News Flash

नियोजन भान.. : अस्सल गुंतवणुकानुभव

लग्नासाठी जेव्हा दागिने करायचे झाले तेव्हा गोल्ड ईटीएफ विकून मिळालेले पैसे त्या कारणासाठी वापरले. 

कर वाचविण्याकरिता तिने विमा, युलिप, ईएलएसएस, इन्फ्रास्ट्रक्चर बाँड, एनपीएस आणि व्हीपीएफचा वापर केला.

अर्धा डझन कच्चे लिंबू – ८

जानेवारी ते जुलै आपण सर्वानी काल्पनिक पात्रांच्या आधारे गुंतवणुकीच्या विश्वात फेरी मारली किंवा काहींनी छोटीशी का होईना पण उडीसुद्धा मारली. या सदरापासून मात्र काही मैत्रिणींचे खरे अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवायचं ठरवलंय. शेवटी कल्पना ती कल्पना, पण खरी कमाल असते ती वास्तवात! म्हणून हा प्रयोग.

तर सुरुवात करू या सौ. स्वातीकडून. स्वातीने गुंतवणूक सुरू केली ती वयाच्या १९ व्या वर्षांपासून. इंटर्नशिप करताना जे पैसे मिळायचे त्यातून पोस्टात आवर्ती ठेव (आरडी) सुरू केली होती. तेव्हा एफडी, आरडी आणि बँकेत सेव्हिंग एवढंच माहीत होतं. रु. ४५० मधून रु. १०० आरडीमध्ये जात होते. बाकी स्व-खर्चासाठी. तिचं कुटुंब मध्यमवर्गीय. वडील सरकारी नोकरीत, आई गृहिणी आणि छोटी शिकणारी बहीण. घरातली परिस्थिती बेताची. पदव्युत्तर शिक्षण झाल्याबरोबर बँकेत नोकरी मिळाली. तिथून सुरू झाला गुंतवणुकीचा प्रवास. सुरुवातीला पगार घरात कॉम्पुटर, मोठा टीव्ही अशा गोष्टींमध्ये खर्च झाला. बचतीचा दर खूप कमी होता.

१. तिचं घर

साधारण वर्षभराने घर घ्यायचं ठरलं. गृहकर्ज पण मिळालं. पण स्वत:चे पैसे कमी पडत असल्यामुळे आई-बाबांकडे मागावे लागले. वयाच्या २५ व्या वर्षी घर झालं. ६० टक्के पगार कर्जाच्या हप्त्यांमध्ये जाऊ लागला. इतर खर्च सांभाळताना नाकीनऊ  येऊ लागले, पण बाबांची नोकरी तोवर चालू असल्यामुळे सगळ्या कुटुंबाचं व्यवस्थितपणे भागत होतं. मग पगारवाढ झाल्यामुळे ही परिस्थिती एका वर्षांत बदलली. बचतीचा दर वाढवला आणि वायफळ खर्च कमी केले. आणि बघता बघता ५ वर्षांत तिने कर्ज पूर्णपणे फेडलं.

२. लग्न

आता लग्नासाठी पैसे जमवायचे होते. आपल्या लग्नाचा सगळा खर्च आपणच करायचा, आई-बाबांवर त्याचा भार पडू द्यायचं नाही हे मनाशी पक्कं केलं. या वेळी म्युचुअल फंड समजून घेऊन तिथे पैसे गुंतवायला सुरुवात केली. सगळंच समजत होतं असं नव्हतं, पण करून बघायची तयारी होती म्हणून जमत गेलं. तिचे सहकारी तिला म्युचुअल फंड आणि शेअर्सबद्दल जास्त सांगायचे म्हणून तिने हिम्मत दाखवली. शिवाय २००६ ते २००८ हा काळ शेअर मार्केटसाठी खूप चांगला असल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला. या सगळ्यामुळे लग्नासाठी ठरविलेली रक्कम तिने उभी केली.

३. सोने

ही गुंतवणूक करताना तिने चांगलीच हुशारी दाखविली. थेट दागिने न घेता, तिने गोल्ड ईटीएफमध्ये थोडे थोडे पैसे घातले. साधारणपणे २००६-०७ साली सोन्याचा भाव कमी होता आणि त्यानंतर तो वाढत गेल्यामुळे तिला या गुंतवणुकीत चांगलाच फायदा झाला. लग्नासाठी जेव्हा दागिने करायचे झाले तेव्हा गोल्ड ईटीएफ विकून मिळालेले पैसे त्या कारणासाठी वापरले.

