निमेश शहा, ( व्यवस्थापकीय संचालक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी) 

भारतीय भांडवली बाजार अशा टप्प्यावर आहे जेथे निरंतर गुंतवणूकही करणे जिकिरीचे आणि गुंतवणूकविषयक सावधगिरी बाळगायची म्हटले तरी अवघड. मर्यादित षटकांच्या सामन्यांतील पॉवर प्ले उलटून गेल्यानंतर मधली काही षटके चालणाऱ्या खेळासारखे हे आहे. तेथे टिकाव धरून सावकाशीने का होईना, धावा उभाराव्या लागतात. एकंदरीत बाजार सध्या रक्षात्मक कक्षात आहे. अशा स्थितीत सावध पवित्रा घेऊन, मूल्यांकन कमी असलेल्या क्षेत्राच्या चोखंदळ खरेदीवर गुंतवणूकदारांचा भर असायला हवा.

मधली षटके म्हणजे आता खरा कसोटीचा क्षण आहे, हे लक्षात घ्यावे. याचे कारण हे की, शेअरचे मूल्यांकन खूप उच्च पातळीवर पोहोचले आहे. किंमत उत्पन्न (पीई) गुणोत्तर २० च्या पटीत आहे, जे सरासरी १७ पटीपेक्षा जास्त आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपबाबतीत हे गुणोत्तर तर ४० पटीच्या पातळीवर पोहोचलेले दिसले. तरीही काही अंगभूत गुणवत्ता असलेले शेअर्स आजही आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध म्हणजे महागडे नाहीत. जर आता महागडे शेअर्स जरी ते पायाभूत सशक्त असले तरी खरीदले तर भविष्यात त्यापासून चांगला परताव्याची शक्यता अल्प राहते किंवा अवघड असते. बाजार बुडबुडय़ाच्या स्थितीत नसला आणि कंपन्यांच्या उपार्जनांत सुधारही सुरू आहे. कारण एकंदर मागणी आणि कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेत आनुषंगिक वाढ अनुभवास येत आहे. पायाभूत सोयीसुविधा विकसनातील गुंतवणुकाही वाढत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भांडवली बाजारात गुंतवणुकीचे स्वारस्य यापुढेही कायम राहणार आहे. परंतु जेथे मिळकतीत सुस्पष्ट स्वरूपात दृश्यमान आहे अशा उद्योग क्षेत्रांकडे वळणे क्रमप्राप्त ठरेल.

येणाऱ्या तिमाहीत बाजारातून परतावा सामान्यच राहील, हे समजून घेतले पाहिजे. सावधगिरीचे सध्याचे वातावरण आहे. अशा स्थितीत मूल्यांकन कमी असलेल्या आणि अल्पतम महाग अशा उद्योग क्षेत्रात संतुलित स्वरूपाच्या गुंतवणुकीचा कल ठेवायला हवा. हा गुंतवणूक दृष्टिकोन दीर्घावधीत लाभदायी निश्चितच ठरेल.

विद्यमान बाजारात गुंतवणूकदार तेल आणि वायू, युटिलिटी, इन्फ्रा, निवडक वित्तीय कंपन्या यांना विचारात घेऊ  शकतो. विशेषकरून या क्षेत्रातील काही लार्ज कॅप कंपन्यांमध्ये मूल्यांकन आजही वाजवी पातळीवर आहे. या तिमाहीपासून तंत्रज्ञान आणि औषधी कंपन्यांच्या मूल्यांकनात सुधार दिसून येत आहे. सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या शक्यता चाचपल्या पाहिजेत.

खनिज तेलाच्या किमती पुन्हा प्रतिपिंप ७५ डॉलरच्या टप्प्यावर गेल्या आहेत. अशा स्थितीत चालू खात्यावरील तुटीत वाढ संभवते. खनिज तेलाच्या किमती पिंपामागे एका डॉलरने वाढल्या तरी आपल्या आयात खर्चात ७,५०० कोटी रुपयांची भर पडते. याचे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अनेकविध दुष्परिणाम आहेत. देशांतर्गत व्याजाच्या दरावर त्याचे नकारात्मक परिणाम होतील, ज्याची सुरुवात रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ करून केली आहेच. १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा परतावा दर डिसेंबरमध्ये ७.८१ टक्कय़ांवर गेलेला दिसून आले आहे. यातून स्थिर उत्पन्न पर्यायातील गुंतवणुका अनाकर्षक बनत चालल्या आहेत.

भारत अशा काही निवडक देशांपैकी एक आहे जेथे कंपन्यांच्या मिळकतीने आजही अपेक्षित गती पकडलेली नाही. लवकर अथवा विलंबाने का होईना, पण मिळकतीने तेजीच्या आवर्तनात प्रवेश केल्याचे निश्चितच दिसून येईल. याचा बाजारावर सकारात्मक परिणामही पाहायला मिळेल. तोवर सावधगिरी मात्र आवश्यक ठरेल. देशांतर्गत अथवा जागतिक स्तरावरील कोणत्याही घडामोडींचे बाजारात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटणे अशा स्थितीत शक्य आहेत. त्यामुळे शेअर्समधून मध्यम अवधीत दोन वर्षांपूर्वी दिसला तशा चांगल्या परताव्याची सध्या अपेक्षा करता येणार नाही. दीर्घावधीचा दृष्टिकोन असणाऱ्यांना एसआयपी, डेट अक्रुअल फंड आणि बॅलन्स फंडाचा मार्ग अनुसरावा आणि हेच सध्या सावधगिरीचे लक्षण ठरेल.