11 July 2020

News Flash

गुंतवणूक कट्टा.. : कर्ज किती घ्यावे?

तेवढय़ात चहा संपला आणि पुन्हा दोघांचे चेहरे पहिल्यासारखे व्हायच्या आधी आप्पांनी सुरुवात केली

प्रतिनिधिक छायाचित्र

तृप्ती राणे 

आप्पा बाल्कनीत मस्तपैकी खुर्ची टाकून गरमागरम चहाचा आस्वाद घेत होते. रविवारची सकाळ, त्यात पाऊस आणि हातात आलं घातलेला चहा – कसलं फक्कड कॉम्बिनेशन! जुन्या आठवणीत रमणार इतक्यात खालच्या बाल्कनीतून शेखर आणि शालिनीचा आवाज कानावर पडला. शेखर-शालिनी खालच्या माळ्यावर गेल्या वर्षी भाडय़ाने राहायला आले. दोघेही साधारण तिशीतले. आयटीमध्ये कामाला असल्यामुळे फक्त शनिवार-रविवार दिसतात (वीकेंड सेलिब्रेट करत नसले तर!)

भल्या मोठय़ा सगळ्या सोयींनी सज्ज घरामध्ये ही दोनच डोकी. कधीतरी दोघांचे आई-वडील चक्कर मारायला येतात. सगळ्या सोसायटीमध्ये अशी अनेक जोडपी. यांच्या अस्तित्वाची जाणीव त्यांचाकडे पार्टी किंवा त्यांच्यात भांडण झालं की होते! आप्पांना गेली १० वर्ष याची सवय झाली होती. कारण या दहा वर्षांमध्ये शेखर-शालिनीसारखे पाच भाडेकरू खालच्या घरात राहून गेले. आणि मजा म्हणजे सा सगळ्या जोडप्यांची एकच व्यथा – पगार कर्ज फेडण्यात आणि गरजा भागवण्यात संपतो! आणि या सगळ्यांना आप्पांनी पगार कसा वापरायचा यावर धडे दिले होते. तर आज शेखर-शालिनीची वेळ आली.

आप्पांनी चहा बाजूला ठेवला आणि शेखरला बाल्कनीतून आवाज दिला- अरे शेखर! जरा वर ये रे. शालिनी! तूसुद्धा ये.

त्यावर शेखर म्हणाला – आप्पा आत्ता नको! नंतर येतो.

तर आप्पा म्हणाले – अरे पटकन ये रे! तापलेलं वातावरण जरा गरम चहा घेऊन थंड करू या. या दोघेही! शेवटी आले दोघेही, शेखर चिडका चेहरा घेऊन तर शालिनी लाजिरवाणी! आप्पांनी त्यांना स्टडी रूममध्ये बसवलं आणि हातात कुरकुरीत कांदाभजीची प्लेट दिली. कसला चेहरा खुलला दोघांचा! थोडय़ा वेळेकरता का होईना, भांडण विसरून दोघांनी भज्यांवर मस्त आडवा हात मारला. आणि त्यावर गरम मसाला चहा मिळाल्यावर तर दोघांनाही स्वर्गात असल्यासारखं वाटलं. आप्पा दोघांनाही न्याहाळत होते. इतकी तरुण मुलं, रग्गड पैसा हातात, कोणाची जबाबदारी नाही पण आयुष्याचा आनंद नक्की कशात असतो हेच यांना उलगडत नाही! हाय-फाय राहायच्या नादात स्वत:चं एटीएम आणि क्रेडिट कार्ड कसं झालंय हे आज यांना समजवावं लागणार.

तेवढय़ात चहा संपला आणि पुन्हा दोघांचे चेहरे पहिल्यासारखे व्हायच्या आधी आप्पांनी सुरुवात केली – तुमचं थोडं संभाषण माझ्या कानावर पडलं. राहवलं नाही म्हणून बोलावलं तुम्हाला. शेखर! तू ईएमआयबद्दल बोलत होतास. जरा मला सांग नक्की कशाच्या ईएमआय चालू आहेत तुझ्या?


आप्पांनी डायरेक्ट मुद्दय़ालाच हात घातलेला बघून शेखरने सांगायला सुरुवात केली-  आप्पा, मी गाडी, म्युझिक सिस्टीम आणि आयफोनचा ईएमआय भरतो. सगळे मिळून रु. ५०,००० जातात.

तो थांबत नाही तोवर शालिनी म्हणाली – आप्पा एक अजून, तो हॉलीडेसाठीसुद्धा ईएमआय भरतो, रु.१०,०००.

शालिनीने तोंड उघडल्यावर शेखर थोडंच गप्पं राहणार. आप्पा, शालिनी प्रत्येक महिन्यात रु.३०,००० इतका खर्च क्रेडिट कार्डवर करते आणि ते पुढे सहा महिन्यांत थोडे थोडे करून फेडते. जरी ईएमआय नसला तरी महिन्याला २-२.५ टक्के इतके व्याज ती भरते.