४. लग्नानंतरची गुंतवणूक

लग्नानंतर तिने आणि तिच्या नवऱ्याने मिळून गुंतवणूक करायचं ठरविलं. दोघांच्याही पगारातून ठरविलेली रक्कम प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला वेगळ्या बचत खात्यामध्ये ठेवायला सुरू केली. या रकमेचा वापर  घर घेण्यासाठी, पुढे मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गुंतवणुकींसाठी होणार होता. हे पैसे मग चांगल्या शेअर्स आणि म्युचुअल फंडात शिस्तबद्धपणे गुंतवायला सुरुवात केली. एसआयपीचा खूपच फायदा झाला. जशी जशी गरज लागली तशी गुंतवणूक विकून पैसे वापरले गेले, त्यामुळे मोठय़ा खर्चाचा भार आला नाही.

५. कर नियोजन

कर वाचविण्याकरिता तिने विमा, युलिप, ईएलएसएस, इन्फ्रास्ट्रक्चर बाँड, एनपीएस आणि व्हीपीएफचा वापर केला. शिवाय गृहकर्जाचा हप्तासुद्धा त्यात मदत करत होता.

६. आयुर्विमा

सुरुवातीच्या काळात विमा म्हणजे एक प्रकारची आर्थिक गुंतवणूक समजून युलिप आणि एंडोमेंट पॉलिसीमध्ये पैसे घातले. गृहकर्ज घेताना टर्म कव्हर घेऊन स्वत:ची जबाबदारी सुरक्षित केली.

हे सर्व करताना जसं यश मिळालं, तशी निराशासुद्धा पदरी पडली. बरोबर गोष्टी करत असताना चुकासुद्धा झाल्या. पण ती निराश झाली नाही. आपल्या चुकांमधून खूप काही शिकायला मिळालं तिला आणि म्हणून तिची प्रगती झाली असा तिचा ठाम विश्वास आहे.

तिच्या ज्या चुकांनी तिला अधिक जागरूक केलं त्या अशा आहेत:

*   तिचं घर : वर सांगितल्याप्रमाणे तिने तिचे गृहकर्ज पाच वर्षांत फेडलं. २००६ साली गृहकर्जाचे हप्ते सुरू झाले होते आणि २०११ पर्यंत तिने जसे जसे पैसे मिळत गेले तसं ती कर्ज कमी करत गेली. पण एक महत्त्वाची गोष्ट जी तिच्या नंतर लक्षात आली ती म्हणजे तिने कर्ज वेळेआधी न फेडता ती रक्कम जर चांगले म्युचुअल फंडात गुंतवली असती तर तिला दोन फायदे झाले असते. पहिला फायदा म्हणजे गृहकर्जावरील व्याजाने (व्याजदर साधारणपणे ९-१० टक्के होता) कर वाचला असता. दुसरा फायदा म्हणजे म्युचुअल फंडात गुंतविलेल्या पैशांची वाढ (परतावे साधारणपणे १५-२० टक्के होते) होऊन तिच्याकडे चांगली मालमत्ता तयार झाली असती. व्याजदर आणि गुंतवणुकीवरचे परतावे समजून कर्ज ठेवावे की फेडावे हा निर्णय घ्यायला ती सक्षम झाली.

