बाजाराच्या घसरगुंडीच्या समयी आपला संयम ढळणार नाही, भीतीने गाळण उडणार नाही, धीराने या घसरणीला सामोरे जाण्याची हिंमत असेल, तर नजीकचा काळ तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येणारा असेल. बाजाराच्या दृष्टीने सध्याचा हा असा एक अत्यंत रोचक कालावधी आहे.
जर तुम्ही मागील एक वर्षांतील शेअर बाजाराच्या कामगिरीवर नजर फिरवाल तर तुमच्या लक्षात येईल की बाजाराचे निर्देशांक पुन्हा फिरून त्याच पातळीवर येऊन ठेपल्याचे दिसून येईल. या एका वर्षांत निफ्टी निर्देशांक ९,००० च्या शिखराला गाठले. पुढे ७८०० च्या पातळीवर तो रोडावला आणि आता परत ८२००च्या आसपास, अशा आवर्तनातच त्याचे हेलकावे सुरू आहेत.
परंतु सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे काय आहे? या वर्षभरात तुमच्या भागभांडाराचे (पोर्टफोलियो) काय झाले हे निर्देशांकाच्या हेलकाव्यांपेक्षा निश्चितच महत्त्वाचे! जर निर्देशांक वाढले तरी तुमच्या भागभांडाराचे मूल्य वाढले नाही अथवा बाजार गडगडला पण तुमच्या भागभांडाराची मूल्य घसरण त्याहून मोठी असेल, तर मात्र पंचाईत आहे. ही तुमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब बनायला हवी.
बाजार गडगडण्याची कारणे काय ते आधी बघू. चीनमधील अर्थमंदी, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत अपेक्षेइतका सुधारणा न दिसणे, संसदेतील गदारोळ आणि त्यातून रखडलेल्या सरकारच्या योजना आणि आर्थिक सुधारणा वगैरे वगैरे. प्रत्येक वेळी बाजारातील घसरण आणि उसळीमागे हेच घटक आलटून-पालटून कारणीभूत ठरली आहेत व पुढेही ठरणार आहेत.
यापुढे बाजाराची दिशा काय असेल?
हा एक कळीचा प्रश्न आहे. भारताच्या भांडवली बाजाराच्या दृष्टीने सध्याचा हा एक अत्यंत रोचक कालावधी आहे. तांत्रिक अंगाने विश्लेषण करायला गेल्यास, बाजार त्याच्या दीर्घावधीच्या किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)च्या समीप येऊन ठेपला आहे. निफ्टी निर्देशांकाने ९,००० ची पातळी गाठली, तेव्हा तो दीर्घ मुदतीचा पी/ईच्या वर होता. २०-२२ पी/ईचा स्तर असणे म्हणजे बाजाराचा महागडा स्तर मानला जातो. या स्तरावर बाजारातील गुंतवणुकीचा ओघ वाटतो.
पण सध्याचा स्तराबाबत तांत्रिक विश्लेषकांचे असेही सांगणे आहे की, या पातळीवर मोठी जोखीम दिसून येत नाही. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्थाही गतिमानता पकडू शकेल या टप्प्यावर पोहोचली आहे. अर्थव्यवस्थेतील माफक सुधारही बाजारासाठी उत्साहदायी ठरेल. त्याचे प्रत्यंतर तुमच्या भागभांडारातील समभांगाच्या मूल्यवृद्धीत उमटण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
गुंतवणूकदारांनी या स्थितीत काय करावे?
शेअर बाजाराच्या इतिहासाचा ओझरता मागोवा घ्या. मागील पाच, १० अथवा १५ वर्षांत बाजारात प्रत्येक वर्षांत पाच-१० टक्क्य़ांचे उलटफेर सारखे होत आले आहेत. परंतु निर्देशांक वाढीचा क्रम दीर्घमुदतीत निरंतर सुरूच आहे. मग या तात्पुरत्या होणाऱ्या चढ-उतारांनी आपण हवालदिल का व्हावे? खरे तर आपली मोठय़ा कालावधीसाठी सोबत करू शकेल, असे आपल्या भागभांडाराला मजबूत स्वरूप देण्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला कालावधी नाही. जर आपण २०१४-२०१५ मधील अभूतपूर्व तेजीत सामील होता आले नसले तरी निराशेचे कारण नाही. किंबहुना काही बिघडले नाही असेच  समजावे. बाजारात अशा संधी कायम येतच असतात आणि नजीकचा काळ अशाच संधीची चाहूल देणारा आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा. एकगठ्ठा पैसा टाकण्याचे धाडस होत नसेल, तर प्रत्येक घसरणीला थोडे थोडे अथवा एसआयपी धाटणीची गुंतवणूक उपयुक्त ठरेल.
शेअर बाजारातील गुंतवणुकीचा उज्ज्वल काळ स्पष्टच आहे, पण मग सोने, स्थावर मालमत्ता, रोखे गुंतवणुकीचे काय? जर तुम्ही सवयीचे सोन्यातील गुंतवणूकदार आहात किंवा घर-जमीन मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू पाहात आहात, तर पुढील ३-५ नव्हे तर दहा वर्षे तरी यातून चांगल्या परताव्याची अपेक्षा फोल ठरेल. आधीच या पर्यायांमध्ये गेल्या काही वर्षांत छोटय़ा गुंतवणूकदारांचा मोठा पैसा लागला आहे आणि ती एक त्रासदायक समस्या बनू शकेल, अशा स्थितीवर आपण पोहोचलो आहोत. त्या गुंतवणुकीतून जितक्या लवकर शक्य होईल तितका व्यवहार्य (अल्पतम तोटा असलेला) मार्ग मिळावा हेच प्राप्त स्थितीत सर्वाच्याच भल्याचे ठरेल.
अनेक बोलघेवडय़ा विश्लेषकांच्या मते, मोठय़ा घसरणीचे बाजाराचे एक वळण नजीकच्या काळात दिसेल. निफ्टी निर्देशांक ७,२०० ची पातळी दाखवेल, असा अनेकांचा होरा आहे. बाजाराचा सध्याचा नरमाईचा कल पाहून बदललेली त्यांची ही भाषा आहे. हीच मंडळी निफ्टीने ९,००० ला गवसणी घातली तेव्हा १०,०००- १२,००० चे नवे शिखर निफ्टीसाठी फार दूर नाही, असा जोशपूर्ण गप्पा करीत होते.
पण बाजाराच्या निर्देशांकाचा स्तर सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा असण्याचे खरे तर कारणच नाही. कोणतीही गुंतवणूक केल्यावर तिचे मूल्य पहिल्या पाच-सात महिन्यांत पाच टक्के ते कमाल २० टक्क्य़ांपर्यंत घसरेल, असे गृहित धरूनच गुंतवणूक केली जावी. त्यामुळे बाजाराच्या घसरगुंडीच्या समयी आपला संयम ढळणार नाही, भीतीने गाळण उडणार नाही, धीराने या घसरणीला सामोरे जाण्याची हिंमत आपोआपच आपल्याला मिळेल. किंबहुना त्या घसरणीचा फायदा भागभांडाराच्या बरकतीसाठी करण्याचा धाडस अंगळवणी पडायला हवा. हे असे करून पाहा. काही काळ जाऊ द्या. तुमचा भागभांडार तुमच्यासाठी संपत्तीनिर्माता बनल्याचे तुमच्या लक्षात येईल.
(लेखक हे निर्मल बंग सिक्युरिटीज या गुंतवणूक पेढीचे सल्लागार आहेत)