23 November 2017

News Flash

नियोजन भान.. : जोखीम क्षमतेचा विचार करू..

आर्थिक सल्लागाराकडून व्यवस्थित जोखीम मूल्यांकन करून घ्या, असं मी इथे सुचवू इच्छिते.

तृप्ती राणे | Updated: May 15, 2017 1:10 AM

स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा काढणं हे खूप महत्त्वाचं आहे.

अर्धा डझन कच्चे लिंबू!   भाग – ५

आज जरा हटके करायचं ठरवलं! नेहमी ट्रेनमध्ये भेट होत होती, म्हणून आज मुद्दाम सुट्टीच्या दिवशी भेटायचं ठरलं. कारणही महत्त्वाचं होतं ना. आज सोनल सर्वाना पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे शिकवणार होती. शिवाय सगळ्या जणी आपलं जोखीम मूल्यांकन (रिस्क प्रोफायलिंग) करून येणार होत्या. आत्तापर्यंत फक्त ज्ञान मिळत होतं, पण आज मैदानात उतरणार होते सगळे लिंबू. सोनलने सर्वाना वेळेवर येण्याची तंबीच दिली असल्यामुळे सगळ्या जणी घरातलं लवकर आटोपून सुगंधा ताईंकडे जमल्या होत्या. आज ताईपण खूश होत्या. सर्वाना मस्तपैकी सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या चहापर्यंतचा बेत त्यांनी आधीच कळवला होता. सगळ्या जणी आल्या आणि गरम-गरम उपमा आणि फिल्टर कॉफीबरोबर मस्त गप्पा सुरू झाल्या. बरोबर दहा वाजता दारावरची बेल वाजली आणि सोनल आली. सर्वाना वेळेवर आलेलं पाहून ती खूश झाली. तिच्या प्लेटमधला उपमा संपवत म्हणाली- चला कामाला लागू या. भरपेट खाऊन आता झोपू नका. तेवढय़ात सिल्वी म्हणाली- सोनल, आज आम्ही सगळ्यांनी एक काम केलं आहे. मागच्या वेळी तू सांगितल्याप्रमाणे आणि थोडं इंटरनेटवर शोधून आम्ही आमचं जोखीम मूल्यांकन केलं आहे. प्लीज जरा बघून सांगतेस का, की ते कितपत बरोबर आहे. सोनल म्हणाली- अरे व्वा!!! छान छान. कच्चे लिंबू पिकायला लागले तर. मी न सांगता तुम्ही स्वत: हे केलं हे खूपच मस्त झालं. यातून तुमचा गुंतवणुकीचा प्रवास आता हळूहळू सुरळीत व्हायची चिन्हे दिसू लागली आहेत. बघू बरं काय केलंय. यावर जिग्नाने खालील तक्ता तिच्यासमोर ठेवला:

(तक्ता १ पाहावा.)

arth01

तक्ता बघून सोनल म्हणाली- सुंदर प्रयोग केला आहे तुम्ही सर्वानी. जे प्रश्न तुम्ही निवडलेत ते अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहेत, पण यावरून तुम्हाला कळलंच असेल की, जोखीम क्षमतेमध्ये तुम्ही कमी पडत आहात. ज्यांना ज्यांना रिटायरमेंटला १० वर्षांपेक्षा जास्त काळ आहे, त्यांनी आपली जोखीम क्षमता वाढवणे गरजेचे आहे. आर्थिक सल्लागाराकडून व्यवस्थित जोखीम मूल्यांकन करून घ्या, असं मी इथे सुचवू इच्छिते. एक अजून लक्षात ठेवा की, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरून पुढे जाताना, प्रत्येक वेळी हे काम तुम्हाला करणं भाग आहे.

सोनलचं म्हणणं सर्वाना पटत होतं, कारण पैसा वेळेवर वाढला नाही तर तो पुरणार नाही हे आता सगळ्यांना कळलं होतं. आपली जोखीम क्षमता कशी व काय काय करून वाढवायची, असा प्रश्न सर्वाच्या चेहऱ्यावर सोनलला दिसत होता. म्हणून तिने लगेच खालील टिप्स दिल्या:

सोनल एवढं सांगेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सुगंधाताई स्वयंपाकात तरबेज असल्यामुळे आज खमंग काही तरी खायला असणार याची पक्की खात्री होती सगळ्यांना. मस्त मराठी बेत होता. वासानेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. सोनलने परत तंबी दिली- झोप येईस्तोवर खाऊ  नका.

जेवण झाल्यानंतर सोनलने सगळ्यांना पटापट दिवाणखान्यात बसायला सांगितलं. प्रत्येकीला एक नोटबुक आणि पेन दिलं. तिने आता पोर्टफोलिओसंदर्भात सांगायला सुरुवात केली- सगळ्यांनी आता माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सर्वप्रथम समजून घ्या. लिहिण्याच्या घाईमुळे समजण्यात कमी पडता कामा नये. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते लिहून ठेवा आणि मी सांगेन तेव्हा विचारा.

