20 January 2021

News Flash

संकल्पना सर वॉरन हेस्टिंग यांच्या काळातील

देशाच्या मध्यवर्ती बँकेचा, पर्यायाने घडल्या बिघडलेल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेचा ऐतिहासिक मागोवा घेणारी साप्ताहिक लेखमालिका

|| विद्याधर अनास्कर

‘मध्यवर्ती बँक’ ही संकल्पना १७७३ मध्ये सर्वप्रथम पुढे आली ती महसुलाची निकड तातडीने भागविण्याच्या उद्देशाने आणि प्रशासनाचा ‘कोषागार’ या अर्थाने..

‘रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’ म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक. या मध्यवर्ती बँकेची कल्पना कधी उदयाला आली हे जाणून घेणे खूप मनोरंजक ठरेल. इतिहास खूप जुना आहे. त्याची पाळेमुळे थेट सन १७७३ पर्यंत जातात.

मध्यवर्ती बँकेच्या अनेक महत्त्वाच्या कार्यापकी विनिमय दर निश्चित करण्याच्या कार्याची सुरुवात त्या आधीच सन १७६६ मध्ये सर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केली. १७६५ ते १७६७ या कालावधीत सर रॉबर्ट क्लाइव्ह जेव्हा दुसऱ्यांदा गव्हर्नर म्हणून भारतात आले तेव्हा अवधचे नबाब गुजाऊद्दौला व मुगल सम्राट शाह आलम यांच्याबरोबर इलाहाबाद येथे झालेल्या समेटानंतर त्यांनी बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली. महसूल जमा करणे, सनिकी संरक्षण, परराष्ट्र धोरण याची जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनीने स्वत:कडे घेतली आणि राज्य चालविण्याची जबाबदारी त्या त्या राज्याच्या नबाबांकडे दिली. त्यावेळी चांदी व सोन्याच्या रूपातच महसुलाची वसुली होत असे. या दोहोंच्या उपलब्धतेवर मनमानीपणे वेगवेगळे विनिमय दर निश्चित केले जात होते. १९६६ मध्ये मोठय़ा प्रमाणावर चांदीची निर्यात चीन येथे झाल्याने चांदीतील चलनाचा तुटवडा सुरू झाला. त्या प्रमाणात विविध स्वरूपातील सोन्याची उपलब्धता देशात जास्त होती. अशा परिस्थितीत सर रॉबर्ट क्लाइव्हने प्रथम या दोन चलनातील विनिमय दर निश्चित केला. हा दर अयोग्य असल्याबाबत सर रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यावर त्या काळात भरपूर टीका झाली असली तरी व्यवहारामध्ये प्रशासकीय पातळीवर अधिकृत विनिमय दर सर्वप्रथम निश्चित करण्याचे श्रेय सर रॉबर्ट क्लाइव्ह यांनाच द्यावे लागेल.

सर रॉबर्ट क्लाइव्हनंतर बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून आलेल्या वॉरन हेस्िंटगने दुहेरी शासन पद्धती बंद केली. तसेच देशाची एक ‘मध्यवर्ती बँक’ असावी अशी संकल्पना सन १७७३ मध्ये प्रथम महसूल मंडळासमोर मांडली. अशी कल्पना सुचण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे होती. त्या काळी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या त्या जिल्ह्य़ातून वसूल झालेला महसूल राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच कलकत्त्याला पाठविण्यासाठी बराच मोठा प्रवास करावा लागत असे. या प्रवासाचा खर्च जेवढा मोठा होता, तेवढाच त्यास लागणारा वेळदेखील जास्त होता. प्रवासामध्ये दरोडे पडण्याची जशी भीती होती, तसेच महसुलाची वाहतूक (अंगडिया) प्रामाणिकपणाबद्दलही प्रशासनाला शंका होती. या सर्वावर मार्ग काढण्यासाठी वॉरन हेस्टिंग याने त्या त्या जिल्ह्य़ामध्ये मध्यवर्ती बँकांच्या निर्मितीची संकल्पना मांडली. या बँकांचे स्वरूप सार्वजनिक असल्याने त्यांना ‘जनरल बँक’ म्हणूनच ओळखले जायचे. जिल्हावार स्थापलेल्या या बँकांमुळे जिल्ह्य़ातून वसूल झालेल्या महसुलाची वाहतूक न करता त्या महसुलाचा भरणा त्या त्या जिल्हा बँकांमध्ये करण्यात येत होता. त्यामुळे या मध्यवर्ती जिल्हा बँकांचा उपयोग ‘कोषागार’ म्हणूनच केला जात होता. माझ्या मते सध्याच्या सहकारी बँकिंगमधील त्रिस्तरीय रचनेतील मध्यवर्ती जिल्हा बँकांचा उगम याचवेळी झाला असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

