सध्या सुरू असलेली तेजी ही तळ मारल्यानंतरची तेजी की क्षीण स्वरूपाची सुधारणा (रिलीफ रॅली) या प्रश्नाचं उत्तर सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकावरील ३४,५०० / १०,६००चा स्तर देणार, असे गेल्या लेखात स्पष्ट केले होते. गेल्या आठवडय़ात निर्देशांक ३४,५०० / १०,६०० चा स्तर ओलांडण्यास अपयशी ठरल्यामुळे ही सुधारणा क्षीण स्वरूपाची (रिलीफ रॅली) ठरली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

गुरुवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३४,०४६.९४
  • निफ्टी : १०,४५८.४०

गेल्या आठवडय़ात बुधवारी देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे तिमाहीत ७.२ टक्क्यांनी वाढले असे जाहीर केले गेले. यालाच पूरक असे वाहन उद्योगातील प्रमुख कंपन्यांनी फेब्रुवारीतील विक्रीचे भरीव आकडे सादर केले. बजाज ऑटोने तर विक्री वृद्धी दर ३१ टक्के नोंदवला, मारुती १५ टक्के, अशोक लेलँड २९ टक्के आणि ग्रामीण अर्थव्यवस्था – कृषी क्षेत्राशी निगडित एस्कॉर्ट्सने ट्रक्टरच्या विक्रीमध्ये ५० टक्क्य़ांची वाढ नोंदवली. या तेजीच्या सुखद बातम्या येत असताना निर्देशांक गुरुवारी सणसणीत वरची उसळी मारेल अशी अपेक्षा होती. पण कसले काय? निर्देशांक मात्र  ३४,००० / १०,४५० पातळ्यांवर घुटमळत होते. त्यामुळे या मंदीच्या गत्रेतून बाहेर पडण्याकरता निर्देशांकाला प्रथम ३४,५०० / १०,६०० आणि त्यानंतर ३५,३०० / १०,८०० चा स्तर ओलांडणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा निर्देशांकाकडून नीचांक मारला जाण्याचे – भय इथले संपत नाही अशी परिस्थिती असेल. तो निर्देशांकांचा नीचांक अनुक्रमे ३३,४८० / १०,२५० आणि त्यानंतर ३२,५०० / १०,०५० पर्यंत खाली घसरणारा असू शकेल.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे. सोन्याच्या भावाच्या बाबतीत रु. ३०,५०० ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ आहे. रु. ३०,५००च्या स्तराखाली सोने रु. ३०,२०० ते ३०,००० पर्यंत खाली घसरू शकते. सोन्याच्या बाबतीत आपण ‘तेजीच्या वातावरणातील मंदीची झुळूक अनुभवत आहोत. त्यामुळे सोन्याचा भाव जोपर्यंत रु. ३०,५०० च्या स्तरावर टिकत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव ३०,००० ते २९,८०० पर्यंत खाली घसरू शकतात. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग

हिमाद्री स्पेशालिटी केमिकल

  • (बीएसई कोड ५००१८४)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. १५७.५०

सध्या वैश्विक स्तरावरील प्रदूषणाची समस्या पाहता, प्रदूषणरहित दुचाकी, चारचाकी, ट्रक आदी वाहनाची निर्मिती ही काळाची गरज बनली आहे. या प्रदूषणरहित वाहनांसाठी विजेचा संच (बॅटरी) लिथेनियम आयन बॅटरीची गरज असते. हिमाद्रि केमिकल कोल टार पीचबरोबर या विजेच्या संचाची निर्मिती करते. तांत्रिक विश्लेषणाच्या नजरेतून समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. १४५ ते १८० आहे. रु. १८० च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. २०० व नंतर रु. २२५ असे असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट रु. २७५ ते रु. ३०० असेल. गुंतवणूक योग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. १२०चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.