रॅलीज इंडिया लिमिटेड     (बीएसई कोड – ५००३५५ )

रॅलीज इंडिया ही टाटा समूहाच्या टाटा केमिकल्स या कंपनीची उपकंपनी. कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलापैकी ५०.०९ भांडवल टाटा केमिकल्सचे आहे. भारतातील सर्वात जुनी आणि दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असलेल्या रॅलीज इंडियाचा बाजारातील हिस्सा सुमारे १३ टक्के आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी साधारण १/३ उलाढाल ही निर्यातीतून होते. कीटकनाशक, तण नाशक आणि बुरशीचा नाश करणारी अशी विविध प्रकारची नाशकांचे ही कंपनी उत्पादन करते. आपल्या विविध उत्पादंनासाठी कंपनीने दोव अ‍ॅग्रो सायन्स, सिंजेंटा तसेच नीहोन नोहयाकू अशा नामांकित कंपन्यांकडून आधुनिक तंत्रज्ञान घेऊन विकसित केले आहे. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत ११ टक्के वाढ साध्य केली असली तरीही निकाल फारसे समाधानकारक नाहीत. या कालावधीत कंपनीने ३५७.२५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३.०३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ३ टक्क्यांनी कमी आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये दक्षिणेत झालेला जोरदार पाऊस आणि चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ याचा विपरीत परिणाम कंपनीच्या कामकाजावर झालेला दिसतो. परंतु देशांतर्गत कच्च्या मालाच्या किमती शेवटच्या तिमाहीत घसरल्याने लवकरच चीनदेखील आपल्या किमतीत घट करेल अशी आशा आहे. तसेच जानेवारी २०१८ पासून कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागतील. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्ष कंपनीसाठी उत्तम जाईल असे आशादायी चित्र आता निर्माण झाले आहे. जवळपास कुठलेच कर्ज नसलेल्या आणि केवळ ०.५ बीटा असलेली रॅलीज इंडिया म्हणूनच एक सुरक्षित गुंतवणूक वाटते.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.