02 March 2021

News Flash

कर-बोध- व्यावसायिकांसाठी कर मात्रा?

मराठी माणूस धंदा-व्यवसायात जास्त पडत नाही असा समज आता बदलत चालला आहे.

मराठी माणूस धंदा-व्यवसायात जास्त पडत नाही असा समज आता बदलत चालला आहे. आता मराठी माणसाची पावलेसुद्धा धंदा-व्यवसायाकडे वळत आहेत. उच्च शिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात, वकिली क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, सल्लागार इत्यादी व्यवसाय करणारे अनेक आहेत. अशा व्यावसायिकांना अनेक करांचे अनुपालन करावे लागते. जसे, प्राप्तिकर, सेवा कर, व्यवसाय कर इत्यादी. प्राप्तिकर कायद्यामध्ये व्यावसायिकांसाठी वेगळ्या तरतुदी आहेत. अशा तरतुदींचे पालन न केल्यास व्याज आणि दंडाला सामोरे जावे लागते. घरभाडे उत्पन्न, भांडवली नफा, इतर उत्पन्न यावरील उत्पन्नाच्या आणि कराच्या तरतुदी आणि कलम ८० प्रमाणे मिळणाऱ्या वजावटी या सर्व व्यक्तींना समान आहेत.
धंदा आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्राप्तिकर कायद्यामध्ये असलेल्या काही विशेष तरतुदी आहेत. या लेखात व्यावसायिकांसाठी (डॉक्टर, वकील, सल्लागार, वगरे) असणाऱ्या तरतुदींचा आढावा घेतला आहे तो खालीलप्रमाणे:

व्यवसाय म्हणजे काय?
धंदा आणि व्यवसाय यासाठी प्राप्तिकर कायद्यातील विशेष तरतुदी जाणून घेण्याआधी प्रथम धंदा आणि व्यवसाय यातील फरक जाणून घेतला पाहिजे. धंदा म्हणजे व्यापार, वाणिज्य, उत्पादन. व्यवसाय म्हणजे ज्यात बौद्धिक, कौशल्य वापरले जाते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमध्ये वकील, वैद्य, अभियांत्रिक, स्थापत्य, रचनाकार, सनदी लेखाकार, तांत्रिक सल्लगार, अंतर्गत सजावट, चित्रपट कलाकार (यामध्ये छायाचित्रकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, संकलक, लेखक इत्यादी) आणि इतर व्यावसायिकांचा समावेश होतो.

लेखे (अकाऊंटस) कोणी ठेवावे:
लेखे ठेवण्याची तरतूद धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. याव्यतिरिक्त उत्पन्न असणाऱ्यांना लेखे ठेवणे बंधनकारक नसते. व्यावसायिकांची एकूण जमा (उलाढाल) मागील तीन वर्षांपकी कोणत्याही एका वर्षांत १५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे गरजेचे आहे. जर नवीन व्यवसाय असेल तर या वर्षीची उलाढाल वरील रकमेपेक्षा जास्त होणार असेल तर लेखे ठेवणे गरजेचे आहे.

लेखे कोणते ठेवावे:
यामध्ये कॅश बुक, जर्नल (जर व्यापारी पद्धतीने लेखे असतील तर), लेजर, बिलाच्या किंवा रिसिट्सच्या नक्कल प्रती (कार्बन कॉपी), खर्चाच्या मूळ पावत्या आणि बिले यांचा समावेश आहे.
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांसाठी औषधांचा साठा याबाबतही ‘फॉर्म ३सी’प्रमाणे माहिती ठेवणे गरजेचे आहे. यात दिनांक, अनुक्रमांक, रोग्याचे नाव, रुग्णाला दिलेली सेवा (सल्ला, शस्त्रक्रिया, इंजेक्शन, इत्यादी), मिळालेली फी आणि फी मिळाल्याची तारीख ही माहिती ठेवावी लागते. हे लेखे जर ठेवले नाही, तर २५,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

