आशीष अरविंद ठाकूर

गेल्या सहा महिन्यांतील तेजी-मंदी चक्राचा आढावा घेता प्रत्येक महत्त्वाच्या वळणिबदूवर गुंतवणूकदारांना सावध केले होते याचा प्रत्यय त्या त्या वेळी लिहिलेल्या लेखांच्या शीर्षकांवरून जरी नजर फिरवली तरी येईल. २९ जानेवारीच्या ऐतिहासिक उच्चांकाची जाणीव १५ जानेवारीच्या लेखातील शीर्षकावरून येईल ते शीर्षक होतं- ‘निर्देशांकाची उद्दिष्टपूर्ती आणि त्या नंतरचे जोखीम-नफा गुणोत्तर’ या लेखात आपण उच्चांकाच्या समीप आहोत हे पटविण्यासाठी चतुरस्र कवयित्री शांताताई शेळके यांच्या वाक्याचा आधार घेतलेला – ‘डोक्यात असतं ते काव्य आणि कागदावर उतरते ती कलाकुसर.’ त्याप्रमाणे माझ्या डोक्यातील निफ्टीवरील उच्चांकाने १०,८०० आणि ११,०००चे टप्पे हळूहळू प्रत्यक्षात आले आहेत तर कागदावरील कलाकुसर म्हणजे गुंतवणूकदारांचा कागदोपत्री नफा प्रत्यक्षात येण्यासाठी सध्या चालू असलेल्या तेजीत गुंतवणूकदारांनी आपले नफ्यातील समभाग विकून फायदा पदरात पाडून घ्यावा, असे सुचविले. बरोबर २९ जानेवारीला निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३६,४४३ आणि निफ्टीवर ११,१७१चा उच्चांक नोंदविला. त्यानंतर जो घातक उतार बाजारात आला त्याचे वर्णन ‘भय इथले संपत नाही’ असे ५ मार्चच्या लेखाचे शीर्षक होते. लवकरच निर्देशांक तळ गाठेल याचे सूतोवाच केले होते. त्याप्रमाणे २३ मार्चला निर्देशांकानी ३२,४८३/ ९,९५१चा नीचांक मारून बाजारात सुधारणा सुरू झाली.

पुढे १५ मे रोजी पुन्हा उच्चांक आला. ३० एप्रिलच्या लेखात ‘गॅन कालमापन पद्धती’चा आधार घेत उच्चांक काय असेल? व तारीखवार कधी गाठला जाईल याची कल्पना दिली होती. त्या लेखातील वाक्य होते- ‘मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात निर्देशांकाच्या तेजीच्या धारणेला कलाटणी मिळू शकते आणि संभाव्य उच्चांक हा ३३,३५० ते ३६,००० / निफ्टीवर १०,८०० ते ११,०००च्या दरम्यान असेल. बरोबर १५ मेला निर्देशांकांनी  ३५,९९३/ १०,९२९चा उच्चांक नोंदविला. हा स्तर पार करण्यास / तेजीच्या मार्गातील फार मोठा अडथळा असेल. या स्तरावर अत्यल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना नफावसुली करायचे सुचविले गेले. वरच्या किमतीत समभाग घेण्याच्या मोहात गुंतवणूकदारांना पाडून, बाजार कोसळल्यावर हवालदिल होण्यापेक्षा त्या मोहाच्या क्षणी गुंतवणूकदारांना सावध करणे जरुरीचे होते. या हवालदिलपणाचे प्रत्यंतर गेल्या आठवडय़ात गुरुवारी झालेल्या बाजार कोसळण्यावर व विशेषत: मिड कॅपमधील रक्तपातावरून आला. आता लक्षणीय समभाग खरेदीच्या दृष्टीने प्रत्येक लेखात नमूद केलेली ३४,५०० / १०,६००चा स्तर दृष्टिपथात येत आहे.

प्रत्येक लेखात सूचित केलेले लक्षणीय समभाग हे एकदम खरेदी न करता गुंतवणूकयोग्य रकमेचे २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून शाश्वत तेजीच्या स्तरावर खरेदी केल्यास इच्छित उद्दिष्ट लवकर साध्य होते. त्यासाठी खालील तक्त्याचा आधार घेऊया.

ashishthakur1966 @gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.