आप्पांनी हिशोब घातला – सगळं मिळून रु. ९०,०००. आता मला सांगा की तुम्हा दोघांचा मिळून महिन्याला पगार किती येतो?

तर उत्तर मिळालं रु. १,२०,०००.

आप्पा थोडे गंभीर होत म्हणाले – तुमच्या लक्षात येतंय का की तुम्ही ७०-७५ टक्के पगार ईएमआयसाठी खर्च करताय. आणि हे ईएमआय तुमच्यासाठी कोणतीही संपत्ती निर्माण करीत नाहीयेत. आज तुमच्यावर महिना भागवायची धावपळ होतेय. पण पुढे मुलं झाली, देव न करो, पण नोकरी सुटली तर तुमचं कसं होणार?

हे ऐकून दोघेही ओशाळले. खरं तर दोघांनाही आपलं चुकतंय याची जाणीव होत होती पण प्रत्येक वेळी दोघं एकमेकाच्या चुका दाखवण्यात भांडण करायचे. आप्पांच्या निमित्ताने का होईना पण सोनाराने त्यांचे कान टोचले. मग आप्पांनी त्यांना काही कानमंत्र दिले.

आप्पांनी सांगितलेल्या टिप्स ऐकून शेखर आणि शालिनी थोडे निवांत झाले. यापुढे आपलं आर्थिक नियोजन करून मग खर्च करणार असं आश्वसन आप्पांना देऊन आपल्या घरी गेले.

तर प्रिय वाचकांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या कर्जाचा नीट विचार करा आणि ईएमआयच्या विळख्यातून बाहेर पडा.

आप्पांनी दिलेले कानमंत्र

* आय पाहून खर्च. स्टेट्स सांभाळताना खिसे खाली नको.

* कर्ज घेताना आपण नक्की का कर्ज घेतोय – खर्च वाढवण्यासाठी (वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज) की गरज भागवण्यासाठी (गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज)? या कर्जाची आपल्याला खरंच गरज आहे का? ईएमआयच्या व्यतिरिक्त अजून कोणते खर्च करावे लागणार? या प्रश्नांचं निश्चित उत्तर मिळवा. चैनीसाठी कर्ज घेऊ नका.

* मिळकतीच्या ४० टक्क्य़ांपर्यंत ईएमआय ठीक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर जरा परत एकदा तपासा.

* नवीन नोकरी लागल्यावर शक्यतो कर्ज घेणं टाळा. जास्तीत जास्त पैसे वाचवून गुंतवणूक करा.

* घरासाठी कर्ज घ्यायच्या आधी किमान ७-८ वर्ष शेअर्स किंवा म्युचुअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक करा.

* क्रेडिट कार्डवर मिळणारी कर्ज फक्त इमर्जन्सीसाठी वापरा. क्रेडिट कार्डाचा वापर कमी करा. त्याऐवजी डेबिट कार्ड वापरा. खर्च आपोआप कमी होईल.

* घेतलेली र्कज किती व्याजावर आहेत याचा वेळोवेळी अभ्यास करा. गरज असल्यास कर्ज हस्तांतरण (लोन ट्रान्सफर) करा.

* चैन किंवा हौसेसाठी खर्च करा, पण कर्ज घेऊन नाही! आर्थिक पाया मजबूत करा आणि मग खुशाल मजा करा.

* रिटायरमेंटच्या जवळपास कर्ज घेताना पुढील २०-२५ वर्षांच्या काळाचा खर्चाचा हिशेब नक्की घाला. कदाचित तुम्हाला कर्जाची परतफेड न झेपणारी असेल.

*  कर्ज घेऊन गुंतवणूक करताना खूप विचार करा. गुंतवणुकीतून मिळणारे परतावे, जोखीम आणि कर्जाचं व्याज याचा ताळमेळ नीट बसवून मग निर्णय घ्या.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

स्रोत : व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन, १३ जुलै २०१८

*‘सेबी’च्या निर्देशांनुसार पुनवर्गीकरणाने फंडांच्या नावांतील बदलासह उल्लेख हे सर्व म्युच्युअल फंड हे रेग्युलर ग्रोथ पर्यायातील आहेत.

सूचना :

* जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

* या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.

* यातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.

trupti_vrane@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:07 am

Web Title: trupti rane article about loan guidance
Next Stories
1 डेट फंडाची विक्री  आणि कर आकारणी!
2 माझा पोर्टफोलियो : गमावलेली खरेदीची संधी परत!
3 गुंतवणूक भान : एक पाऊल ‘सशक्त’ पुढे!
Just Now!
X