18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

साकारू अर्थ नियोजन : गुंतवणूक हवी नियमित, शिस्तबद्ध!

नियमित गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय म्हणजे - म्युच्युअल फंड.

दीपाली चांडक | Updated: June 19, 2017 12:35 AM

सध्या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या वाटतात. अर्थसाक्षरतादेखील वाढते आहे. गुंतवणूक सल्लागाराला योग्य प्रश्न विचारून स्वत:च्या शंकांचे निरसन करून घेऊन मगच गुंतवणूक करावी. सुज्ञतेचा हाच मार्ग आहे. अनेक गुंतवणूकदाराप्रमाणे रवींद्रला पडलेला प्रश्न अगदी वास्तविक होता. रवींद्रने विचारले की, एकरकमी गुंतवणूक करणे योग्य असते की थोडीथोडकी पण नियमित गुंतवणूक करणे चांगले? कोणता पर्याय योग्य? खरे तर, या प्रश्नांचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे. जसे गुंतवणुकीचे उद्दिष्ट, कालावधी, जोखीम घेण्याची क्षमता, जबाबदाऱ्या, वय इ. एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर ती रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशा गुंतवणुकीत जोखीम जास्त. चांगला व अपेक्षेप्रमाणे फायदा झाला तर मोहाला बळी न पडता रक्कम काढून घ्यावी. परंतु नियमित गुंतवणूक करणे हे सर्वसामान्यपणे प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी योग्य असते. नियमित गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय म्हणजे – म्युच्युअल फंड.

त्यापुढची रवींद्रची शंका एका सुज्ञ गुंतवणूकदाराला शोभणारी होती आणि ती म्हणजे गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? या प्रश्नाची एक ना अनेक रास्त कारणे आहेत. पण त्या आधी म्युच्युअल फंडाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, अनेक लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांच्याकडे रक्कम असली तरी त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते. म्हणून समान उद्दिष्ट असणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकत्र केली जाते आणि या बदल्यात गुंतवणूकदाराला युनिट्स अदा केली जातात. (गुंतवणूक केलेले रुपये भागिले  त्या दिवशीचे गुंतवणूक मूल्य (एनएव्ही) = गुंतवणूकदाराला अदा केलेली युनिट्स). म्युच्युअल फंडांचा निधी व्यवस्थापक निर्धारित उद्दिष्टाला अनुसरून शेअर्स, डिबेंचर्स, इ वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. त्याला ‘कॉर्पस’ असेही म्हणतात. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणुकीचे मूल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मूल्य (एनएव्ही) जाहीर केले जाते. अशा प्रकारे म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला तुलनेने कमी खर्चात, व्यावसायिक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने, तज्ज्ञ व्यवस्थापन करीत, गुंतवणुकीची संधी उपलब्ध होते.

खालील कारणे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडाला निवडण्यासाठी पूरक ठरतात जसे –

 • व्यावसायिक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन : एकूण गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. त्याला लागणारे तज्ज्ञ साहाय्यक आणि इतर गोष्टींची तरतूद केली जाते. एकूण गुंतवणूक ही अशा तज्ज्ञामार्फत व्यवस्थापित केली जाते. बाजारातील माहिती गोळा करणे, त्यावर अभ्यास करणे, भविष्यातील जोखीम ओळखणे आणि जोखमीचे निवारण करण्यासाठी लागणारी उपाययोजना करणे, निधी व्यवस्थापक आणि त्याची साहाय्यक यंत्रणा करीत असते.
 • कमी रकमेत सुरुवात : शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुलनेने बऱ्यापैकी निधी असावा लागतो, परंतु म्युच्युअल फंडामध्ये अगदी ५,००० रुपये गुंतवून एकाच वेळेस विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक विभागण्याचा लाभ तुलनात्मकरीत्या कमी जोखीम घेऊन शक्य होते.
 • तुलनात्मकरीत्या कमी जोखीम : या पर्यायामध्ये गुंतवणूक ही तज्ज्ञांमार्फत केली जात असल्याने इतर पर्यायांच्या तुलनेत जोखीम कमी असते. कारण म्युच्युअल फंडांमध्ये प्रत्येक क्षेत्राचा अभ्यासासाठी तज्ज्ञ उपलब्ध असतो. हे तज्ज्ञ गुंतवणुकीतील जोखीम हाताळण्याचे काम करतात.
 • तरलता : म्युच्युअल फंडामध्ये काही विशिष्ट योजना आहेत ज्यात गुंतवणूक केली असता आपणास गरजेनुसार रुपये भरता अथवा गरज पडेल तेव्हा काढता येतात.
 • पारदर्शकता : सेबी या नियामक यंत्रणेमार्फत म्युच्युअल फंडाचे नियमन केले जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारास प्रतिबंध असतो. म्युच्युअल फंडास, त्यांनी गुंतवणूक करण्यास निवडलेले विविध पर्याय वेळोवेळी प्रकाशित करणे बंधनकारक असते. त्यामुळे व्यवहार पारदर्शक असल्याची खात्री देता येते.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे असले तरी भारतात सेबी नोंदणीकृत ४४ म्युच्युअल फंड घराणी असून या सर्व फंड घराण्याच्या एकूण २००० हून अधिक फंड योजना आहेत. म्हणून या फंडातून आपले वित्तीय उद्दिष्ट साध्य करेल, अशी योजना शोधणे हे अत्यंत कठीण काम आहे. खालील काही मुद्दय़ांच्या अभ्यासामुळे हे काम सोपे होण्यास मदत होते.