जोखीम क्षमतेत वाढ कशी करता येईल?

*  बचत वाढवा * गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती मिळवा * नवीन पर्याय निवडताना – सुरक्षितता, परतावे, तरलता आणि कर वजावट या चार गोष्टी लक्षात ठेवा * गुंतवणूक शिस्तबद्ध असू द्या * इंटरनेटवर भरपूर माहिती आहे, तिचा छान वापर करा * केलेली गुंतवणूक व्यवस्थित तपासा. वेळोवेळी तिचे परतावे अपेक्षेप्रमाणे आहेत की नाही याकडे लक्ष ठेवा * तज्ज्ञ मंडळी जवळ ठेवा. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपली गुंतवणूक स्वत: करायला शिकून घ्या * आपल्या पैशावर आपलं नियंत्रण असू द्या. कर्जबाजारी होणे टाळा. हौसेसाठी कर्ज घेणे तर नकोच!.

सोनलने दिलेले धडे-

१ इमर्जन्सी फंड : सहा महिन्यांचा पगार हा हाताशी असावा म्हणजे एफडी आणि लिक्विड म्युच्युअल फंडात. सेव्हिंगमध्ये जास्त पैसे ठेवू नये. कधीकाळी जर पैसे कुठे गुंतवायचे हा निर्णय झाला नसेल तर लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवावेत.

२ आरोग्य विमा : स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर लग्न झालं असेल तर फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्यावा. कुटुंबात वरिष्ठ सदस्य असल्यास त्यांचा आरोग्य विमा वेगळा काढावा. जरी कंपनीने विमा काढला असेल, तरीही वेगळं विमा कव्हर असावं. विम्याचे कव्हर काळानुसार आणि गरजेनुसार वाढवावे. पॉलिसी नीट वाचून घ्यावी. कुणाच्याही दबावाखाली येऊन चुकीचा निर्णय घेऊ नये. क्लेम कसा करायचा, कोणत्या आजारांसाठी करायचा, कधीपर्यंत करायचा, हे सगळं नीट नमूद करून घ्यावं. कॅशलेस का रिइम्बर्समेंट याचा विचार आधी करावा, कारण दोन्हीची प्रक्रिया वेगळी आहे. वाढणाऱ्या मेडिकलच्या खर्चाला हाच योग्य पर्याय आहे.

३ आयुर्विमा : आयुष्याची जोखीम सांभाळतो तो आयुर्विमा. कोणी घ्यावा – जो कमाई करत आहे, ज्याच्यावर कर्ज आहे, ज्याच्यावर आर्थिकरीत्या अवलंबून असणारे कुटुंबीय आहेत आणि ज्याच्याकडे पुरून उरणारी संपत्ती नाही आहे, अशा व्यक्तीने आयुर्विमा घ्यावा. किती घ्यावा – आपल्यापश्चात आपल्या कुटुंबीयांना कोणताही आर्थिक त्रास होऊ नये इतक्या रकमेची सोय झाली पाहिजे. आपली सगळी कर्जे विम्यातून फेडली गेली पाहिजेत. विमा घेताना टर्म पॉलिसी घ्यावी. गरजेनुसार कव्हर वाढवावं. स्टेप-अप ऑप्शन किंवा नवीन कव्हर घ्यावं. रिटायरमेंटनंतरच्या जबाबदाऱ्यांचा व्यवस्थित आढावा घेऊन विमा चालू ठेवावा. एकापेक्षा अधिक विमा पॉलिसी काढून वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांची सांगड घालावी; परंतु असं करताना प्रीमियम कितपत झेपतंय हेसुद्धा ध्यानात ठेवावं. शक्यतो प्रीमियम वार्षिक कमाईच्या ६-७% पर्यंत असावं आणि कव्हर ८-१० पटीने.

गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची सांगड

१. बँक एफडी : इमर्जन्सी फंडासाठी

२. लिक्विड म्युच्युअल फंड : इमर्जन्सी फंडासाठी, सहा महिन्यांच्या आतील आर्थिक उद्दिष्टांसाठी

३. डेट म्युच्युअल फंड : सहा महिने ते दोन वर्षांच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी

४. बॅलन्स्ड म्युच्युअल फंड : ३-५ वर्षांच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी

५. इक्विटी म्युच्युअल फंड : ५ वर्षांच्या पुढच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी

६. शेअर्स : जास्त जोखीम घ्यायची क्षमता असणाऱ्यांसाठी आणि ५ वर्षांच्या पुढच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी.

