सुंदरम फ्लेक्झिबल फंड शॉर्ट टर्म प्लान
साकल्याने विचार केल्यास, येत्या काळात रेपो दरात आणखी पाव टक्के कपात संभवते. अशा स्थितीसाठी आदर्श असलेला, बँकांच्या मुदत ठेवींप्रमाणेच सुरक्षितता, पण म्युच्युअल फंडांची कार्यक्षमता व कर लाभ देणाऱ्या या फंडाची ही ओळख..
मागील मंगळवारी ७ जून रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. यानिमित्ताने आगामी दोन ते सहा महिन्यांच्या काळात अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबाबत भाष्य करताना सेवा करात झालेली वाढ, सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर नोकरदारांच्या हातात पडलेल्या थकबाकीमुळे मागणी वाढणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वधारणे इत्यादी कारणांनी महागाई वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला. महागाईच्या दराबाबतचा आधीचा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेने जरी बदलला नसला, तरी पतधोरणाचा सूर महागाई दराबाबत धोक्याचा इशारा देणारा आहे. याव्यतिरिक्त १४-१५ जून रोजी ‘फेड’ची बैठक होणार असून व्याजदर वाढविण्यावर निर्णय या बैठकीत घेतला जाणे अपेक्षित आहे. तर २३ जूनला युरोपीय समुदायातून बाहेर पडावे किंवा कसे यावर ब्रिटनमध्ये सार्वमत घेतले जाणार आहे. या जागतिक घडामोडींचा परिणाम जूनच्या उत्तरार्धात बाजारावर दिसणे अपेक्षित आहे. चालू महिन्यात जरी निफ्टी ३.९% वधारला असला तरी वर उल्लेख केलेल्या दोन घटनांच्या प्रतिकूलतेने पुढे मोठी घसरण संभवते.
रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण महागाईचा दर जानेवारी २०१७ पर्यंत ५% राखण्याला प्राधान्य देणारे आहे. अर्थव्यवस्थेतील व्याजाचे दर महागाईच्या दराहून १-१.५% या पातळीवर राखण्याचे संकेत गव्हर्नर राजन यांनी वेळोवेळी दिले आहेत. जानेवारी २०१५ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणाची दिशा बदलून, ते महागाई केंद्रित राखण्यासोबत अर्थव्यवस्थेला गती देणारे धोरण राबविले आहे. परिणामी १७ महिन्यांच्या कालखंडानंतर उणे वाढ राखणारा ठोक किमतींवर आधारित महागाईचा दर (डब्ल्यूपीआय) पहिल्यांदाच सकारात्मक दिशेला वळला.
घटत्या व्याजदराची सर्वाधिक झळ निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांत गुंतवणूक करणाऱ्या अर्थात ‘व्याजावर जगणाऱ्या’ गुंतवणूकदारांना बसते. महागाईचा दर जरी कमी असला तरी आरोग्यनिगा क्षेत्रात महागाईचा दर सर्वोच्च आहे. एका बाजूला कमी होणारे व्याजाचे दर व दुसऱ्या बाजूला वाढत जाणारा आरोग्यावरील खर्च अशा कात्रीत सापडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांच्या मुदत ठेवींची सुरक्षितता व म्युच्युअल फंडांची कर कार्यक्षमता प्रदान करणारा आजचा फंड आदर्श गुंतवणूक ठरावा.
हा फंड उच्च दर्जाची पत राखणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रांतील वित्तीय संस्था व बँकांच्या ‘सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट’ (सीडी) रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. हा फंड प्रामुख्याने रेपो दर व बँकांच्या एक वर्ष मुदतीच्या सीडीच्या परताव्याचा दर यांच्यातील फरक लक्षात घेऊन गुंतवणूक करणारा आहे. सध्या हा फरक ०.८५% असल्याने या फंडाचा परताव्याचा दर एका वर्षांच्या मुदत ठेवींहून अर्धा टक्के अधिक व तीन वर्षे गुंतवणूक केल्यास भांडवली वृद्धीवर कर द्यवा लागणार नाही. फंडाने गुंतवणूक केलेल्या सीडीची मुदतपूर्ती मार्च २०१७ मध्ये होणार आहे. सर्वसाधारणपणे सीडींची मार्चअखेरीस मुदतपूर्ती झाल्याने फंडाच्या गुंतवणुकीत मोठी रोख रक्कम जमा होते व एप्रिलपासून पुन्हा फंड नवीन गुंतवणूक करतो. फंडाने गुंतवणूक केलेल्या साधनांची सरासरी मुदतपूर्ती १० महिने आहे. फंडाच्या गुंतवणुकांच्या परताव्याचा दर ७.३८% आहे. या फंडाने उच्च पत असलेल्या बँकांच्या सीडीमध्ये गुंतवणूक केलेली असल्याने परताव्याचा दर बँक मुदत ठेवींपेक्षा किंचित अधिक असतो. शिवाय या फंडातील तीन वर्षे व त्याहून अधिक कालावधीसाठी केलेली गुंतवणूक ही बँकांच्या ठेवींपेक्षा कर कार्यक्षम असते.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पत धोरणाची दिशा पुरेशी रोकडसुलभता राखण्यावर आहे, जेणे करून कर्जाच्या वाढीव मागणीस बँकांचे बळ अपुरे पडणार नाही. रोकडसुलभता व्याजदरापेक्षा (ओएमओ) खुल्या बाजारातून रोखे खरेदी करण्यावर दिसून येते. ज्या वेळेला अर्थव्यवस्थेत अतिरिक्त रोकडसुलभता असते तेव्हा बँका अल्प मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करतात. व्याजाचे दर कमी होतात तेव्हा किंवा जेव्हा अतिरिक्त रोकड सुलभतेमुळे रोख्यांची मागणी वाढते तेव्हा रोख्यांच्या किमती वधारत असल्याने गुंतवणूकदारांना भांडवली नफ्याचा लाभ होतो. ७ जूनच्या पतधोरणात व्याजदरात कपात नसली तरी समाधानकारक पाऊस, वर उल्लेख केलेल्या दोन घटनांबाबत स्पष्टता व कच्च्या तेलाच्या भावाची वाटचाल यावर पुढील दर कपातीचा निर्णय होईल. तसेच एप्रिल महिन्यात जाहीर झालेल्या पतधोरणात दीड लाख कोटींची अतिरिक्त रोकड सुलभता रिझव्‍‌र्ह बँक निर्माण करणार आहे. साकल्याने विचार केल्यास रोकड सुलभतेच्या जोडीने ३१ मार्च २०१७ पर्यंत रेपो दरात पाव टक्के कपात संभवते, असा कयास अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या कारणामुळे मुदत ठेवींची सुरक्षितता व म्युच्युअल फंडांची कार्यक्षमता असलेल्या या फंडाचा विचार बँक मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांनी करावा या हेतूने या फंडाची ओळख वाचकांना करून दिली.
arth02

arth01
वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com