News Flash

फंड विश्लेषण : नावाप्रमाणे ब्लूचिप..

व्यवसाय परिचालनातून पुरेशी रोकड तयार करू शकत नाही तो गुंतवणूकयोग्य व्यवसाय नव्हे.

यूटीआय ब्ल्यूचिप फ्लेक्झी कॅप फंड 

व्यवसाय परिचालनातून पुरेशी रोकड तयार करू शकत नाही तो गुंतवणूकयोग्य व्यवसाय नव्हे. समभाग गुंतवणूक म्हणजे केवळ त्या कंपनीचे शेअर विकत घेणे नसून तर व्यवसायात भागीदारी होय. जर कोणताही व्यवसाय पुरेशी रोकड निर्माण करू शकला नाही तर तो व्यवसाय गुंतवणूकदारांसाठी संपत्तीची निर्मिती करू शकत नाही. अशा पुरेशी रोकड निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारा हा फंड..

arth09

शेअर बाजारात जे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या वाटेने न जाता थेट गुंतवणूक करतात अशी मंडळी – ‘‘मी केवळ ‘ब्ल्यूचिप’ शेअर्समध्येच गुंतवणूक करतो’’ असे सांगतात. ही ‘ब्लूचिप’ संकल्पना मोठी मजेशीर आहे. पोकर नावाच्या खेळात सर्वात मोठय़ा किमतीच्या सोंगटीचा रंग निळा असल्याने मौल्यवान किंवा मोठय़ा किंमतीच्या समभागांना ‘ब्ल्यूचिप’ म्हणतात. मोठय़ा समभागांना ब्लूचिप म्हणण्याची प्रथा जपानमध्ये सुरू होऊन त्याचा जगभर प्रसार झाला. परिचित नाममुद्रा असलेल्या कंपन्या म्हणजे ब्लूचिप असा सर्वसामान्यांचा समज असतो. ‘ब्लूचिप’ ही संकल्पना म्हणजे नेमके काय हे न समजता आंधळेपणाने स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, इंडियन ऑइल, टाटा मोटर्स यांसारख्या समभागात ते गुंतवणूक करीत असतात.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या शब्दाचे आकर्षण असल्याने म्युच्युअल फंड योजनांच्या नावांतसुद्धा ‘ब्ल्यूचिप’ हा शब्द असलेले अनेक फंड आहेत. आजची शिफारस असलेल्या यूटीआय ब्ल्यूचिप फ्लेक्झी कॅप फंडाच्या गुंतवणुकीत वर उल्लेख आलेले सामान्यांच्या लेखी ब्ल्यूचिप असलेले शेअर्स का नाहीत व गुंतवणुकीत समावेश असलेले समभाग त्याहून वेगळे का आहेत, हे जाणून घेणे गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. या फंडाची मूळ सुरुवात ‘यूटीआय लीडरशिप फंड’ या नावाने होऊन ३० जानेवारी २००६ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झाली. हा फंडाचा उद्देश एखाद्या व्यवसायाचे नेतृत्व करणाऱ्या कंपन्यांतून गुंतवणूक करून भांडवली नफा कमावणे हा होता. १० जुलै २०१४ पासून यूटीआय मास्टरप्लस युनिट स्कीम ही यूटीआय लीडरशिप फंडात विलीन झाली. पुढे १ डिसेंबर २०१५ पासून या फंडाला ‘यूटीआय ब्ल्यूचिप फ्लेक्झी कॅप फंड’ हे नाव मिळाले. नाव बदलल्यानंतर फंडात गुंतवणूक करण्याचे निकष व निधी व्यवस्थापक बदलले.

या फंडाच्या व्यवस्थापनाची धुरा संजय रामदास डोंगरे यांच्याकडून अजय त्यागी यांच्याकडे आली. डोंगरे हे एक शिस्तीचे निधी व्यवस्थापक म्हणून ओळखले जातात. डोंगरे यांनी रचलेल्या पायावर कल्पकतेने नवीन निकषांनुसार त्यागी यांनी वाटचाल सुरू ठेवली. बदललेल्या निकषांनुसार हा फंड केवळ व्यवसायाचे नेतृत्व करणाऱ्या कंपन्यांतून गुंतवणूक न करता व्यवसायातून रोख रक्कम निर्माण करणाऱ्या कंपन्यातून करू लागला व केवळ लार्ज कॅप फंडात गुंतवणूक न करता लार्ज कॅप व मिड कॅप कंपन्यातून गुंतवणूक करू लागला.

गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांच्या मते, कोणताही माणूस व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठी करतो. किंबहुना जो व्यवसाय परिचालनातून पुरेशी रोकड तयार करू शकत नाही तो गुंतवणूकयोग्य व्यवसाय नव्हे. जर समभाग गुंतवणूक म्हणजे केवळ त्या कंपनीचे शेअर विकत घेणे नसून तो व्यवसाय विकत घेणे आहे. जर व्यवसाय रोकड निर्माण करू शकला नाही तर तो व्यवसाय गुंतवणूकदारांसाठी संपत्तीची निर्मिती करू शकत नाही, असे बफे यांचे मानणे आहे. हा फंड नेमक्या बफे  यांच्या याच निकषात बसणाऱ्या अर्थात व्यवसायातून रोकड निर्माण करू शकणाऱ्या कंपन्यांतून गुंतवणूक करतो. मागील दहा वर्षांत स्टेट बँकेला सरासरी आपल्या मालमत्तेवर फक्त ७.३५ टक्के परतावा मिळाला. सद्य परिस्थितीचा विचार केल्यास स्टेट बँकेच्या नफ्याचा मोठा हिस्सा अनुत्पादित कर्जाच्या तरतुदीत जातो. बँकांसाठी सुगीचा मोसम ठरलेल्या दिवसांत त्याचा सर्वाधिक परताव्याचा दर १२ टक्के तर सर्वात कमी ४.५ टक्के होता. त्या उलट फंडाच्या गुंतवणुकीत असणाऱ्या नेस्लेने सरासरी १७ टक्के  दराने रोकड तयार केली आहे. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी, इन्फोसिस, सन फार्मा यांची नफाक्षमता अन्य कंपन्यांच्या तुलनेत मोठी असल्याने या कंपन्यांचा समावेश फंडाच्या गुंतवणुकीत आहे.