लेखा पद्धती :
लेखा पद्धतीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक रोख पद्धत. यामध्ये उत्पन्न हे पसे मिळाल्यानंतरच दाखवतात आणि खर्चाची वजावटसुद्धा पसे दिल्यानंतरच घेता येते. उदा. मार्च २०१५ (आíथक वर्ष २०१४-१५) मध्ये केलेल्या कामाचे पसे एप्रिल २०१५ (आíथक वर्ष २०१५-१६) मध्ये मिळाले तर ते उत्पन्न आíथक वर्ष २०१५-१६ मध्ये दाखविणे. दुसरी पद्धत म्हणजे व्यापारी पद्धत. यामध्ये उत्पन्न हे पसे मिळाले किंवा खर्च हा खर्चाचे पसे देण्यावर अवलंबून नसते. या पद्धतीनुसार, वरील उदाहरणानुसार, जरी पसे आíथक वर्ष २०१५-१६ मध्ये मिळाले असले तरी उत्पन्न हे आíथक वर्ष २०१४-१५ मध्येच दाखवावे लागते. एकदा अवलंबलेली लेखा पद्धती न बदलणे हितावह आहे; परंतु काही कारणाने जर लेखा पद्धती बदलली तर या बदलामुळे नफ्यावर झालेला फरक सूचित करावा लागतो. तसेच प्राप्तिकर कमी करण्यासाठी ही पद्धत बदललेली नसावी.

लेखे कोठे आणि किती वर्षे जपून ठेवावे:
हे लेखे मुख्य व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणे गरजेचे असते. व्यवसाय जर एकापेक्षा जास्त ठिकाणांहून केला जात असेल, तर अशा ठिकाणीसुद्धा लेखे ठेवता येतात. लेखे आणि माहिती आपल्याला सहा वर्षांपर्यंत जपून ठेवावी लागते.
लेखा परीक्षण (ऑडिट):
ज्या व्यावसायिकांची वार्षकि उलाढाल २५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या लेख्यांचे परीक्षण हे सनदी लेखाकाराकडून (चार्टर्ड अकौंटंट) करून घेणे गरजेचे आहे. असे परीक्षण करून न घेतल्यास दीड लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

उद्गम कर कापून भरणे आणि उद्गम कराचे विवरणपत्र भरणे:
ज्या व्यावसायिकांची मागील आíथक वर्षांची उलाढाल २५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा व्यावसायिकांना त्यांनी दिलेल्या पगारावर, कंत्राटी खर्चावर, व्याजावर, इतर व्यावसायिकांवर केलेल्या खर्चावर उद्गम कर कापून सरकारकडे जमा करावा लागतो आणि या उद्गम कराचे तिमाही विवरणपत्र दाखल करावे लागते.
उदाहरणार्थ, जर एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यक्तीला व्याजापोटी २५,००० रुपये दिले असतील, तर त्यावर १०% उद्गम कर कापून तो महिना संपल्यानंतर सात दिवसांच्या आत सरकारकडे जमा करावा लागतो, हा उद्गम कर कंत्राटदारांना जर पसे दिले तर १% किंवा २%, व्यावसायिक किंवा तांत्रिक व्यक्तींना १०% असा आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र:
व्यावसायिकांसाठी विवरण पत्र भरण्याची मुदत ही ३१ जुलपर्यंत असते; परंतु ज्या व्यावसायिकांना लेखापरीक्षण बंधनकारक आहे त्यांच्यासाठी ही मुदत ३० सप्टेंबर अशी असते.
या लेखाद्वारे व्यावसायिकांना प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींची ओळख करून देण्यात आली आहे, जेणेकरून त्यांच्याकडून प्राप्तिकर कायद्याचे पालन होईल आणि व्याज आणि दंडापासून त्यांची सुटका होईल.
लेखक सनदी लेखाकार आहेत
pravin3966@rediffmail.com