त्यावेळी ‘रुपया’ हे चलनवलनाचे समान साधन असले तरी देशात एकच टांकसाळ नसल्याने विविध भागांत रुपयाचे दृश्य स्वरूप जसे वेगवेगळे होते, तसेच त्यांचे मूल्यही वेगवेगळे होते. काही नाणी तांब्याची, काही चांदीची तर काही अन्य धातूंपासून बनविलेली असायची. सोन्याचा उपयोग त्यावेळी जास्त करून बक्षिसी देण्यासाठी होत असे. या वेगवेगळ्या धातूंतील रुपयांमधील विनिमय दर ठरविण्याचा प्रयत्न या सार्वजनिक बँकांनी त्यावेळी केला.

त्या काळातील मुगल राजवटीत मुíशदाबादचे ‘सिक्का’ हे चलनरूपी नाणे प्रमाण मानले जात होते. त्यामुळे ‘सिक्का’ हे अधिकृत चलन मानून त्याच्याशी इतर चलनांचा विनिमय दर ठरविला जात होता. इतर धातूंमधील चलन सिक्क्यामध्ये बदलून देताना या बँका जे कमिशन कापून घ्यायच्या त्याला ‘बट्टा’ म्हणत असत. सुरुवातीला या बट्टय़ाचा दर हा त्या नाण्यांचे वजन व ते नाणे किती काळ चलनामध्ये आहे त्यावर अवलंबून नसायचा तर हा दर ठरविण्याचा अधिकार मंत्र्यांच्या लहरी स्वभावावर अवलंबून अथवा स्थानिक बँकरला असायचा. या बँकरला त्यावेळी श्रॉफ असे नामाभिधान होते. हे श्रॉफ समाजातील प्रतिष्ठित व अनुभवी व्यापारी असायचे. त्या त्या धातूचा कस पाहून त्याचे मूल्य निश्चित करण्याची जबाबदारी या बँकरवर म्हणजेच श्रॉफवर असायची. थोडक्यात, श्रॉफ म्हणजे चलन बदलून देताना त्याची तपासणी करून त्याचे योग्य ते मूल्यमापन करणारी व्यक्ती होय. मराठीमध्ये या व्यक्तीला सराफ तर उर्दूमध्ये शराफ म्हटले जायचे. यामधूनच श्रॉफ या शब्दाचा उदय झाला.