arth08

हा फंड मल्टी कॅप प्रकारचा फंड असला तरी पुरेशी रोकड निर्माण करू शकणाऱ्या बहुतांश कंपन्या लार्ज कॅप प्रकारच्या असल्याने हा फंड लार्ज कॅप केंद्रित मल्टी कॅप प्रकारचा फंड आहे. मागील सहा महिन्यांत बाजाराने एका वर्षांच्या नीचांकावरून वार्षिक उच्चांकापर्यंतचा प्रवास केला. सध्या निफ्टीचा ३१ ऑगस्ट रोजी बाजार बंद झाला तेव्हा ‘पी/ई’ २०.८१ होता तर त्याच वेळी ‘निफ्टी फ्री फ्लोट मिड कॅप १००’ या निर्देशांकाचा ‘पी/ई’ ३५.१२ आहे. एप्रिल ते जून या २०१६-१७ वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ७.१ टक्के नोंदले गेल्याचे मागील आठवडय़ात जाहीर झाले. वर्षभरापूर्वी एप्रिल ते जून २०१५ दरम्यान ते ७.५ टक्के, तर यापूर्वीच्या तिमाहीत जानेवारी ते मार्च २०१६ मध्ये ते ७.९ टक्के  नोंदले गेले आहे. सध्या बाजारातील तेजीला जे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी जागतिक रोकड सुलभता हा एक घटक कारणीभूत आहे. साहजिकच मल्टी कॅप प्रकारच्या फंडाचे निधी व्यवस्थापक मिड कॅपमधील गुंतवणूक कमी करून लार्ज कॅप प्रकारच्या समभागाकडे गुंतवणुकीचा कल वळवत आहेत.

व्यवसायातून रोकडनिर्मिती करणारे बॉश, नेस्ले कोलगेट, हिरो मोटोकॉर्पसारख्या समभागांचे मूल्यांकन नेहमीच इतरांच्या तुलनेने जास्त असते. एका अर्थाने ब्लूचिप लार्ज कॅप हे नेहमीच महाग वाटतात. परंतु मागील दहा वर्षांपूर्वी हे समभाग महाग होते तरी या प्रकारच्या समभागांनी भांडवली वृद्धीत कसूर सोडलेली नाही. जॉकीसारख्या अंतर्वस्त्रांची नाममुद्रा असलेल्या पेज इंडस्ट्रीजसारखा समभाग मागील दहा वर्षे २२ टक्के वृद्धी नोंदवीत आला आहे. भारतातील लोकसंख्येचे तरुण वय वाढते शहरीकरण याचा प्रभाव ग्राहकांवर होत असल्याने ग्राहकांचा कल असंघटित क्षेत्राकडून प्रसिद्ध नाममुद्रा असणाऱ्या संघटित क्षेत्राकडे वळत असल्याने ही कंपनी वेगाने वाढत आहे. समभाग गुंतवणुकीत भविष्यातील संधीला नेहमीच महत्त्व दिले जाते. परंतु भविष्यातील संधींकडे पाहात असताना हा फंड वर्तमानातील भांडवली सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत नसल्याने हा फंड निर्देशांकाहून थोडासा अधिक परतावा देत आला आहे. हा फंड गुंतवणुकीत क्रिकेटच्या खेळातील डावाला सुरुवात करून देणाऱ्या फलंदाजाचे काम नक्की करेल. हा फंड षटकार चौकार मारणार नाही. हा फंड टुकुटुकु फलंदाजी करून धावफलक हलता ठेवण्याचे काम  नक्की करेल. भक्कम भिंत बनून खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहण्याचे काम करणाऱ्या फलंदाजांचे काम हा फंड नक्की करेल.

arth07

आज घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे. ज्या ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना होते त्या ठिकाणी अथर्वशीर्षांची सहस्रवर्तने होतात. अथर्वशीर्षांच्या फलश्रुतीत म्हटल्याप्रमाणे- ‘यो दूर्वाकुरैंर्यजति स वैश्रवणोपमो भवति’ याचा अर्थ ‘जो दुर्वाकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा श्रीमंत होतो’ असा आहे. तर गणपतीच्या दुसऱ्या स्तोत्रात गणपतीची आराधना केल्यावर ‘विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम्’ असा उल्लेख आहे. गणपती जशी विद्येची देवता आहे तशी कष्टाने कमावलेल्या बुद्धीच्या बळावर संपत्तीची निर्मिती करणारी देवताही आहे. समभागात दीर्घकालासाठी केलेली गुंतवणूक नेहमीच फायद्याची असते. जे कोणी आजच्या गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ‘सिप’द्वारे श्रीगणेशा करू इच्छितात त्यांच्यासाठी आजची शिफारस उपयुक्तच..

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 1:02 am

Web Title: tips to invest in mutual funds
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : वाहन क्षेत्राच्या फेरउभारीचा लाभार्थी!
2 कर समाधान : दानकर्म देईल करांपासून मोक्ष!
3 गाजराची पुंगी : रेल्वे व रस्ते सुधारणांचा लाभार्थी
Just Now!
X