07 April 2020

News Flash

फंड विश्लेषण : दिसते मजला सुख चित्र नवे!

जानेवारीपासून याच निर्देशांकांनी अनुक्रमे १४ टक्के आणि ३२ टक्के घट नोंदविली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

बाजारातील निर्देशांक नव्या शिखराला स्पर्श करत असताना, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन मिळणाऱ्या रकमेची बँकेत मुदत ठेव करावी किंवा कसे हा विचार नव्याने गुंतवणूक करू लागलेल्या नवगुंतवणूकदारांच्या मनात पुन:पुन्हा येत आहे. अनेकांनी आपल्या म्युच्युअल फंड वितरकाने फंड सुचविण्यात चूक केली असादेखील समज करून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजात वाढ होत असताना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा समाधानकारक नसण्यामागील कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.

सेन्सेक्स किंवा निफ्टी निर्देशांकांमध्ये निवडक कंपन्यांचा समावेश असतो. या कंपन्यांच्या बाजारातील भावानुसार निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये चढउतार होत असतात. सेन्सेक्स आणि निफ्टी कंपन्याचे बाजारमूल्य एकूण भांडवली बाजाराच्या बाजारमूल्याच्या जवळपास ८५ टक्के आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. १ जुलै २०१७ ते ३० जून २०१८ या एका वर्षांचा विचार केल्यास निफ्टीमधील केवळ ७, सेन्सेक्स मधील ५ आणि बीएसई ५०० निर्देशांकातील केवळ १० कंपन्यांच्या भावात वाढ दिसून आली. याचा अर्थ ही तेजी निवडक समभागांमुळे आलेली असून बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या बँकिंग आणि वित्तीय सेवाक्षेत्र, निवडक समभाग वगळता वाहन उद्योगाचा या तेजीत सहभाग दिसून आलेला नाही. निर्देशांकांना नवीन शिखरापर्यंत नेण्यात टीसीएस एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी या निवडक समभागांचे योगदान असल्याने ही तेजी सर्वव्यापी नाही. निर्देशांक सर्वोच्च शिखराला स्पर्श करूनदेखील त्याचे प्रतिबिंब म्युच्युअल फंड गुंतवणुकीत न दिसण्यास हे मुख्य कारण आहे.

गुंतवणूकदारांचे नेमके काय चुकले?

फंड योजनांचा मागील परतावा भविष्यातील परताव्याची खात्री देऊ शकत नाही, असा बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून वारंवार इशारा देऊनदेखील मागील परतावा हाच अनेकांच्या फंड निवडीचा निकष असतो. मागील दोन-तीन वर्षांचा विचार केल्यास २०१४ नंतर सर्वसाधारणपणे मिड कॅप समभागांची भांडवली वृद्धी लार्ज कॅप समभागांपेक्षा अधिक असल्याने, मिड आणि स्मॉल कॅप योजनांचा परतावा अधिक राहिला. तेजीवर स्वार झालेल्या मिड कॅप समभागांचे मूल्यांकन हे लार्ज कॅप समभागांच्या मूल्यांकनापेक्षा अधिक होते. या सदराचा हेतू केवळ चांगल्या फंडांची ओळख करून देण्याचा नसून या फंडाच्या गुंतवणुकीतील जोखीमेची जाणीव करून देण्याचा असतो. ३१ डिसेंबर रोजी बीएसई मिड कॅप आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकांचा एका वर्षांतील परतावा अनुक्रमे ५१ टक्के आणि ६८ टक्के होता. जानेवारीपासून याच निर्देशांकांनी अनुक्रमे १४ टक्के आणि ३२ टक्के घट नोंदविली आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी शिखराला स्पर्श केला असला तरी आज रोजी बीएसई मिड कॅप आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकांची कामगिरी रोडावलेली आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार केल्यास निर्देशांकांचा कल वेगवेगळा आहे. मालमत्तेचे विभाजन हा यशस्वी गुंतवणुकीचा पाया मनाला जातो. या नवगुंतवणूकदारांनी मालमता विभाजन सारख्या मूलभूत गोष्टींना हरताळ फासल्याने या सर्व नवगुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत मिड कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकांचा समावेश मोठय़ा प्रमाणावर केला आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप घसरणीचे पडसाद त्यांच्या गुंतवणुकीत दिसत आहेत. गुंतवणूकदारांचे काम हे चांगला सल्लागार निवडण्याचे आहे. ते काम त्यांनी करावे आणि फंड निवड ही सल्लागारावर सोडावी. परंतु गुंतवणूकदारांना सल्लागाराने सुचविलेल्या योजना नेहमीच पसंत पडत नाहीत. नामांकित फंड घराण्याच्या योजना त्यांना हव्या असतात. अनेक अप्रचलित फंडांचा परतावा ‘एचडीएफसी टॉप १००’, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी’, ‘आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी’सारख्या नामांकित फंडांपेक्षा किती तरी अधिक आहे.

‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।। येता सिंधूच्या लहरी। नम्र होता जाती वरी।।’ या संत तुकाराम यांच्या वचनाप्रमाणे बाजारातील मिड आणि स्मॉल कॅपमधील आघाताचा सर्वाधिक फटका या प्रचलित फंडांना बसल्याचे आकडेवारी सांगते. म्युच्युअल फंड सल्लागारापेक्षा आपल्याला अधिक कळते हा गुंतणूकदारांचा समज घातक ठरला. मागील आठवडय़ात भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकले. येत्या वर्षभरात आपल्या अर्थव्यवस्थेचे आकारमान इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेहून मोठे असेल. समभाग गुंतवणूक ही दीर्घ मुदतीची असते. आपापल्या जोखीमांकनानुसार एकूण गुंतवणुकीचा ठरावीक हिस्सा बाजारात गुंतवायला हवाच. केवळ बँक मुदत ठेवींपेक्षा परतावा कमी झाला म्हणून म्युच्युअल फंड मोडून मुदत ठेव करणे ही आर्थिक हाराकिरी ठरेल.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:25 am

Web Title: vasant madhav kulkarni article on mutual fund analysis
Next Stories
1 कर-बोध :  विवरणपत्र वेळेत दाखल करा.. अन्यथा विलंब शुल्क भरा!
2 गुंतवणूक कट्टा.. : कर्ज किती घ्यावे?
3 डेट फंडाची विक्री  आणि कर आकारणी!
Just Now!
X