जमीनदार व शेतकऱ्यांकडून वसूल झालेला विविध चलनांमधील महसूल या स्थानिक जिल्हा बँकांमधून भरणा केल्यानंतर सदर महसूल राजधानीस पाठविण्यासाठी या बँका संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना हुंडी देत असत. या हुंडीवर संबंधित चलनाचे रूपांतर ‘सिक्का’ या चलनात करून मूल्य नमूद केलेले असायचे. आपल्या चलनाचे रूपांतर ‘सिक्का’ या चलनात केल्यावर आपल्याला किती मोबदला मिळणार हे शेतकऱ्यांना समजावे म्हणून बँकरने निर्धारित केलेले दर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीमध्ये भित्तिपत्रकाद्वारे जाहीर केलेले असायचे. अशाच प्रकारे इतर व्यापाऱ्यांची रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यासाठीही या बँका हुंडीचा वापर करायच्या. दुसऱ्या जिल्ह्य़ातील बँकांमधून सदर हुंडी वटवण्यासाठी व्यापाऱ्यांना ‘बट्टा’ म्हणजे कमिशन द्यावे लागे. प्रत्येक जिल्हा बँकांचे बट्टय़ाचे दर वेगवेगळे असायचे. हे सर्व दर समान असण्यासाठी एका मध्यवर्ती संस्थेची गरज भासू लागली. त्या काळी सुमारे १४ जिल्हा बँका अस्तित्वात होत्या. या सर्व जिल्हा बँकांवर नियंत्रण व बट्टय़ाचा दर ठरविण्याचे काम ही मध्यवर्ती बँक करीत होती. बट्टय़ाचा दर हा रक्कम पाठविण्याच्या ठिकाणाचे अंतर व त्याचे मूल्य पाहून आकारला जात होता. सर्वाच्या माहितीसाठी बट्टय़ाचे दरदेखील प्रत्येक जिल्हा बँकांमधून व कचेऱ्यांमधून भित्तिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असत. अशा प्रकारे तत्कालीन ‘सिक्का’ हे चलन प्रमाणित करण्याचे व स्थिर करण्याचे काम या मध्यवर्ती बँकेने केले. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेची संकल्पना सर्वप्रथम सन १७७३ मध्ये सर वॉरन हेस्टिंगच्या काळात उदयाला आली असेच म्हणावे लागेल.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या सध्याच्या कार्यप्रणालीनुसार त्या काळी ‘विनिमय दर’मध्ये कमी-जास्त करून चलन व्यवस्थेमध्ये स्थिरता आणण्याचे कार्यसुद्धा मध्यवर्ती बँक करत असे. बऱ्याच वेळेस दुष्काळामुळे अथवा भरघोस पिकामुळे अन्नधान्याच्या किमती घसरत असत, त्यामुळे शेतकरी व जमीनदारांकडून अपेक्षित महसूल जमा होत नसे. अशावेळी विनिमय दरामध्ये बदल करून अर्थव्यवस्थेत स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला जात असे. १४ जिल्हा बँकांवर नियंत्रण असलेल्या या पहिल्या मध्यवर्ती बँकेची दोन मुख्यालये होती. त्यापकी एक मुख्यालय कलकत्त्यामध्ये तर दुसरे मुíशदाबाद येथे होते. कलकत्ता येथील कार्यालयात बाबू हजारीमल नावाचे प्रतिष्ठित व जुने व्यापारी श्रॉफ (बँकर) म्हणून काम पाहात होते, तर मुíशदाबाद येथे रॉय दलचंद हे काम पाहात होते. या दोघांना रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन विभागीय संचालक म्हटले तर वावगे ठरणार नाही. रिझव्‍‌र्ह बँकेच्या सध्याच्या कार्यप्रणालीनुसार त्या काळी ‘विनिमय दर’मध्ये कमी-जास्त करून चलन व्यवस्थेमध्ये स्थिरता आणण्याचे कार्यसुद्धा मध्यवर्ती बँक करत असे. बऱ्याच वेळेस दुष्काळामुळे अथवा भरघोस पिकामुळे अन्नधान्याच्या किमती घसरत असत, त्यामुळे शेतकरी व जमीनदारांकडून अपेक्षित महसूल जमा होत नसे. अशावेळी विनिमय दरामध्ये बदल करून अर्थव्यवस्थेत स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला जात असे. १४ जिल्हा बँकांवर नियंत्रण असलेल्या या पहिल्या मध्यवर्ती बँकेची दोन मुख्यालये होती. त्यापकी एक मुख्यालय कलकत्त्यामध्ये तर दुसरे मुíशदाबाद येथे होते. कलकत्ता येथील कार्यालयात बाबू हजारीमल नावाचे प्रतिष्ठित व जुने व्यापारी श्रॉफ (बँकर) म्हणून काम पाहात होते, तर मुíशदाबाद येथे रॉय दलचंद हे काम पाहात होते. या दोघांना रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन विभागीय संचालक म्हटले तर वावगे ठरणार नाही.

क्रमश:
– लेखक बँकिंग विषयातील तज्ज्ञ आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष
ई-मेल : v_anaskar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 3:07 am

Web Title: what is central bank concept mppg 94
Next Stories
1 नववर्षांतील बदल आणि आव्हाने
2 श्रोते व्हावे सावधान
3 आव्हानांची भूमिती बांधणारा!
Just Now!
X