 • गुंतवणुकीचे उद्दिष्ट : सर्वसाधारणपणे गुंतवणूकदाराने विशेष ध्येय समोर ठेवून, उद्दिष्ट  गाठावयास असलेला कालावधी, नियमित होऊ  शकणारी बचत याचा एकत्रित विचार करत, म्युच्युअल फंड योजना निवडावी. उदा : एखादे वित्तीय उद्दिष्ट जितके दूरचे तितकी जोखीम क्षमता अधिक – म्हणून एक ते दोन वर्षांसाठी शॉर्ट टर्म फंड, तर दीर्घ मुदतीच्या वित्तीय उद्दिष्टासाठी लार्ज कॅप इक्विटी फंडाच्या जोडीला मिड कॅप, स्मॉल कॅप फंडाची निवड करणे योग्य ठरते.
 • आर्थिक व्यक्तिमत्त्व : कोणतीही गुंतवणूक जितका अधिक परतावा देणारी तितकी ती जोखमीची असते, परंतु गुंतवणुकीतील जोखीम आपल्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाला साजेशी असावी. यासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेची चाचणी करणे गरजेचे असते. अनेकदा परताव्याच्या दराची अपेक्षा व जोखीम यांचा मेळ जमत नाही, परताव्याची अपेक्षा जास्त असते; परंतु जोखीम पेलायला साजेसे आर्थिक व्यक्तिमत्त्व, कुवत तसेच भावनिक ताकद नसते.
 • फंड घराणे : फंडाची निवड करताना फंड घराण्याचासुद्धा विचार करणे अत्यंत आवश्यक असते. त्या फंड घराण्याचे किती फंड आहेत, त्या फंडांच्या परताव्याची कामगिरी कशी राहिली आहे, फंड घराण्याचे कुठले फंड चांगला परतावा देतात, फंड विक्रेते नेमके याच फंडाची गुंतवणूकदारांना शिफारस करतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
 • फंडाची कामगिरी : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा अंतिम उद्देश निश्चित उत्पन्न मिळविणे हा असतो. गुंतवणूक कालावधीच्या दरम्यान ही गुंतवणूक बाजारातील चढ- उतारांना सामोरी जात असते. फंडाच्या मूल्यातील चढ-उतार संदर्भ निर्देशांकाच्या चढ-उतारांच्या तुलनेत किती कमी-अधिक आहेत हे अभ्यासणे महत्त्वाचे आहे. परताव्याच्या तुलनेत एखाद्या विशिष्ट काळात, इतर फंडाच्या यादीत एखादा फंड अग्रक्रमी असेल व एखादा फंड सातत्याने चांगला परतावा देत असेल तर नामांकित अग्रगण्य फंडापेक्षा सातत्य राखणाऱ्या फंडाची निवड करणे योग्य ठरते.
 • फंड शुल्क रचना व खर्च : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असते. व्यवस्थापन खर्च हे प्रत्येक गुंतवणुकीगणिक आकारले जाते. त्यामुळे थोडा अधिक शुल्क आकारणारा फंड दीर्घ कालावधीमध्ये फंडाच्या एकूण परताव्यावर परिणाम करू शकतो, तसेच गुंतवणूक करण्यापूर्वी निर्गमन शुल्क हा एक महत्त्वाचा घटक लक्षात घेणे आवश्यक आहे.
 • निधी व्यवस्थापकाबद्दल माहिती : फंडाचा परताव्याचा दर अन्य फंडाच्या तुलनेत सरासरीहून अधिक राखण्यात निधी व्यवस्थापकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. केवळ ज्या फंडात गुंतवणूक करायची त्याबद्दलच नव्हे, तर त्या निधी व्यवस्थापकाकडे व्यवस्थापनासाठी असलेल्या अन्य फंडाच्या परताव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणे योग्य ठरेल.

गुंतवणुकीस सुरुवात करणे सोपे असते; परंतु बाजाराच्या चढ-उतारानुसार कमी-अधिक होणाऱ्या गुंतवणुकीकडे, अधिक परताव्याचा मोह व बाजार वर-खाली झाल्याची अनावश्यक भीती टाळणे गरजेचे आहे. म्हणूनच अव्वल परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा, सातत्य राखणारा व आपल्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाला साजेसा नियमित शिस्तबद्ध गुंतवणुकीचा पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे आणि योग्य ठरते. नियमित केलेली गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’ ही एक गुंतवणुकीची शिस्त असून त्याद्वारे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करू शकणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांमधून लहान-लहान रकमा गुंतवून, भविष्यासाठी तरतूद करता येते. एसआयपीद्वारे गुंतवणूक शिस्तबद्ध रीतीने होत राहील याची खात्री होते आणि गुंतवणूकदाराला आर्थिक उद्दिष्टे गाठणे शक्य बनते.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी लक्षात घेण्याच्या काही बाबी –

 • या पर्यायाचे परतावे अनिश्चित असतात.
 • शेअर बाजाराचे चढ-उताराची जोखीम या पर्यायालाही असते.
 • गुंतवणूकदाराला स्वत: नियंत्रण ठेवता येत नाही.
 • योग्य परतावा मिळविण्यासाठी, दीर्घकाळ थांबण्याची तयारी लागते.
 • मागील कामगिरीच्या आधारानेच गुंतवणूक करता येते.

arthasanvad@gmail.com

First Published on June 19, 2017 12:35 am

Web Title: systematic investment finance planning