कर वाचवण्यासाठी..

१. पीएफ, ईपीएफ, व्हीपीएफ, पीपीएफ : पीपीएफचा व्याजदर बाकी दोन पर्यायांपेक्षा कमी आहे, हे लक्षात घेऊन व्हीपीएफचा वापर करावा.

२. कर सवलतीचे ईएलएसएस : या म्युच्युअल फंडामध्ये ३ वर्षे पैसे काढता येत नाहीत. म्हणून प्रत्येक महिन्यात एसआयपी करून गुंतवणूक करावी.

३. एनपीएस : ३०% कर दराच्या टप्प्यात असणाऱ्यांसाठी हा पर्याय जास्त फायद्याचा आहे; परंतु रिटायरमेंटपूर्वी पैसे काढताना थोडी आडकाठी सध्या तरी आहे. म्हणून जास्त पैसे या पर्यायात गुंतवू नये.

. इन्फ्रा बॉण्ड्स : कमी होणारे व्याज दर लक्षात घेता, काही दीर्घकालीन गुंतवणूक यांच्यामध्येसुद्धा करता येते. वाढत्या महागाईसमोर मात्र यांच्यातली गुंतवणूक टाळावी.

एवढं सांगून सोनल थांबली. सगळे लिंबू अगदी तल्लीन होऊन तिच्या सांगण्याकडे लक्ष देत होते. ती म्हणाली- आता हे सगळं जाणून तुमच्या मनात खूप प्रश्न आले असणार. मला कळतंय की, हे सगळं एका दिवसात नाही जमणार. शिवाय मी तुम्हाला सगळेच पर्याय नाही सांगितले. यापुढे तुम्ही शोधायचे आणि अनुभव घ्यायचा; पण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!!! तिचं हे वाक्य ऐकून सुगंधाताई काय खूश झाल्या. तिचं कौतुक करत म्हणाल्या- अरे वाह सोनल, तुझं मराठी इतकं चांगलं आहे हे मला माहीत नव्हतं. जिग्ना म्हणाली- आमरस खाल्ल्यानंतर हा विषय पचवणं तसं जरा कठीणच आहे; पण मी हे करून दाखवणार. आहेत माझ्या मनात खूप प्रश्न, पण जोवर समाधानकारक उत्तर मिळत नाही तोवर तुमचा पिच्छा पुरवणार. सिल्वी म्हणाली- सोनल, मलासुद्धा बरेच प्रश्न आहेत. काय करू या? सोनल म्हणाली- एक काम करा. तुम्ही सर्वानी तुमच्या नोटबुकमध्ये तुमचे प्रश्न लिहा आणि मला द्या आणि मी जे काही आज सांगितलं आहे त्यावर घरी जाऊन अजून विचार करा आणि गुगलवर माहिती मिळवा. आपण लवकरच भेटू तेव्हा मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. चालेल? तिलोत्तमा म्हणाली- मग एक काम करू या. आपण आज सगळे घरी जाऊन आपल्या प्रश्नांची यादी तयार करून सोनलला ई-मेलद्वारे पाठवू या. सोनल, तू आम्हाला एक आठवडा तरी दे. चालेल सगळ्यांना? यास्मिन म्हणाली- गुड आयडिया. सोनलला हे मान्य होतं. तर सगळ्या लिम्बांनी यादीचं आश्वासन दिल्यावर सुगंधाताई सर्वासाठी मस्त चहा आणि भेळपुरी घेऊन आल्या. सगळ्यांनी त्याचा मस्त आस्वाद घेतला आणि लवकरच भेटू, असं सांगून आपल्या घरची वाट धरली.

आजची टीप: वरील दिलेली माहिती ही सर्वसाधारणपणे गुंतवणुकीच्या विश्वाच्या संदर्भात आहे. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. वाचकांनी वास्तवात गुतंवणूक करताना स्वत: माहिती मिळवून किंवा गुंतवणूक सल्लागाराच्या मार्गदर्शनाने करावी. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे शेअर बाजाराशी निगडित कोणतीही गुंतवणूक जोखमीची असते. त्यामुळे या लेखाच्या आधारावर गुंतवणूक करू नये. वाचकाने घेतलेले निर्णय हे त्याचे स्वत:चे असून लेखक कोणत्याही प्रकारच्या नुकसानास जबाबदार नाही.

सूचना : वरील नमूद नावाचा कुणाही व्यक्तीशी – जीवित अथवा मृत, संबंध नाही. या व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि आर्थिक नियोजनाच्या कथेत फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून भूमिका साकारत आहेत.

तृप्ती राणे trupti_vrane@yahoo.com

First Published on May 15, 2017 1:10 am

Web Title: various investment options different investment options financial investment options investments alternative