*   कर नियोजन : कर नियोजन करताना तिने केलेली मोठी चूक म्हणजे वर्षअखेरीस कर वाचवण्यासाठी पूर्ण माहिती न मिळवता केलेली गुंतवणूक. तिने घाईघाईत ईएलएलएस आणि युलिपमध्ये पैसे घातले. आणि नंतर मग तिच्या लक्षात आलं की ईएलएसएसमधील पैसा तीन वर्षांसाठी काढता येत नाही आणि त्याच्यासमोर कर्जसुद्धा काढता येत नाही. सुरुवातीच्या काळात जेव्हा गृहकर्जाचा हप्ता जाऊन कमी पैसे हातात राहात होते, त्यावेळी इमर्जन्सी फंड ती तयार करू शकली नाही. कारण पैसे ‘ईएलएसएस’मध्ये ब्लॉक झाले. इथे तिला हे समजलं की, प्रत्येक वेळेला कर वाचवायला हवा असं नसतं, तर कर भरून हातात पैसा ठेवणं गरजेचं असतं. युलिपमधील गुंतवणूक तिला समजलीच नव्हती. ज्याने तिला युलिप घ्यायला लावली तो तिचा सहकारी असल्यामुळे तिने आंधळा विश्वास ठेवून ही गुंतवणूक केली. पुढे जेव्हा तिला युलिप काय आहे आणि ते कसं काम करतं हे कळलं तेव्हा तिला पश्चात्ताप झाला आणि नुकसान सहन करावं लागलं. या गुंतवणुकीने तिला शिकवलं की गुंतवणूक ही भावनिक होऊन किंवा दुसऱ्याच्या भरोशावर करायची नाही, कारण नुकसान झालं तर त्याला जबाबदार आपणच असतो.

*   आयुर्विमा : आयुर्विमा किती घ्यायचा, कोणाकडून घ्यायचा आणि कशाला घ्यायचा हे तिने सुरुवातीला कधी तपासलंच नाही. कोणीतरी सांगतंय म्हणून कुठली तरी पॉलिसी घ्यायची. आपल्यावर किती आर्थिक जबाबदारी आहे आणि त्यानुसार विम्याचे कव्हर घ्यावे हे ती नंतर शिकली. शिवाय कोणत्या कंपनीचा विमा घ्यावा हे पण तिच्या एका सहकाऱ्याने तिला शिकवलं. गृहकर्ज घेताना तिने तेवढंच विमा कव्हर पण घेतलं. पण कर्ज फेडल्यावर विम्याचे हप्ते भरणं बंद केलं. तिला वाटलं की परत कधी विम्याची गरज लागणार नाही. परंतु चार वर्षांनी तिला पुन्हा विमा घ्यावा लागला आणि अर्थातच प्रीमियमची रक्कम वाढली.

*  शेअर बाजारातील गुंतवणूक : सुरुवातीच्या काळात ‘टिप्स’वर विश्वास ठेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. मार्केट चांगलं चढत होतं म्हणून फायदा सुद्धा झाला. पण २००८ मध्ये मार्केट पडल्यावर तिला हे समजलं नाही की शेअर्स विकून पैसे काढावे की ठेवून द्यावे. खूप उशिराने तिने तोटय़ामध्ये सगळे शेअर्स विकले आणि मार्केटमधल्या गुंतवणुकीतून बाहेर पडली. पण नंतर भरपूर वाचन करून आणि तज्ज्ञ लोकांबरोबर चर्चा करून तिच्या लक्षात आलं की, शेअर कसा निवडावा, पोर्टफोलिओ कसा तयार करावा, स्टॉप लॉस पातळीतून नुकसान कसं कमी करावं आणि शेअर्स कधी विकावे. आता ती डोळसपणे ही गुंतवणूक करते.

स्वातीला आज स्वत:बद्धल अभिमान वाटतो की, तिने गुंतवणुकीच्या अथांग समुद्रात उडी मारली आणि पोहायला शिकली. ती तिच्या कुटुंबाचं सुंदर पद्धतीने आर्थिक नियोजन करते. एवढंच नाही तर तिने तिच्या इतर मैत्रिणींनासुद्धा या गोष्टीचं महत्त्व समजावलं. आज तिचा सगळा प्रवास वाचकांसमोर मांडताना तिला खूप आनंद होतोय.

(टीप : गोपनीयता राखण्याकरिता गुंतवणूकदार मैत्रिणीचं नाव बदलण्यात आलेलं आहे)

तृप्ती राणे – trupti_vrane@yahoo.com

(लेखिका मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2017 1:09 am

Web Title: trupti rane article on different investment options
टॅग : Investment
Next Stories
1 कर समाधान : गुंतवणूक आणि कर नियोजन
2 फंड विश्लेषण : मला काहीच ‘प्रॉब्लेम’ नाही..
3 तुमची ‘सुरक्षित’ गुंतवणूक महागाईवर मात करते काय?
Just Now!
X