५%, ४५%, ७५% आणि १००% इतका अग्रिम कर भरावा लागतो. खालील करदात्यांना या तरतुदी लागू नाहीत :

*     करदाता ज्येष्ठ नागरिक असेल तर आणि

*      करदात्याच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश नसेल तर.

या दोन्ही अटींची पूर्तता झाल्यास करदात्याला अग्रिम कर भरावा लागत नाही. उदा. ज्येष्ठ नागरिकाचे उत्पन्नामध्ये व्याज, घरभाडे, भांडवली नफा यांचा समावेश आहे आणि त्याचे प्रस्तावित करदायित्व २५,००० रुपये इतके आहे. वरील तरतुदीनुसार या करदात्याला अग्रिम कर भरावा लागणार नाही. हा कर विवरणपत्र भरण्यापूर्वी सरकारकडे जमा करता येतो, यावर व्याज किंवा दंड भरावा लागणार नाही.

या तरतुदीसुद्धा फक्त निवासी भारतीयांसाठी आहेत. अनिवासी भारतीय ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश नाही अशांनासुद्धा अग्रिम कर भरावा लागतो.

* उद्गम करापासून सुटका :

ज्या ज्येष्ठ नागरिकांना व्याज किंवा घरभाडे उत्पन्न मिळते आणि त्यांच्या एकूण करपात्र उत्पन्नावर कर देय नाही असे करदाते फॉर्म १५ एच उद्गम कर कापणाऱ्याला देऊन उद्गम कर कापण्यापासून रोखू शकतात.

* अतिरिक्त वजावटी :

प्राप्तिकर कायद्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही अतिरिक्त वजावटीची तरतूद आहे. या तरतुदी खालीलप्रमाणे :

कलम ८० डी : ज्येष्ठ नागरिकांसाठी भरलेल्या मेडिक्लेम विम्याची आणि आरोग्य तपासणीसाठीची वजावट ३०,००० रुपयांपर्यंत मिळते. इतर नागरिकांसाठी ती २५,००० रुपये इतकी आहे. या कलमांतर्गत दिल्या जाणाऱ्या विम्याची रक्कम रोखीने दिल्यास मात्र वजावट मिळत नाही.

कलम ८० डीडीबी : या कलमाद्वारे स्वत:च्या किंवा अवलंबून असलेल्या नातेवाईकाच्या ठरावीक रोगांसाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट मिळते. या वजावटीची कमाल मर्यादा ४०,००० रुपये इतकी आहे. वैद्यकीय खर्च भरमसाट वाढल्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ६०,००० रुपये इतकी आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ८०,००० रुपये इतकी आहे.

* विवरणपत्राची तपासणी नाही :

प्राप्तिकर खात्याकडून तपासणीची सूचना आल्यास अनेकांना भीती वाटते. प्राप्तिकर अधिकारी त्या वर्षीचे व्यवहार तपासतात आणि त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा त्या वर्षीच्या विवरणपत्रात उत्पन्न कमी दाखविले गेल्यास त्यावर कर, व्याज आणि दंड आकारला जातो. बऱ्याच करदात्यांच्या बाबतीत असे होते की, प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींच्या अज्ञानामुळे काही चुका होतात आणि अशा तपासणीमुळे कर व्याज आणि दंड भरावा लागतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २०११ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार ज्येष्ठ नागरिकाच्या विवरणपत्राची तपासणी होणार नाही. परंतु याला काही अपवाद आहेत. जर ज्येष्ठ नागरिकाच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश असल्यास किंवा प्राप्तिकर खात्याकडे करदात्याबद्दल ‘विश्वसनीय माहिती’ उपलब्ध असल्यास तपासणी होऊ  शकते.

प्रश्न: माझी आई ज्येष्ठ नागरिक आहे. तिचे वय ६७ वर्षे आहे. तिला बँकेतून ४,२५,००० रुपये इतके मुदत ठेवीवर व्याज मिळाले आणि बचत खात्यावर १४,५०० रुपये इतके व्याज आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये मिळाले. तिने कर वाचविण्यासाठी कोणतीही गुंतवणूक ३१ मार्च २०१७ पूर्वी केलेली नाही. तिला कर भरावा लागेल काय आणि किती?

 – एकनाथ शिंदे,  ईमेलद्वारे

उत्तर : आपल्या आईचे करपात्र उत्पन्न हे कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा म्हणजेच ३ लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे कर भरावा लागेल. करपात्र उत्पन्न व देय कर असे :

उत्पन्न                                         रुपये  

ठेवींवरील व्याज                              ४,२५,०००

बचत खात्यावरील व्याज                 १४,५००

एकूण उत्पन्न                                 ४,३९,५००

८० टीटीएप्रमाणे वजावट*                १०,०००

करपात्र उत्पन्न                              ४,२९,५००

(*कलम ८० टीटीएप्रमाणे बचत खात्यावरील व्याजावर रु. १०,००० पर्यंत वजावट मिळते.)

भरावा लागणारा कर :——————   

प्रथम ३ लाखांवर                               ०

बाकी १,२९,५००वर १०%                   १२,९५०

एकूण देय कर                                   १२,९५०

८७ अ प्रमाणे वजावट                         ५,०००

देय कर                                              ७,९५०

शैक्षणिक कर ३%                               २३९

एकूण देय कर                                     ८,१८९

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)

कर आणि त्या संबंधी आपलेही नियोजनाविषयक काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान करून घेण्यासाठी प्रश्न पाठवा : pravin3966@rediffmail.com

First Published on May 15, 2017 1:03 am

Web Title: senior citizens and income tax act