ताहेर बादशहा (मुख्य गुंतवणूक अधिकारी इन्व्हेस्को म्युच्युअल फंड)

भांडवली बाजारात गुंतवणुकीचा पथ हा तीव्र चढ असलेल्या डोंगर-घाटावरून जाणाऱ्या रस्त्यासारखा असतो. सतत चढ-उतार असलेला अरुंद, वळणावळणाचा मार्ग क्षणोक्षणी कसोटी पाहणारा असतो. मध्येच दरड कोसळल्याने रस्त्यावरील रहदारी थांबल्याचा धोकाही असतो. चालक जर अनुभवी नसेल तर अशा रस्त्यावर गाडी चालविणे जोखमीचेच! सराईतानेही येथे घाई करणेही घातकच. तर नवख्याने भीतीपोटी पुढे जायचेच नाही म्हटले तर ठरलेल्या ठिकाणी पोहोचताही येणार नाही अशी अडचण असते.

हे सांगायचे तात्पर्य हेच की, भांडवली बाजारात गुंतवणूक ही कोणासाठीही सोपी गोष्ट नाही. चढ-उतार आणि अस्थिरतेपायी अनेक गुंतवणूकदारांनी या बाजाराकडे पाठ फिरविल्याचे आढळून येते. येथे घाई करून चालत नाही. दीर्घावधीत चांगला परतावा मिळण्याच्या संधीला मुकण्यासारखे ते ठरते, हे सोदाहरण सिद्ध झाले आहे. त्यामुळे लांब पल्लय़ासाठी संयमाने जो टिकाव धरून राहतो तो या बाजारात चांगला लाभ मिळवतोच. त्यामुळे अल्पावधीत चांगल्या परताव्याची हाव आणि भीती या दोहोंवर नियंत्रण आणि संतुलन गुंतवणूकदाराकडे असणे आवश्यकच आहे.

बाजार तेजीचा असेल तेव्हाच गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड उडत असल्याचे दिसू न येते. झुंडीची मानसिकता यामागे असते. त्याने गुंतवणूक केली मग आपणही करायला हवी, ही त्यामागची प्रेरणा असते. तेजीची ही आस आणि आकर्षण नि:संशय खूप प्रभावी असते आणि हा मोह टाळता येणेही अनेकांसाठी अवघड असते, हेही मान्य. हे परताव्याच्या लालसेपोटीच घडत असते आणि त्यात अविचाराचाच घटक मोठा असतो. अधिकाधिक गुंतवणूकदारांची झुंबड ही सट्टेबाजांसाठी पर्वणी ठरते, हेही लक्षात घ्यावयास हवे. उद्याचा दिवस दिसणारच नाही, अशा तऱ्हेने आततायीपणे कोणताही निर्णय घेणे टाळलेलेच बरे. विशेषत: स्वत:च्या जोखमीवर आणि उण्या-अधिक समजेतून गुंतवणूक करणाऱ्यांनी ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवायला हवी.

आता जशा किमती निरंतर वाढत आहेत, तसे सराईत आणि मातब्बर गुंतवणूकदार त्यातून अंग काढून नफा पदरी पाडून घेत आहेत. हळूहळू अशा नफा वसूल करणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि शेअर्सच्या किमती पडू लागतात. भीतीच्या चक्राची ही पहिली पायरी असते. झुंडीच्या मानसिकतेतून बाजारात प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये मग मिळेल त्या किमतीला त्यांचे शेअर्स विकण्याचा सपाटा सुरू होतो. त्यामुळे काल्पनिक नुकसान हे आपोआपच वास्तविक नुकसानीत परिवर्तित होते.

उन्मादाच्या स्थितीपासून अलिप्त राहून कायम संयम असणारेही काही गुंतवणूकदार असतात. हे असे गुंतवणूकदार कोणते?

एक तर असे गुंतवणूकदार सांगोवांगी येणाऱ्या गोष्टी आणि झुंडीच्या मानसिकतेपासून दूर असतात. प्रत्यक्षात त्यांची पावले प्रवाहाच्या उलट दिशेला वळतात. म्हणजे जेव्हा आसपास सर्वत्र विक्री करणारे असतात, तेव्हा ते खरेदी करीत असतात आणि जेव्हा खरेदीदारांची भाऊगर्दी दिसत असते तेव्हा ते विक्री करीत असतात.

दुसरे म्हणजे, असे गुंतवणूकदार बाजारातील वादळी चढ-उतारांनी विचलित होत नाहीत. सातत्याने आणि दूरच्या ध्येयावर लक्ष ठेवून त्यांची थोडीथोडकी परंतु निरंतर गुंतवणूक सुरू असते. थरारक घसरण त्यांना घाबरवत नाही आणि मोहक तेजीला भुलणारी हावही त्यांच्यापाशी नसते.

तिसऱ्या प्रकारचे गुंतवणूकदार हे ज्यांचा शेअर्समध्ये गुंतवणुकीबाबत एक स्पष्ट आर्थिक दृष्टिकोन असतो. त्याबाबत कोणतीही तडजोड न करता, शिस्तीचे पालन करीत, बाजारस्थिती कशी का असेना त्याची पर्वा न करता ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करीत असतात.

इक्विटी हा एक सर्वात लाभदायी गुंतवणूक पर्याय आहे, जो बचतीवर महागाईचा परिणाम परिणामकारक धुऊन काढू शकतो आणि दीर्घावधीत संपत्ती निर्माणाला मदत करतो. ही कठोर तपश्चर्या नक्कीच नाही, मात्र गुंतवणूकदाराने काही तत्त्वांचा अंगीकार आणि पालन मात्र करावे लागेल. घाई टाळणारी शिस्त, लालसेवर नियंत्रण, भीती काबूत ठेवणारा संयम हे तर आवश्यकच!