उत्पन्न आणि खर्चाचा मेळ:
उत्पन्न:
प्राप्तिकर कायद्यानुसार व्यवसाय किंवा धंद्यातून झालेला नफा हा करपात्र उत्पन्न म्हणून गणला जातो. हा नफा कसा गणला जातो, त्यासाठी कोणते उत्पन्न दाखवावे, खर्चाची किती व कशी वजावट घेता येते याबद्दलच्या तरतुदी प्राप्तिकर कायदा कलम २८ ते ४४डीबीमध्ये नमूद आहेत. व्यावसायिकांसाठी लागू असणाऱ्या काही ठळक तरतुदी खालीलप्रमाणे:
* वसायातून मिळालेले उत्पन्न: उदा. वकिलाने अशिलाकडून घेतलेली फी किंवा वैद्याने रुग्णाकडून घेतलेली फी वगरे. हे उत्पन्न कोणतेही खर्च वजा न जाता दाखवावे लागते.
* सायिकाला वस्तुरूपाने मिळालेल्या भेटी (व्यावसायिक क्षमतेमध्ये) यासुद्धा व्यवसायापासून मिळालेले उत्पन्न म्हणून गणले जाते.
* सायिकाला व्यवसायाच्या अनुषंगाने मिळणारे भाडे उत्पन्न हेसुद्धा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न म्हणून गणले जाते.
* वसाय करण्यासाठी जो खर्च होतो त्याची वजावट उत्पन्नातून मिळते. या खर्चामध्ये पगार, प्रवास भाडे, व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचे भाडे, कागद छपाई, घसारा इत्यादींचा समावेश होतो.
खर्चाची वजावट घेताना ध्यानात घ्यावयाच्या काही गोष्टी:
१.    हा खर्च संपूर्णपणे व्यवसायासाठीच झाला आहे याची खातरजमा करावी.
२. वैयक्तिक खर्चाची वजावट व्यवसायाच्या उत्पन्नातून मिळत नाही.
३. खर्चाच्या मूळ देयके आणि पावत्या व्यवसायाच्या नावे असल्या पाहिजेत.
४. खर्च हा त्या वर्षीचाच असला पाहिजे.
५. खर्च हा वाजवी आणि रास्त असणे गरजेचे असते.
६. जर उद्गम कराच्या (टीडीएस) तरतुदी लागू असतील, तर त्यावर उद्गम कर कापला असला पाहिजे आणि तो सरकारी खात्यात जमा केला असला पाहिजे.
७. व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच्या खर्चाची वजावट मिळत नाही.
८. भांडवली खर्चाची वजावट उत्पन्नातून मिळत नाही, परंतु दर वर्षी ठरावीक रक्कम घसारा म्हणून वजावट मिळते. ज्या मालमत्तेचा वापर व्यवसायासाठी होतो, त्याच मालमत्तेचा घसारा उत्पन्नातून वजा करता येतो. उदा. जर एका डॉक्टरने इस्पितळ बांधण्यासाठी भांडवली खर्च केला तर त्याचा घसारा इस्पितळाचे बांधकाम पूर्ण होऊन वापरासाठी सज्ज झाल्यानंतरच वजावट म्हणून दाखवू शकतो. मालमत्ता ही स्वत:च्या किंवा व्यवसायाच्या नावाने असणे गरजेचे आहे. पत्नीच्या नावाने असलेल्या गाडीचा घसारा पतीला वजावट म्हणून घेता येत नाही.
९. व्यावसायिकाने व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर दिलेल्या व्याजाची वजावट मिळते. हे कर्ज व्यवसायासाठीच घेतले हे सिद्ध करता आले पाहिजे. वैयक्तिक कारणासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची वजावट घेता येत नाही.
१०. कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या विमा हप्त्याची वजावट मिळते; परंतु व्यावसायिकाने स्वत:साठी घेतलेल्या विम्याच्या हप्त्यांची वजावट मिळत नाही.
११. रोखीने केलेल्या २०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्चाची वजावट मिळत नाही. यासाठी काही सवलती आहेत.
वरील तरतुदींचा विचार करून नफा काढावा. जर जास्त खर्चाची वजावट घेतली तर कर, व्याज आणि दंडसुद्धा भरावा लागू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 1:02 am

Web Title: the amount of tax for professionals
टॅग : Tax
Next Stories
1 फंड विश्लेषण.. कॅनरा रोबेको बॅलंस्ड फंड
2 सावधान नजर तुमच्यावर आहे!
3 दिवस तुझे फुलायचे!
Just Now!
X