18 February 2019

News Flash

माझा पोर्टफोलियो : मरगळीतच खरेदीची संधी

कुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती आहे.

पोर्टफोलियोचा त्रैमासिक आढावा

वर्ष २०१८ ची सुरुवात खरे तर उत्तम झाली होती. नवीन वर्षांच्या पहिल्या दोन आठवडय़ातच शेअर बाजार निर्देशांकाने ३४,००० च टप्पा गाठून नवीन उच्चांक स्थापित केला होता. मात्र त्या नंतर काही ना काही कारणांचे निमित्त होऊन बाजारात पडझड सुरू झाली आणि एक प्रकारचे मंदीचे वातावरण तयार झाले. पुस्तकी अर्थसंकल्प, दीर्घकालीन भांडवली नफा फेरअंमलबजावणी, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेतील वाढते व्याज दर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापार युद्ध आणि अर्थात पंजाब नॅशनल बँक घोटाळा या सर्वाचा विपरीत परंतु अपेक्षित परिणाम शेअर बाजारावर झालाच. अर्थात या सर्वच बाबींचे परिणाम दूरगामी असल्याने तसेच देशांतर्गतही बँकांची अनुत्पादित कर्जाची समस्या, वाढती वित्तीय तूट, वस्तू आणि सेवा कराचा कमी झालेला महसूल आणि वाढत्या बेरोजगारीची संख्या याचा नकारात्मक परिणाम बाजारावर झालेला दिसून येतो.

कुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती आहे. अर्थात ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेली शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी गांगरून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण मंदीतच खरेदीची सुसंधी असते. आपण २०१२-१३ च्या पोर्टफोलियोचा आढावा घेतला तर हे सहज लक्षात येईल. त्यावेळी ज्या वाचक गुंतवणूकदारांनी सुचविलेल्या उत्तम कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी केली यांनी बक्कळ नफा कमावला. आता शेअर बाजारातील ही मरगळ किती काळ टिकते ते बघायचे आणि या संधीचे सोने करायचे. मंदीत खरेदी करताना मात्र आपण खरेदी करत असलेला शेअर अजून किती खाली जाईल याची कल्पना नसल्याने अशा शेअर्सची टप्प्या टप्प्याने खरेदी करणे हिताचे ठरते. तसेच याच काळात लार्ज कॅप तसेच डिफेन्सिव्ह शेअर्स तुम्हाला तारू शकतात. त्यामुळे फार्मा, एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सुरक्षित खरेदी ठरू शकते.

पहिल्या तिमाहीत ‘माझा पोर्टफोलियोला’ काही नुकसान झाले नसले तरी फायदाही झालेला नाही. यंदाचे म्हणजे २०१८-१९ चे आर्थिक वर्ष हे गेल्या काही वर्षांप्रमाणे तेजीचे नसेल असे भाकीत काही गुंतवणूकतज्ज्ञांनी केले आहे. हे भाकीत खरे ठरो वा खोटे वर सांगितल्याप्रमाणे गुंतवणूकदारांनी जर उत्तम कंपन्यांतील गुंतवणूक चालू ठेवली तर ते कायम फायद्यात राहतील हे नक्की. नवीन आर्थिक वर्षांच्या शुभेच्छा!

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on April 2, 2018 12:34 am

Web Title: share market sensex portfolio ajay walimbe